शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जेम्स बॉण्ड आणि कॉनरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 06:00 IST

जेम्स बॉण्डला शॉन कॉनरीनं लोकप्रिय केलं. आपलं स्टारपद आणि अभिनेता असणं, या दोन्हीचा पुरावा मागे सोडून तो गेला. अलीकडच्या क्षणिक लोकप्रियतेच्या काळात त्याची ही दुहेरी कारकीर्द कोण विसरू शकेल?

ठळक मुद्देजर एखादा उत्तम अभिनेता काही कारणाने स्टारपदाला पोहोचला आणि एखाद्या भूमिकेच्या साच्यात अडकला, तर त्याची परिस्थिती फार बिकट होते. कॉनरीचं काहीसं तसंच झालं.

- गणेश मतकरी

साध्या शब्दात सांगायचं, तर बॉण्ड हा चित्रपटात सुपरहिरोजना लोकप्रियता मिळायला लागण्याआधीचा सुपरहिरो होता. त्याचं सुटाबुटात वावरणं, थोरामोठ्यांच्यात सहजपणे मिसळणं, गाड्या, मद्य आणि मदनिका यांचं प्रेम उघडपणे मिरवणं, हीच त्याची सिक्रेट आयडेन्टिटी होती. वेळ पडताच हा सारा श्रीमंती दिखावा क्षणात बाजूला करून तो मैदानात उतरे आणि कोणत्याही घोर संकटाशी दोन हात करायला मोकळा होई. शॉन कॉनरीने १९६२ मध्ये याच वैशिष्ट्यांसह बॉण्ड पहिल्यांदा उभा केला तो डॉ. नोचित्रपटात आणि पुढल्या सहा चित्रपटांमधून ही ब्रिटिश हेरसंस्था एमआय सिक्सचा सुपरस्पाय असलेल्या बॉण्डची प्रतिमा त्याने प्रेक्षकांच्या मनात ठसवली.

उत्तम नट आणि स्टार्स हे बहुधा वेगवेगळे असतात. स्टार्स एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेत लोकांना आवडतात. त्यांच्या अभिनयाचा आवाका फार असतो असं नाही; पण त्या भूमिका त्यांच्या चाहत्यांना इतक्या पसंत असतात, की ही मर्यादा कुठच्या कुठे लपून जाते. याउलट उत्तम अभिनेते, हे नित्य नव्या आव्हानांच्या शोधात असतात. जर एखादा उत्तम अभिनेता काही कारणाने स्टारपदाला पोहोचला आणि एखाद्या भूमिकेच्या साच्यात अडकला, तर त्याची परिस्थिती फार बिकट होते. कॉनरीचं काहीसं तसंच झालं. त्यामुळे बॉण्डने प्रचंड लोकप्रियता आणि पैसा देऊनही, हे यश त्याला खुपायला लागलं आणि १९७१च्या डायमन्ड्स आर फरेव्हरनंतर त्याने चक्क या भूमिकेला रामराम ठोकला. मधल्या काळात आल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित मार्नी’ (१९६४) पासून सिडनी लुमेट दिग्दर्शित द ॲन्डरसन टेप्स’ (१९७१) पर्यंत वेगवेगळ्या भूमिका तो करतच होता; पण त्यांना बॉण्डसारखं यश मिळत नव्हतं हेही त्याच्या मनाला डाचत होतं. बॉण्डला सोडायचा निर्णय घेतल्याने तो मोठ्या प्रमाणात आपल्याला हवं ते काम करायला मोकळा झाला आणि लवकरच जॉन ह्यूस्टन दिग्दर्शित द मॅन हू वुड बी किंग’ (१९७५) हा महत्त्वाचा चित्रपट त्याला मिळाला.

कॉनरी आणि त्याच्याबरोबरचा त्याच तोलाचा अभिनेता मायकल केन, या दोघांनीही आपापल्या कारकिर्दीतला हा सर्वात आवडता चित्रपट असल्याचं वेळोवेळी सांगितलं आहे. ‘अ ब्रिज टू फार’ (१९७७), टाइम बॅन्डीट्स (१९८१) अशा काही महत्त्वाच्या चित्रपटांमधून भूमिका केल्यावर त्याने १९८३ मध्ये म्हणजे वयाच्या बावन्नाव्या वर्षी अखेरचा बॉन्डपट केला. या चित्रपटाचं नेव्हर से नेव्हर अगेनहे शीर्षक, हा बॉण्डपटांमधून एकदा निवृत्ती घेतल्यावर पुन्हा माघार घेऊन भूमिका स्वीकारणाऱ्या कॉनरीलाच टोमणा आहे.

कॉनरीने उभी केलेली प्रतिमा पुढे येणाऱ्या बॉण्ड्सनी बरीचशी तशीच ठेवली, जरी त्या त्या अभिनेत्यानुसार आणि तत्कालीन समाजविचारानुसार त्यात फरक पडत गेले. ही भूमिका साकारणाऱ्या इतरांपैकी रॉजर मूर, पीअर्स ब्रोस्नॅन आणि सध्याचा बॉण्ड डॅनिएल क्रेग यांनी या भूमिकेत आपापली शैली ओतली आणि भरपूर लोकप्रियताही मिळवली; पण संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीने ही भूमिका साकारणारा क्रेगच ठरला. अर्थात त्याला आधुनिक संवेदनशीलतेला प्रमाण मानणाऱ्या संहितांचीदेखील मदत होती. यातल्या प्रत्येक बॉण्डचे आपापले चाहते आहेत, पण त्यातलेही बहुतेक जण या पात्राला प्रथम घडवण्याचं श्रेय कॉनरीला नक्कीच देतील.

बॉण्डला कायमचं सोडल्यानंतर शॉन कॉनरीने आपली संपूर्ण नवी ओळख बनवली, जे काम फारसं सोपं नसतं. ज्या भूमिकेने अभिनेत्याला लोकप्रिय केलं, त्याच प्रकारच्या भूमिका त्यांच्याकडे येत राहाण्याची शक्यता असते. अशावेळी संयम आणि विश्वास या दोन गोष्टी फार उपयोगी पडतात. व्यावसायिक चित्रपटात मिळेल ते काम न स्वीकारता, कॉनरीने संहितांच्या गुणवत्तेचा विचार करूनच निवड केली. काही चांगल्या भूमिका त्याने नाकारल्याही, पण ज्या केल्या त्या किती अचूक निवडलेल्या होत्या हे या पुढल्या काळातल्या चित्रपटांवरून सहज लक्षात येईल. उम्बेर्तो एकोच्या ऐतिहासिक रहस्यकादंबरीवर आधारित द नेम ऑफ द रोज’ (१९८६), प्रोहिबिशनच्या दिवसात अल कपोन या कुप्रसिद्ध गॅंगस्टरबरोबर लढा देणाऱ्या चमूची कथा सांगणारा अनटचेबल्स’ (१९८७), सबमरीन ड्रामा द हन्ट फॉर रेड ऑक्टोबर’ (१९९०), अशा चित्रपटांनी त्याला नवी ओळख आणि लोकप्रियता हे दोन्ही दिलं. अनटचेबल्समधल्या निर्भीड आयरिश पोलीस अधिकारी जिमी मलोन या भूमिकेसाठी त्याला सहाय्यक भूमिकेचं ऑस्करही मिळालं. स्टीवन स्पीलबर्गच्या इंडिआना जोन्स ॲण्ड द लास्ट क्रूजेड’ (१९८९) मधली इंडिआनाच्या विक्षिप्त बापाची भूमिका त्याची नंतरच्या काळातली कदाचित सर्वात लोकप्रिय भूमिका असेल. २००० सालची गस व्हान सान्त दिग्दर्शित फाइन्डींग फॉरेस्टरमधली अज्ञातवासात रहाणाऱ्या विद्वान प्राध्यापकाची भूमिका ही त्याच्या शेवटच्या महत्त्वाच्या भूमिकांमधली एक. पुढल्या एक-दोन चित्रपटांनी त्याला मनासारखं समाधान न दिल्याने त्याचा हॉलिवूडवरचाच विश्वास उडला आणि त्याने २००६मध्ये चक्क निवृत्ती घेतली.

ऑक्टोबरअखेरीस शॉन कॉनरी गेला, तो त्याचं स्टारपद आणि त्याचं अभिनेता असणं, या दोन्हीचा पुष्कळसा पुरावा मागे सोडून. अलीकडच्या क्षणिक लोकप्रियतेच्या काळात त्याची ही दुहेरी कारकीर्द कोण विसरू शकेल !

(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)

ganesh.matkari@gmail.com