- विजेंद्र शर्मा
प्रत्येक नव्या राष्ट्रपतीचं पोट्रेट राष्ट्रपती भवनात लावण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचे पोट्र्रेट काढण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. एकूण दोन पोट्र्रेट काढायची होती. एक उभं आणि दुसरं बसलेल्या स्थितीत.त्या दिवशी मी गेलो राष्ट्रपती भवनात. सगळी तयारी केली. कंपोझिशन तयार केलं. राष्ट्रपती मुखर्जी यांचीच वाट पाहात होतो. पण मनात असंख्य विचारांनी कल्लोळ माजला होता. कशी होईल त्यांच्याबरोबरची भेट. कसा असेल त्यांचा स्वभाव? कसे वागतील ते आपल्याशी? थोडं टेन्शनच होतं. अर्थात याआधी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचंही पोट्र्रेट मी काढलं होतंच. तो अनुभवही अतिशय छान होता. मी विचारांच्या तंद्रीत असतानाच राष्ट्रपती मुखर्जी आले. ते माझ्याशी भेटले. बोलले. त्यांच्या बोलण्यात इतकी विनम्रता होती, की देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीशी मी बोलतोय, असं चुकूनही वाटलं नाही, इतकी आपुलकी त्यांच्या वागण्या-बोलण्यात होती. जणू एखाद्या जवळच्या मित्राशी बोलावं इतकं हसून खेळून आणि जुनी ओळख असल्यासारखं ते वागत होते. तुम्ही अशी पोज द्या, पोजसाठी अशा पद्धतीनं उभे राहा, असे बसा. जे जे काही मी त्यांना सांगत होतो, त्या त्या पद्धतीनं ते अगदी आनंदानं करत होते. थोडाही त्रासिक भाव त्यांच्या चेहर्यावर नव्हता.
सन्मानाची गोष्ट..राष्ट्रपती भवनात प्रत्येक राष्ट्रपतीचं पोट्र्रेट लावण्याची परंपरा आहे. संपूर्ण देशभरात जे अतिशय नामांकित चार-पाचशे कलावंत आहेत, त्यातील एखाद्यालाच राष्ट्रपतींचे पोट्र्रेट तयार करण्याचा मान मिळतो. कोणत्या कलाकाराला हा सन्मान मिळेल, यासाठीचे मापदंडही अतिशय कठीण आहेत. बागपत येथील मूळ रहिवासी आणि सध्या दिल्लीत राहात असलेले कलावंत विजेंद्र शर्मा यांना तर दोनदा हा बहुमान मिळाला आहे. प्रणव मुखर्जी यांच्या आधी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचेही पोट्र्रेट विजेंद्र शर्मा यांनी काढले होते. विक्रम वेताळ, रामायण, महाभारत यासारख्या गाजलेल्या मालिकांमधील टायटल पेंटिंगही त्यांचेच होते.देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीचं पोट्र्रेट काढायला मिळणं, ही खरोखरच मोठय़ा सन्मानाची गोष्ट. माजी राष्ट्रपती आर. के. नारायणन यांचं पोट्र्रेट काढण्याचा मान नागपूरचे कलावंत प्रमोद रामटेके यांना तर प्रतिभाताई पाटील यांचं पोट्र्रेट काढण्याचा बहुमान मुंबईच्या वासुदेव कामत यांना मिळाला होता. (शब्दांकन : मंथन टीम)