- अजय परचुरे
(छायाचित्र : दत्ता खेडेकर)1. मेट्रो-३च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावर सध्या सात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम सुरू आहे. या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील आझाद मैदान ते ग्रॅण्टरोडपर्यंत ४.५ कि.मी. लांबीच्या भुयारीकरणाचं काम सध्या सुरू आहे.2. जमिनीपासून २१ मीटर खोल, बाहेरची हवा, सूर्यप्रकाश याचा साधा लवलेशही नाही, जिथे मोबाइलची रेंजही मिळत नाही अशा मेट्रोच्या बोगद्यात तंत्रज्ञ, अभियंते आणि कामगार आपल्या जिवाची बाजी लावून रात्रंदिवस काम करतात.3. टनेल बोअरिग्ां मशीन खाली उतरवून खणण्यात येत असलेले बोगदे. लांबच लांब असलेल्या या बोगद्यात काम करत असताना कामगारांना श्वास घेण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये यासाठी सुसह्य असे ब्लोअर ठिकठिकाणी आहेत.4. टीबीएम हा मेट्रो-३ प्रकल्पाचा श्वास. टीबीएम म्हणजे टनेल बोअरिंग मशीन. या मशीनने सर्वप्रथम बोगदा खणला जातो. बोगदा खणताना त्यात जमा होणारा राडारोडा ट्रॅकवर असलेल्या मालगाडीत भरला जातो. बोगदा संपूर्णपणे खणल्यानंतर बोगद्याला आतून मजबूत सिमेंट-काँक्रीटचे बांधकाम केले जाते.5. यानंतर या बोगद्यामध्ये स्वतंत्र सेगमेंट बसवल्या जातात ज्यासाठी अजस्र अशा टीबीएम मशीनचा वापर केला जातो. एक एक सेगमेंट तयार झाली की एक इंच जाड आणि एक फूट लांब स्क्रूच्या साहाय्याने एक एक करून बोगद्यातील सर्व सेंगमेंटला जोडली जातात. अशा प्रकारे त्या बोगद्यातील प्रत्येक सेगमेंट ही एकमेकांशी जोडली जाऊन बोगद्याची एक अभेद्य कमान तयार होते.6. बोगदा खणताना आणि खणून झाल्यानंतर सेगमेंट बसवताना योग्य ती काळजी घेण्यासाठी प्रत्येक बोगद्यापाशी एक टीबीएम कंट्रोल रूम आहे. या कंट्रोल रूममध्ये लावलेल्या स्क्रीनच्या साहाय्याने येथे कार्यान्वित असलेले अभियंते टीबीएम मशीन चालवतात.7. भूगर्भात ६५ फूट खोल भुयारीकरणासाठी क्रेनच्या साहाय्याने बोगदा खणून काढण्यासाठी अगदी नेमकेपणाने माल उतरवला जात असतो. हे अतिशय आव्हानात्मक काम आहे व बोगदा तयार करण्यासाठी बोगदा खोदण्याची यंत्रं आणि छेद व आच्छादन पद्धतीने किंवा एनएटीएम किंवा ह्या दोहोंच्या एकत्रीकरणाने करण्यात येत असते. दररोज सुमारे १० ते १२ मीटर अंतर बोगदा तयार होतो.8. भूगर्भात आॅक्सिजनची कमतरता असल्याने बोगद्याचं काम सुरू असताना फक्त २० कामगारांना आत प्रवेश मिळतो. खोदकाम सुरू असताना मिथेन, सल्फर, नायट्रोजन डायआॅक्साइड हे वायू तिथे काम करणऱ्या कामगारांना त्रासदायक ठरू शकतात. या वायूंचं नियंत्रण करणारी अतिशय सक्षम यंत्रणा बोगद्यात असते. प्रत्येक तासाला वायूची पातळी तपासलीच जाते. पातळी जर वाढली तर कामगारांना प्लॅन्टमधून तात्काळ बाहेर काढण्यात येते.9. खोदकाम होत असताना मोठ्या प्रमाणावर घर्षण होत असतं. त्यामुळे प्रसंगी आग लागण्याची शक्यताही जास्त असते. असा काही प्रसंग आल्यास टीबीएम मशीन तात्काळ थांबवण्यात येतं आणि पाण्याचे फवारे उडवणारी यंत्रणा तात्काळ सुरू करण्यात येते.10. यात जर कोणाला दुखापत झाली तर चार स्ट्रेचरधारी आणि दोन रेस्क्यूमॅन आणि रुग्णवाहिका कायम बोगद्यात तैनात असतात.(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)