माणूस आधी मनातून मरतो, मग प्रत्यक्षात मरतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 06:01 AM2021-06-06T06:01:00+5:302021-06-06T06:05:01+5:30

आपल्या सर्वांना अजून खूप जगायचे असेल, तर कोविडमुळे मरणाचा विचार करून उपयोग नाही.

Man first dies from the mind, then actually dies! | माणूस आधी मनातून मरतो, मग प्रत्यक्षात मरतो!

माणूस आधी मनातून मरतो, मग प्रत्यक्षात मरतो!

Next
ठळक मुद्देत्या म्हाताऱ्या बाबांनी मला विचारले, "बेटा, तू माझ्यावर विश्वास का ठेवला नाहीस?" मी म्हणालो, "कारण दादाजी मी माझ्या आयुष्यात १०८ वर्षांच्या व्यक्तीला कधीच भेटलेलो नाही."

- डॉ. नीलेशमोहिते

(लेखक कम्युनिटी सायकियाट्रीस्ट असून आसाम आणि अरुणाचल प्रदेशात 

मानसिक आरोग्य जनजागृती या विषयात कार्यरत आहेत.)

काही दिवसांपूर्वी जेव्हा माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यावेळी मी एका कुटुंबाचे टेलीकाैन्सिंलिंग करत होतो. कुटुंबाने आपला तरुण मुलगा (कदाचित माझ्याच वयाचा) गमावला होता. ही केवळ एकच केस नव्हती; परंतु कोविड -१९ मुळे मृत्यू झालेल्या अनेक कुटुंबांचे समुपदेशनासाठी मला सतत कॉल येत असतात. माझ्या नातेवाईक आणि मित्र मंडळीमध्ये कोविड कॉम्प्लिकेशनमुळे बरेच लोक मरण पावले आहेत, त्यामुळे कोविडमुळे एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हाची परिस्थिती मी जवळून पाहिली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच तरुणांबद्दल मला माहिती होती. माझे स्वतःचे फुफ्फुस आधीपासूनच हायपर इन्फ्लेमेटरी आहे आणि गेल्या १० वर्षात फुफ्फुसांच्या ॲलर्जीचे ३ दीर्घकालीन एपिसोड येऊन गेले आहेत. रिपोर्ट चेक करताना आणि काैन्सिलिंग चालू असताना पटकन मनात एक विचार येऊन गेला की "मी कोविडने मरणार तर नाही ना?"

हा एक जुना फोटो आहे. फोटोतील रुग्ण १०८ वर्षांचा माणूस आहे. जेव्हा त्यांनी मला प्रथमच सांगितले तेव्हा मी विश्वास ठेवला नाही की, हे १०८ वर्षांचे आहेत म्हणून. मी तीन वेळा हाच प्रश्न विचारला आणि त्यांनी पुन्हा तेच उत्तर दिले. शेवटी माझी खात्री पटली की, ते वृद्ध खरोखरच १०८ वर्षांचे आहेत.

त्या म्हाताऱ्या बाबांनी मला विचारले, "बेटा, तू माझ्यावर विश्वास का ठेवला नाहीस?" मी म्हणालो, "कारण दादाजी मी माझ्या आयुष्यात १०८ वर्षांच्या व्यक्तीला कधीच भेटलेलो नाही."

बाबा हसले आणि उत्तरले, "आज देख लिया ना, तो हमेशा याद रखना और तुम भी मेरी तरह जीना."

बाबांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. लहानपणी म्हणे त्यांनी गोष्टींमध्ये ऐकले होते की योगी, साधू इत्यादी २००..३०० वर्षे जगतात म्हणजे सामान्य व्यक्तीला १५० वर्षे जगणे आरामात शक्य आहे; हे त्यांनी गृहीत धरलं. त्यांचा आशावाद पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. झोपेच्या तक्रारींसाठी ते आले होते. शेवटी मी फी घ्यायला नकार दिला तेव्हा म्हणाले, " इतका आश्चर्यचकित होऊ नकोस बेटा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव - माणूस आधी मनातून मरतो आणि नंतर वास्तवात मरतो."

माझा कोविड रिपोर्ट तपासत असताना त्या बाबांचे शब्द आठवले आणि कोविडमुळे मरणाचा विचार पुन्हा करायचा नाही, असे मी ठरवून टाकले . आपल्या सर्वांना अजून खूप जगून हे जग सुंदर, सुरक्षित आणि ऊबदार बनवायचे आहे त्यामुळे मरणाचा विचार करून उपयोग नाही. लगेच मी आउटपुट देणारे विचार करण्याऐवजी प्रोसेस (प्रक्रिया)देणाऱ्या विचारांवर लक्ष केंद्रित केले.

प्रक्रिया देणाऱ्या विचारांचा अर्थ असा आहे की, मला कोणत्या गोष्टींवर(प्रक्रिया)लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. पुढील धोके टाळण्यासाठी मला उपाय (उपचार, विश्रांती, देखरेख) करणे आवश्यक आहे. म्हणून मी स्वत: ची काळजी घेण्याकडे सर्व लक्ष दिले होते. निष्कर्षाचा जास्त विचार केला नाही.

मी आउटपुटचा (निष्कर्ष ) विचार (मृत्यू किंवा प्रकृृती गंभीर होणे) पूर्णपणे कमी केले. म्हणून मी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्यास अधिक सक्षम ठरलो (काळजी घेणे).

जेव्हा आपण सतत शोक समुपदेशन आणि मृत्यूच्या बातम्या ऐकत असतो तेव्हा मृत्यूबद्दल विचार न करणे कठीण होते; परंतु मी बाबांच्या त्या वक्तव्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला की .”माणूस आधी मनातून मरतो आणि नंतर वास्तवात मरतो. "विज्ञानदेखील आपल्याला हेच सांगते. आपण चिंताग्रस्त असल्यास, निराश किंवा तणावग्रस्त असल्यास आपली प्रतिकारशक्ती कमी होते आणि कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. निरोगी मन आपल्याला निरोगी जीवन देते. योग्य मानसिकता ठेवणे ही सुखरूप बरे होण्याची सर्वात महत्त्वाची पायरी आहे.

जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जगभरात जास्त लोक मरण पावतात.. त्या मागचे एक कारण असे : जगभरातील बऱ्याच धर्मांमध्ये त्यांचे मुख्य सण (दिवाळी, ख्रिसमस, ईद) हे वर्ष संपत आले की असतात म्हणून मरणासन्न लोक सणांपर्यंत जगण्यासाठी स्वतःला आशावादी ठेवतात; परंतु सण/उत्सव गेल्यावर त्यांच्या जगण्याची आशा कमी झालेली असते कारण पुढच्या वर्षीचा उत्सव अद्याप खूप दूर असतो आणि अजून एक वर्ष वाट बघणे बऱ्याच वेळा कठीण असते म्हणून जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जास्त लोक मरण पावतात.

जगण्याची आशा ही दीर्घ आयुष्यासाठी खूप मजबूत आणि महत्त्वपूर्ण शक्ती आहे. मला भेटलेल्या त्या बाबांचे शब्द नेहमी लक्षात ठेवा : "माणूस आधी मनातून मरतो आणि नंतर वास्तवात मरतो."

(ताजा कलम - मी आता ठीक आहे आणि जवळजवळ बरा झालो आहे.)

अनुवाद- श्रुतीखामकर

Web Title: Man first dies from the mind, then actually dies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.