शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

हत्या आणि आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 09:13 IST

हरवलेली माणसं : दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणातून त्यानं व तिनं तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आलेल्या अस्मानी संकटाला घाबरून त्यांनी मरणाला जवळ केलं. ते मुक्त झाले; आत्महत्या करून; पण त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली, त्यांची तीन चिमुकली मुले आजही मायबापाची आस लावून त्यांच्या आठवणीत रोज मरण अनुभवतात..! त्यातल्या एका मुलीची निवासी शिक्षणाची जबाबदारी घेऊन, तिचं पालकत्व आम्ही समाजभान टीममार्फत स्वीकारलं आहे. 

- दादासाहेब श्रीकिसन थेटे

नेत्या-पुढाऱ्यांच्या गाड्यांची त्यांच्या घराकडं रीघ लागलेली असायची. कधी नव्हे तो, माणसांचीही वर्दळ त्यांच्या घरामध्ये थाटलेली दिसायची. पांढरे फॅक कपडे घातलेली लालचुटूक माणसं आणि आजवर या घराला पाय न लावणारी गावातली नेते मंडळीही त्यांच्या मागे-मागे या घरात दररोज गर्दी करायची. याच गर्दीला न्याहाळताना चार वर्षांचा सोनू आपल्या बापाचा शोध घेत, आलेल्या माणसांचे चेहरे न्याहाळत गर्दीतून आपली चिमुकली पावलं टाकत, न चुकता दररोज आशाळभूत नजरेनं त्या गर्दीतून हिंडायचा. घरात पाहुण्या आलेल्या बाया त्या चिमुकल्याकडं पाहून फुंदू फुंदू रडत बसायच्या.

कधी मायेनं जवळ न घेणाऱ्या पाहुण्या त्यावेळी या लेकरांना उराशी घेत त्यांचे पापे घ्यायच्या; पण कितीही केलं तरी त्या पाप्यांना आईच्या पाप्याची सर कधीच आली नव्हती. हे बोलून दाखवायला त्या चिमुकल्याच्या जिभेत बळही नसावं, यापेक्षा नियतीचा मोठा कोप दुसरा कोणता असावा? सकाळी आईच्या कुशीत सुरक्षितपणाच्या विश्वासानं आणि मायेच्या उबदार स्पर्शानं साखरझोपेत राहणारा सोनू, त्यादिवसात मात्र मध्यरात्रीच उठून घरात झोपलेल्या बायांचे चेहरे न्याहाळत बसायचा. झोपलेल्या बायांच्या तोंडावरचे पांघरूण उघडून त्यांचे चेहरे बघत बसायचा... फक्त एकाच अस्वस्थतेनं... आपली माय... कुठंय..? माय दिसेन तरी कशी? जीवनसंघर्षातून आपल्या तानुल्याला एकाकी ठेवून, माणूसपण हरवलेल्या या जगात मतिमंद असणाऱ्या सोनूला अनाथ करून ती कायमची मुक्त झाली होती. तिच्या या पिलांना दररोज मरण अनुभवायला सोडून... त्यात तिचाही दोष नव्हताच म्हणा, कारण निष्पाप दु:खाला या जगात ना आवाज असतो, ना आक्रोशाची मुभा...!

आज तीन वर्षे झाली. घरात या लेकरांचा बाप आला नाही ना माय. शेतात गेलेल्या वाटेनं आजही हे चिमुकले केविलवाणे डोळे आस लावून बसलेत, आज ना उद्या आपले माय बाप परत येतील या आशेनं; पण त्यांना माहीत नाही दुनियादारीच्या लढाईत व्यवस्थेशी लढण्याचं धाडस हरवलेला त्यांचा बाप मायेसोबत औषध पिऊन, कायमचाच या दुनियेतून मुक्त झालाय. त्यानं आत्महत्या केली होती... आणि तिनं..?

चार वर्षांचा दुष्काळ, शेतीचा खर्च, शेतमालाला न मिळणारा भाव, शेतीसाठीचे प्रतिकूल धोरण, मुलांचं शिक्षण-संगोपन, संसाराचा खर्च आणि या सर्वांवर रोज छातीवर दाब ठेवून बसलेला कर्जाचा डोंगर. या रोजच्या किटकिटीला वैतागून त्यांनी आत्महत्या केली होती; पण मग त्यांच्या मरणाने त्यांच्या निष्पाप पोरांच्या बालपणावर झालेल्या आघाताचं काय? त्यांच्या अनाथ जीवनाचा आधार कोण? त्यांच्या भविष्यातल्या शिक्षणासाठी, सन्मानासाठी, जगण्यासाठी जबाबदार कोण? त्या बालमनात चालू असलेल्या आकांडतांडवाला जबाबदार कोण? त्यांच्या मनात अन् डोळ्यात दाबून धरलेल्या अश्रूंचा धनी कोण? त्यांच्या रोज होणाऱ्या हत्येला वाचवणार कोण..? संकट पाहून आत्महत्येच्या पळवाटेवरून त्यांचे माय-बाप दूर पळून गेले; पण त्या दलदलीत फसलेल्या त्यांच्या निरागस लेकरांच्या भाविष्याचं काय..? हे प्रश्न मात्र आजही निरुतरीतच आहेत.

हळूहळू दिवस निघून गेले... त्यावेळी जमलेले सहानुभूतीचे अवकाळी ढगही नाहीसे झाले. आज कदाचित त्या लेकरांना समजतंही असेल; आपल्या घरात त्यावेळी जमणाऱ्या त्या पांढऱ्या कपड्यांच्या गर्दीचा अर्थ... पोरकं होऊन, मन मारून एकटेपण अनुभवण्याचा अर्थ... अनाथपणाच्या निराधार जगण्याचा अर्थ... माय-बाप आणि त्यांच्या हरवलेल्या प्रेमाचा अर्थ...! आणि कळत असेल त्यांना, दुनियादारीतले कावळे जेव्हा लचके लागतात तोडायला, तेव्हा गर्दी करणारे माणुसकीचे पुढारी दगड होऊन नुसती बघ्याची भूमिका घेण्यातच आंनद मानत असतात, त्यावेळीच कळालेला असेल त्यांना खऱ्या दुनियादारीचा अर्थ...! 

या कुटुंबाच्या तीन वर्षांच्या सहवासातून, या लेकरांच्या भेटी गाठीतून आणि आलेल्या अनुभवातून खरंच सांगतो शेतकरी माय-बाप; अचानक आलेलं अनाथपणाचं भोग आत्महतेहूनही विद्रुप असतं हो..! ही या लेकरांच्या मनाची विद्रुप अवस्था पाहून कदाचित आपल्या चुकीवर या माय-लेकरांचे आई-बापही स्वर्गात ढसाढसा रडत असतील... म्हणून सगळ्याच माय-बापांना अगदी मनातून एक प्रश्न आजही मी विचारत असतो... ‘माय-बाप तुमच्या चुकीची शिक्षा, जन्मभर तुमची पिलुंडे भोगत असताना तुमच्या आत्म्याला खरंच शांती मिळेल का हो?’

सोनू... तू जरी त्यावेळी बोलत नव्हतास; पण तुझी नजर सारं काही सांगत होती... सोनू तुला साक्षीला ठेवून आजही या दुष्काळी परिस्थितीत सर्वांना ओरडू-ओरडू सांगेन.. काही होऊ द्यात; पण आत्महत्या करू नका..! आत्महत्या करण्याचं मनात आलंच कधी, तर तुमच्या घरातल्या चिमुकल्या सोनूचा चेहरा डोळ्यासमोर आणा... त्याच्या निरागस डोळ्यात लपलेल तुमच्या प्रेमाचं आभाळ बघा... त्याच्या चेहऱ्यावर आयुष्यभराच्या वेदना ठेवून, तुम्हालाही मरणाची शांती लाभणार नाही..! कारण तुमची त्यावेळची आत्महत्या ही तुमच्या नंतर तुमच्या कितीतरी प्राणप्रिय लोकांच्या आत्म्याची हत्या करीत असते...! अगदी सोनू आणि त्याच्या चिमुकल्या भावंडासारखी...!