शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

कृष्णाकाठची माया

By सचिन जवळकोटे | Updated: October 22, 2017 11:08 IST

परिस्थितीला आणि जगण्याच्या ताण्या-बाण्याला कंटाळून महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत:हून आपलं जीवन संपवलं आणि त्यांचं घरदार, कुटुंब उघड्यावर आलं.अशाच मुलांच्या पुनर्वसनाची, त्यांच्या राहण्या-खाण्याची, शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलली वाईच्या किसन वीर शिक्षण संस्थेनं. भावी आयुष्याची स्वप्नं डोळ्यांत घेऊन मुलं इथं मोठ्या उमेदीनं आयुष्याला सामोरी जाताहेत..

माझी आई माझ्या लहानपणीच कॅन्सरनं गेली. मी तेव्हा नऊ वर्षांचा होतो. भाऊ आठ तर बहीण दोन वर्षांची. वडिलांनीच आम्हाला सांभाळलं. दिवसभर ते शेतात काम करायचे अन् रात्री स्वत:च भाजी-भाकरी बनवून आम्हाला खाऊ घालायचे... पण दोन वर्षांपूर्वी त्यांनीही आत्महत्या केली. आम्ही रात्री झोपलेलो असताना गुपचूप विष पिऊन आम्हा तिघांना सोडून गेले,’ डबडबत्या पापण्यांनी शुभम भूतकाळ सांगत होता.शुभमचं वय अवघं सोळा. अकाली मृत्युमुखी पडलेल्या आई-बाबांचा फोटो खिशात बाळगून सर्वत्र फिरणारा कोवळा शुभम पुरता हबकलेला होता.

...त्याच्यासारखी असंख्य पोरं वाईच्या कॅम्पसमध्ये राहत होती. वावरत होती. कुणी विदर्भातलं होतं तर कुणी मराठवाड्यातलं. कुणी खान्देशातलं तर कुणी पश्चिम महाराष्ट्रातलं. प्रत्येकाची संस्कृती वेगळी. बोली भाषा वेगळी... मात्र, सगळ्यांचं दु:ख एकच होतं. यातल्या प्रत्येकाचा पिता शेतकरी होता. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची नोंद त्यांच्या नावावर झाली होती.पितृछत्रापासून हरपलेल्या अशा अनेक मुलांना एकत्र आणून त्यांच्या राहण्याचा, खाण्या-पिण्याचा अन् शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचललाय वाईच्या ‘किसन वीर शिक्षण’ संस्थेनं. सातारा जिल्ह्यातील ‘कृष्णा’काठी गेल्या दीड वर्षापासून एकाच छताखाली राहताहेत ही पोरं. पित्याविना पोरकी बनलेली पोरं आईला सोडून शेकडो मैल दूर राहताना कशा पद्धतीनं साजरी करत असतील दिवाळी.. याचा शोध घेण्यासाठी आम्ही दिली या अनोख्या कॅम्पसला भेट; तेव्हा प्रत्येकाच्या बोलण्यातून उलगडत गेली हृदयद्रावक कहाणी...

सह्याद्री डोंगराच्या पायथ्याला निसर्गाच्या कुशीत बांधण्यात आलेल्या नव्या इमारतीच्या भिंतीवर ठळक अक्षरात लिहिलं होतं, ‘जय किसान विद्यार्थी वसतिगृह.’ आतमध्ये प्रवेश करताना प्राचार्य चंद्रशेखर येवले सांगत होते, ‘संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी तीन वर्षांपूर्वी वेगळी कल्पना मांडली. त्यावेळी महाराष्ट्रात आत्महत्या करणाºया कर्जबाजारी शेतकºयांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं होतं. घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी आपण त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे, असं अध्यक्षांनी एका बैठकीत निक्षून सांगितलं. संस्थेनं पुढाकार घेताच आमची यंत्रणा कामाला लागली.’

जवळपास अडीच कोटी रुपये खर्चून वसतिगृहाची सुंदर इमारत उभारली गेली. कुणी वाळू दिली. कुणी सीमेंट पाठवलं. खुद्द कॉन्ट्रॅक्टरनंही पैशाचा तगादा न लावता काम पूर्ण केलं. त्यानंतर प्रतापरावांनी राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याशी बोलून शासकीय पुढाकारासाठी शब्द टाकला. क्षत्रिय यांनीही राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना तत्काळ पत्रं पाठवली. या नव्या प्रकल्पाची माहिती तहसीलदार अन् मंडल अधिकाºयांमार्फत गावोगावी पोहोचवली गेली. विशेष म्हणजे, संस्थेची एक टीम स्वत: विदर्भ अन् मराठवाड्यात ठाण मांडून बसली. मूळचे चंद्रपूरचे; परंतु सध्या संस्थेत नोकरी करणाऱ्या वैद्य नामक प्राध्यापकावर समन्वयाची जबाबदारी सोपविली गेली. त्यांनी विदर्भातील अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची जाणीव त्यांच्या वऱ्हाडी भाषेत करून दिली. अनेक मातांनी काळजावर दगड ठेवून आपल्या पोटच्या पोरांना या वसतिगृहात पाठवलं. यामागं दोन कारणं होती. एकतर पतीच्या पश्चात मुलांना जगवणंही अनेक जणींसाठी जिकिरीचं ठरलं होतं.. अन् दुसरं म्हणजे जीव घेणाऱ्या शेतातून पुढची पिढी तरी बाहेर पडावी, या मतावर काहीजणी ठाम राहिल्या होत्या. अकरावीपासून पदवीपर्यंतच्या पाच वर्षांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी या संस्थेनं घेतली. दीड वर्षापूर्वी म्हणजे जूनमध्ये याठिकाणी ही मुलं वास्तव्यास आली. मात्र, न उमजण्याच्या वयात मृत्यूची जाणीव झाल्यानं आतल्या आत घुसमटलेली ही पोरं जेव्हा इथं आली, तेव्हा त्यांच्या नजरेत होता जगाबद्दलचा प्रचंड अविश्वास. स्वत:चाही खचलेला आत्मविश्वास. आपल्या आयुष्यात काही चांगलंही घडू शकतं, याबद्दलही त्यांना खात्रीच नव्हती.

मुलांच्या रूमबाहेरून फिरताना वसतिगृहाचे रेक्टर सतीश पवार सांगत होते, ‘सुरुवातीला ही पोरं इथं आली तेव्हा बिलकूल बोलत नव्हती. त्यांच्याशी मैत्री केल्यावर, त्यांच्या भावविश्वात शिरल्यावर आता ही पोरं पूर्णपणे मोकळी झालीत. आपल्या भावना व्यक्त करू लागलीत. आतल्या आत धुमसणंही कमी होत गेलंय.’

बोलत-बोलत आम्ही एका खोलीत शिरलो. काही जणांशी गप्पा मारल्या. इकडचा तिकडचा विषय काढत या मुलांना हळूहळू बोलतं केलं गेलं, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ती म्हणजे, ‘यातल्या एकालाही शेतकरी व्हायचं नाही. शेतात पाऊलही टाकायचं नाही.’बुलढाण्याच्या भुईखेड मायंब्यातील गौरव सोनवणे बोलत होता, ‘चार वर्षांपूर्वी वडिलांनी आत्महत्या केली. आता शेतात मजुरी करून आई आम्हा दोघा भावांना जगवतेय. मी इकडं वसतिगृहात आल्यापासून आईची निम्मी काळजी कमी झालीय. वडील गेल्यानंतर मी दहावीला मन लावून अभ्यास केला. ब्याऐंशी टक्के मार्क मिळवले. आता मला आर्मीत जायचंय. आईलाही तिथनं बाहेर काढायचंय.’

चाळीसगावच्या विशाल सूर्यवंशीची तीन एकर शेती असूनही बिनकामाची. बाबांच्या आत्महत्येनंतर न पिकणाऱ्या शेताची पुरती वाट लागली. कुटुंब वाऱ्यावर पडलं. आता तो मोठ्या जिद्दीनं इथं शिकायला आलाय. त्याला पोलीस खात्यात अधिकारी व्हायचंय.औसालगतच्या कारला गावातील ब्रह्मजित पवारचे वडील सहा वर्षांपूर्वी गळफास घेऊन गेले. त्यावेळी नेमकं काय घडलं, हेही त्याला आठवत नाही. त्याचीही इच्छा एकच, ‘शेती करणार नाही. सरकारी नोकरीच बघणार !’ आई-वडील नसलेल्या बीडच्या शुभम भोसलेला तर शिक्षक बनायचंय.विदर्भातल्या ओंकार जगतापची कहाणीही मनाला चटका लावून जाणारी. त्याच्या मोठ्या भावाला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला, तेव्हा फी भरण्यासाठी आई-वडिलांनी खासगी सावकराकडनं कर्ज घेतलं. मात्र, दोन वर्षांपूर्वी पिकानं दगा दिला. अशातच वसुलीचा तगादा मागं लागला. सावकाराची माणसं थेट घरी येऊ लागली. या प्रकाराला घाबरून ओंकारच्या आईनं घरात स्वत:ला जाळून घेतलं. ही घटना गेल्यावर्षीची. तेव्हापासून सुन्न बसून राहणारा ओंकार आता कुठं बोलू लागलाय. त्यालाही कोणत्याही परिस्थितीत पोलीस अधिकारीच व्हायचंय.

नगर जिल्ह्यातल्या घुमरी विजय पांडुळे इथं सर्वात सिनियर विद्यार्थी. वडील गेले त्यावर्षी त्यानं दहावीला चौऱ्यांण्णव टक्के मार्क मिळविले. कर्जत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची हुशारी पाहून तिथल्या काही कार्यकर्त्यांनी पुढची जबाबदारी घेतली. बारावीला हा पठ्ठ्या कला शाखेत जिल्ह्यातून पहिला आला. आता त्याला उपजिल्हाधिकारी परीक्षेचे वेध लागलेत. बोलत असताना विजयच्या डोळ्यात त्याची मोठी स्वप्नं ठळकपणे दिसत होती. जाणवत होती. पितृविरहाचं दु:ख बाजूला सारून आईच्या सुख-समाधानासाठी कष्ट करण्याची त्याची उर्मी अचंबित करणारी होती.

वाईच्या किसन वीर महाविद्यालयाप्रमाणेच साताºयातही रयत शिक्षण संस्थेनं यंदापासून वसतिगृह सुरू केलंय. वाईत अडोतीस तर साताऱ्यात चाळीस मुलं दिवंगत वडिलांचं दु:ख विसरून नव्या उभारीनं अभ्यास करताहेत. वाईच्या वसतिगृहाची क्षमता अडीचशे मुलांची असून, पुढच्या वर्षी ही इमारत पूर्णपणे भरेल, असा आशावाद इथल्या शिक्षकांना वाटतोय. साताऱ्यातही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारधारेतून उभारलेल्या धनिणीच्या बागेजवळील वसतिगृहात अशा मुलांची संख्या वाढविण्याची मोहीम सुरू झालीय.

...फक्त ‘जय किसान’जवळपास अडीच कोटी रुपये खर्चून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह उभं केलं गेलं, तेव्हा संस्थेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे, वसतिगृहात कधीही आत्महत्या हा शब्द उच्चारायचा नाही.. म्हणूनच वसतिगृहाचं नावही ठेवलं गेलं. ‘जय किसान.’.. होय, शेतकऱ्यांचा सन्मान करणारा कृतार्थ शब्द. इमारत उभारल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातून पोरं आली. मात्र, केवळ खाऊ-पिऊ घालून शिक्षण देणं, एवढं एकच ध्येय वसतिगृहाचं नव्हतं. कुटुंबकर्त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळं खचलेल्या या बाल मनांना उभारी देणं, हे आव्हानही इथल्या प्राध्यापकांनी स्वीकारलं. मुलांच्या वाढदिवसाला केस कापणं, महाविद्यालयातील कन्यकांच्या हातून राखी पौर्णिमेला राखी बांधणं, कोजागरी पौर्णिमेला मुलांच्या ‘कलागुणांचा जागर’ करणं... अशा कितीतरी छोट्या-मोठ्या सोहळ्यांमधून मुलांना मानसिक उभारी दिली गेली. हे कमी पडलं की काय म्हणून आपल्या पोटच्या लेकरांचा वाढदिवसही वसतिगृहातील मुलांसोबत करण्याचा प्रयोग अनेक प्राध्यापकांनी केला.

..माणुसकी हसली!आई-वडील नसलेल्या शुभमला मध्यंतरी अ‍ॅपेंडिक्सच्या त्रासामुळं वाईच्या दवाखान्यात पाच-सहा दिवस अ‍ॅडमिट केलं गेलं. त्यावेळी त्याच्यासाठी दवाखान्यात रोज एका प्राध्यापकानं शहाळं आणलं. दुसऱ्यानं फळं आणली. तिसरा रात्रभर त्याच्यासोबत जागून राहिला. घरच्या आपुलकीइतकीच मायेची ऊब मिळाल्यानं शुभम दवाखान्यातच डोळे भरून रडला... कारण मराठवाडा अन् विदर्भातल्या दु:खावर हळुवार फुंकर मारण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी ज्या पद्धतीनं हिरिरीनं पुढं सरसावली होती, ते पाहून जणू.. नियती रुसली तरी माणुसकी हसली होती!