- अविनाश साबापुरे
कीर्तनाच्या नावाने समाजाला केवळ शब्दांच्या बुडबुड्यांवर हेलकावत ठेवायचे अन् लाख दोन लाखांची बिदागी मिळवून तथास्तु म्हणायचे. या बोलघेवड्या कीर्तनकारांच्या वावटळीत ‘सत्यपाल’ महाराजांचे वर्तन मात्र सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून गेले.मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. वर्धा जिल्ह्यात सत्यपाल महाराजांचे कीर्तन सुरू होते. तेवढ्यात दु:खद निरोप आला. घरी अकोटमध्ये (जि. अकोला) सत्यपाल महाराजांची आई गेली होती. पण समाजप्रबोधनाचे काम करीत असताना ते अर्धवट ठेवून जायचे नाही, हा निर्धार कायम ठेवत सत्यपाल महाराजांनी कीर्तन सुरूच ठेवले. नंतर घरी जाऊन आईचे अंत्यदर्शन घेतले. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात आईचे देहदान केले. तेरवी, केशदान हे सोपस्कार टाळून गरजू नागरिकांना अन्नदानाचा संकल्प जाहीर केला.दुसऱ्याच दिवशी यवतमाळ जिल्ह्यातल्या जांब गावात कीर्तनाची तारीख ठरलेली होती. गावकऱ्यांना वाटले, महाराजांची आई गेली आहे. एवढ्या दु:खात सत्यपाल महाराज कदाचित जांब गावात पोहोचणार नाहीत. पण आश्चर्य, ठरलेल्या वेळी घड्याळाच्या काट्यावर बरोब्बर महाराज पोहोचले अन् तेवढ्याच तन्मयतेने कीर्तनही केले. गावकºयांनी सुरूवातीला सत्यपाल महाराजांची आई सुशीलाबाई चिंचोळकर यांची प्रतिमा ठेवून श्रद्धांजली अर्पण केली.पण आई होती तेव्हा, आई गेली त्यावेळी आणि आईचे देहदान केल्यावर सत्यपाल महाराजांची सत्यवाणी होती तशीच ताठर, प्रामाणिक राहिली. कीर्तनापेक्षाही काकणभर अधिक प्रामाणिक वर्तन ठेवणारे सत्यपाल महाराज म्हणूनच विदर्भवासीयांच्या गळ्यातले ताईत आहेत. राहणार आहेत.कित्येक लिहित्या पोरांचे पुस्तक स्वखर्चाने छापून देण्याचे साहित्यिकांपेक्षाही थोर कार्य सत्यपाल महाराजांनी केले आहे. तीन वर्षांपूर्वी मुंबईतल्या कार्यक्रमात एका माथेफिरूने त्यांच्यावर चाकूहल्ला केला, तेव्हा रस्त्यावर मोर्चे निघाले नाहीत, की निषेधाचे आंदोलन झाले नाही. कारण खुद्द सत्यपाल महाराजांनीच लगेच जाहीर केले, ‘मरने से क्या डरना?’ सध्या काही महाराजांचे अनुयायी जरा टीका झाली की जसे मोर्चे काढतात, तशी आक्रमक भूमिका ना सत्यपाल महाराज घेतात ना त्यांचे चाहते घेतात. कारण त्यांचा विश्वास आहे, स्वत:च्या वर्तनावर. तोच विश्वास समाज पेरण्याचे सत्कार्य सत्यपाल महाराजांच्या हातून कायम घडत राहो.
आईची इच्छा होती विमानात बसण्याची...