नाथुलाचा पराक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 06:03 AM2020-06-28T06:03:00+5:302020-06-28T06:05:08+5:30

1962च्या चीनबरोबरच्या युद्धातील  पराभवाचा सर्वसामान्यांच्या मनावर एवढा  खोल ओरखडा उमटला आहे, की बर्‍याचदा ही पराभूत मनोवृत्ती डोके वर काढीत असते. पण त्यानंतर पाचच वर्षांनी भारतीय लष्कराने नाथुला खिंडीत चीनच्या तीनशेपेक्षाही जास्त सैनिकांना ठार मारून त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्यांना पळताभुई थोडी केली होती ! भारतीय जनतेला हा इतिहास माहीत नसला, तरी भारतीय आणि चिनी सैनिकांच्या मनात मात्र हा इतिहास ताजा आहे. चिन्यांना आपण हरवू शकतो, ही हिंमत आपल्याला याच लढाईनं दिली. तिच हिंमत आज भारतीय सैनिक लडाखमध्ये दाखवतो आहे. काय आहे, या लढाईचा इतिहास?

Indian brave soldiers taught lesson to China at Nathula Pass in 1967.. | नाथुलाचा पराक्रम!

नाथुलाचा पराक्रम!

Next
ठळक मुद्देचिन्यांना घाबरण्याचे कारण नाही हा धडा या लढाईने भारतीय सैनिकांना मिळाला. त्याचे प्रत्यंतर आता लडाखमध्ये येत आहे.

- दिवाकर देशपांडे
गेल्या एप्रिल महिन्यापासून भारत-चीन सीमेवर जसजसा तणाव वाढू लागला तसे भारतीय जनमानसात 1962च्या भारत-चीन युद्धातील पराभवाच्या आठवणी उमटू लागल्या. त्या पराभवाचा ओरखडा एवढा खोल आहे की, त्यामुळे भारतीयांमध्ये रुजलेली पराभूत मनोवृत्ती अजूनही डोके वर काढीत असते.
पण ज्यांनी या पराभूत मनोवृत्तीवर मात केली आहे, ते मात्र 1962चा हा पराभव विसरून 1967च्या नाथुला खिंडीत झालेल्या चमकदार अशा भारत चीन चकमकीची आठवण काढतात.
कारण 1962 नंतर केवळ पाच वर्षांनी झालेल्या या चकमकीत भारतीय लष्कराने 300 पेक्षाही अधिक चिनी सैनिकांना ठार मारून चीनच्या तोंडचे पाणी पळवले होते. हा एवढा चमकदार पराक्रम असूनही तत्कालीन सरकारने तो भारतीय जनतेपासून का लपवला हे एक कोडेच आहे.
भारताने 1965चे पाकिस्तानविरुद्धचे युद्ध जिंकल्यामुळे भारतीय लष्करात एक आत्मविश्वास निर्माण झाला होता, तसेच त्या युद्धाच्या अनुभवानंतर भारतीय लष्कराला आवश्यक असलेली सर्व सामग्री मिळू लागली होती. 1965च्या भारत-पाक युद्धात चीनने उत्तर सीमेवर अचानक जमावाजमव करून भारतावर दबाव टाकण्याचा प्रय} केल्यामुळे भारताने सिक्कीमजवळील नाथुला व चोला या खिंडीची संरक्षण व्यवस्था मजबूत करून त्या विभागाच्या संरक्षणाची जबाबदारी लष्कराच्या पूर्व विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या 17व्या इन्फन्ट्री डिव्हिजनकडे सोपवली होती.
या डिव्हिजनचे नेतृत्व होते मेजर जनरल सगतसिंग यांच्याकडे. सगतसिंग हे एक अत्यंत जागरूक व कर्तव्यदक्ष असे लष्करी अधिकारी होते. त्यांनी नाथुला खिंडीच्या संरक्षणाची जबाबदारी 11वी गोरखा व दुसरी ग्रेनेडिअर्स या बटालियनकडे सोपविली होती. शिवाय मदतीला छोटा तोफखानाही होता.
या भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आखलेली नव्हती, त्यामुळे भारतीय व चिनी सैन्यात सध्यासारखेच वारंवार वाद उद्भवत. त्याचा भारतीय सैनिकांना त्रास होत असे. वादाचे हे कारण कायमचे मिटवले पाहिजे या हेतूने सगतसिंग यांनी नियंत्रण रेषेवर तारांचे कुंपण घालण्याचा निर्णय घेतला. या भागाची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचा सगतसिंग यांना अधिकार होता व त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला. कुंपण घालण्याची जबाबदारी ग्रेनेडिअर्स बटालियनच्या एका तुकडीवर सोपवली. 


हे  कुंपण घालताना चिनी सैनिक काही कुरापत काढण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी अन्य सर्व तुकड्यांनाही सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. कुंपण घालण्याची जबाबदारी 120 सैनिकांच्या एका तुकडीवर सोपविण्यात आली होती व त्यांच्या कमांडिंग ऑफिसरने मागे राहून त्यावर देखरेख करावी असे ठरले होते. हे सैनिक पाच - सहा ठिकाणी कुंपण घालण्याचे काम करीत असतानाच सुमारे 150 चिनी सैनिकांची एक तुकडी तेथे आली व तिने हे काम ताबडतोब थांबवण्यास सांगितले. पण भारतीय सैनिकांनी त्यांच्याकडे लक्ष न देता आपले काम चालू ठेवले. त्यामुळे चिनी सैनिकांनी  कुंपणाचे खांब लाथा मारून पाडण्याचा प्रय} सुरू केला, त्यातून वादावादी व बाचाबाची सुरू झाली. 
चिनी तुकडीच्या पॉलिटिकल कॉमिसारने एका सैनिकाशी वाद घालण्यास सुरुवात केल्यावर एका उंचपुर्‍या सैनिकाने त्याची कॉलर धरून त्याला मागे ढकलले. चिनी सैन्यातील पॉलिटिकल कॉमिसार हा वयाने ज्येष्ठ सैनिक असतो, त्याला अशी वागणूक दिल्यामुळे चिनी सैनिक एकदम शांत झाले आणि मागे फिरून आपल्या बंकरमध्ये निघून गेले. पण तेथे जाऊन चिनी सैनिकांनी आपल्या रायफली व मशीनगन सज्ज करण्यास सुरुवात केली. 
चिनी सैनिक असे अचानक गेल्यामुळे काही तरी विपरीत घडणार याची भारतीय सैनिकांना कल्पना आली, त्यामुळे मागे राहून देखरेख करणारे कमांडिंग ऑफिसर कर्नल रायसिंग हे धीर देण्यासाठी कुंपण घालणार्‍या  सैनिकांजवळ येऊन उभे राहिले. 
सकाळी आठची वेळ होती. वादावादी थांबल्यामुळे वातावरणात एक शांतता पसरली होती; पण ती वादळापूर्वीची शांतता ठरली. कारण काही क्षणातच एक इशारा देणारी शीळ वाजली आणि मशीनगनमधून धडाधड फैरी सुरू झाल्या. पहिल्या फैरीतच कर्नल रायसिंग यांना लक्ष्य करण्यात आले व त्यांनी सीमेवरच देह ठेवला. कुंपण घालणारे बाकीचे सैनिकही धडाधड कोसळू लागले. या गोळीबारात 120 सैनिकांपैकी जवळ जवळ सर्व जखमी झाले होते किंवा ठार झाले होते. 
नंतर अध्र्या तासातच चिन्यांचा तोफखाना धडाडण्यास सुरुवात झाली व त्याने पिछाडीकडील सर्व भारतीय तळांवर मारा सुरू केला. त्यामुळे भारतीय तळांवर गोंधळ माजला. या मार्‍याला तोफांचा प्रतिमारा करूनच उत्तर देणे आवश्यक होते; पण त्यावेळी लष्कराला चिनी सीमेवर पूर्वपरवानगीशिवाय तोफा वापरण्याची अनुमती नव्हती. 
ही परवानगी थेट संरक्षण मंत्र्यांकडून घ्यावी लागत होती. त्यामुळे एकच उपाय होता, तो म्हणजे चिनी बंकरपर्यंत जाऊन, आत शिरून तेथील सैनिकांचा खात्मा करणे. पण तेथून मशीनगन आक ओकत असताना बंकरच्या आसपास फिरणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण होते. काही शूर सैनिकांनी तसा प्रय} केला; पण तो फसला. आता चिनी मशीनगन शांत राहणार नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यासमोरच्या भारतीय चौकीवर एकही भारतीय सैनिक जाऊ शकणार नव्हता.
तोफांचा प्रतिमारा हाच एक उपाय होता. पण दिल्लीत बसलेल्या संरक्षण मंत्र्यांकडून परवानगी मिळवणे सोपे नव्हते. ही परवानगी येण्यास किमान पाच-सहा तास लागणार होते. तोफखानादल सज्ज होते; पण आदेश मिळेपर्यंत त्यांना हातावर हात ठेवून थांबणे भाग होते. असे असले तरी भारतीय सैनिकांच्या दोन तीन तुकड्या छोटे डोंगर व मोठय़ा शिळांच्या आडून चिनी बंकरवर फैरी झाडत होते; पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. त्यातून चिनी सैनिकांना इतकेच कळत होते की भारतीय सैनिक अद्याप प्रतिकार करण्याच्या अवस्थेत आहेत.
हे सर्व कळल्यानंतर स्वत: मेजर जनरल सगतसिंग घटनास्थळी आले. त्यांनी सर्व सैनिकांना एकत्र केले. त्यांनी तोफखानादलाचे दोन आघाडीचे टेहळणी सैनिक खिंडीच्या दोन टोकाला असलेल्या दोन उंच शिखरावर बसवले होते, त्यांना तेथून संपूर्ण रणक्षेत्र व चिनी बंकर स्पष्ट दिसत होता. काहीही करून तोफखान्याचा वापर करणे आवश्यक होते, त्यासाठी सगतसिंग यांनी कोअर कमांडर लेफ्ट. जनरल जगजितसिंग अरोरा व पूर्व विभागाचे प्रमुख ले. जनरल माणेकशा यांच्याशी संपर्क  साधला. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. 
त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी एका महत्त्वाच्या बैठकीत होत्या. अशा परिस्थितीत लवकर परवानगी मिळणार नाही हे लक्षात आल्यामुळे सगतसिंग यांनी कोणत्याही परवानगीची वाट न पाहता तोफखान्यास मारा सुरू करण्याचा आदेश दिला. त्यानंतर भारतीय तोफखान्याने अशी काही आग ओकण्यास सुरुवात केली की, समोरचा चिनी बंकर तर उद्ध्वस्त झालाच; पण नाथुला, चोलाच्या चिनी ठाण्यापर्यंत रसद पोहचवणारा यातुंग खोर्‍याकडून येणारा चिनी रस्ताही नष्ट झाला. 
दरम्यान, पंतप्रधानांकडून तोफखाना वापरण्यास संमती आली आणि मग भारतीय तोफखान्याने प्रचंड मारा सुरू केला. चिनी ठाण्यांच्या पिछाडीला असलेले ट्रक, अन्य वाहने, दारूगोळा, युद्धसामग्री पूर्णपणे नष्ट झाली व संपूर्ण चिनी प्रदेश भारतीय सैन्यास घुसण्यासाठी मोकळा झाला. त्या संपूर्ण प्रदेशात त्यावेळी जवळपास 300 सैनिक मरून पडले होते व 450च्या वर सैनिक जखमी अवस्थेत पडले होते. 
चिनी सैनिकांनी तोफांचा मारा केला नसता तर ही फक्त चिनी बंकर व भारतीय ठाण्यापुरती र्मयादित चकमक ठरली असती; पण चिनी अधिकार्‍यांनी त्यांना प्रतिकूल असणार्‍या  भूभागात तोफखान्याचा मारा करण्याची चूक केली. भारताची ठाणी या भागात उंचावर असल्यामुळे भारतीय टेहळणी पथकास चिनी भूभाग व तेथील चिनी ठाणी स्पष्टपणे दिसत होती, त्याचा फायदा भारतीय तोफखान्यास झाला. 
11 ते 14 सप्टेंबर 1967 या काळात ही घटना घडली. शेवटी, भारतीय तोफखान्याचा मारा थांबला नाही तर आम्ही हवाईहल्ले करू असा संदेश चीनने पाठवल्यावर परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून भारतीय तोफांचा मारा थांबवण्यात आला.
या लढाईत 88 भारतीय सैनिकांना हौतात्म्य आले तर 150 सैनिक जखमी झाले. नंतर या हल्ल्याचा बदला घेण्याचा विचारही चिनी लष्करी नेतृत्वाच्या मनास शिवला नाही. नाथुला सीमा तेव्हापासून शांत आहे. आताही चिनी सैन्याची विविध ठिकाणी घुसखोरी चालू असताना नाथुला खिंड मात्र शांत आहे. चिन्यांना घाबरण्याचे कारण नाही हा धडा या लढाईने भारतीय सैनिकांना मिळाला. त्याचे प्रत्यंतर आता लडाखमध्ये येत आहे.

diwakardeshpande@gmail.com
(लेखक आंतरराष्ट्रीय घडमोडींचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Indian brave soldiers taught lesson to China at Nathula Pass in 1967..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.