शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

फक्त गांधीच.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 6:00 AM

राग, द्वेष, वैर, हिंसा व युद्ध या सार्‍या  महामार्‍यांवरचा एकमेव गुणकारी उपाय  गांधी हा आहे. प्रेम, मैत्री, बंधुता,  अहिंसा व चर्चेने प्रश्न सोडवण्याचा मार्ग ते सांगतात.  आजच्या जगात या गोष्टी   गांधीजींएवढय़ा प्रभावीपणे सांगणारा नेता  कुठेही अस्तित्वात नाही. मात्र गांधी नसले  तरी त्याचा मंत्रविचार आजही जीवित आहे  आणि तो जागवित आजच्या जगासमोरचे  सारे प्रश्न सोडवू शकणारा आहे.  

ठळक मुद्देमहात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त.

- सुरेश द्वादशीवार

आजचे जग ज्वालामुखीच्या तोंडावर बसले आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन व उत्तर कोरिया या देशांची शस्रागारे अण्वस्रांनी आणि क्षेपणास्रांनी भरली आहेत व ती सज्ज आहेत. या देशांत आता भारत, पाकिस्तान, इराण व इस्रायल यांचीही भर पडली आहे. 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर जे बॉम्ब अमेरिकेने टाकले त्या बॉम्बहून किमान 1 हजार टक्के अधिक मोठी हानी करणारे बॉम्ब्ज या शस्रागारांत आहेत. 1962 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे संरक्षणमंत्री रॉबर्ट मॅकन्मारा म्हणाले, ‘अध्यक्षांनी अणुयुद्धाचा आदेश देताच अवघ्या सहा मिनिटात आम्ही दोन तृतीयांशाएवढे जग बेचिराख करू शकतो.’ या गोष्टीला 55 वर्षे झाली. आता हे जग बेचिराख करायला या अण्वस्रधारी जगाला बहुदा एखादा मिनिट पुरे होईल. जगातले सगळे महासागर अण्वस्रधारी महानौका वाहणारे आहेत. शिवाय या देशांमध्ये त्यांची अण्वस्र भूमिगतही राखून ठेवली गेली आहेत. महत्त्वाची बाब ही की यातील एकाही देशाची दुसर्‍याशी खरी मैत्री नाही. मोदी आणि इम्रान खान, ट्रम्प आणि किम किंवा पुतीन आणि शिपिंग यांची मने परस्परांविषयी फारशी स्वच्छ नाहीत. त्यांचे मैत्रीचे जाहीरनामेही हातचे काही राखून सांगत असतात. शिवाय अणुयुद्धाला एखादेही लहानसे निमित्त कारणीभूत होते. 1962 मध्ये क्युबाच्या प्रश्नावर अमेरिका आणि रशिया यांच्यात ते फक्त सुरूच व्हायचे राहिले होते. ज्या वैमानिकाने हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकले त्यांनी आपला पश्चात्ताप व्यक्त करताना गांधीजींचे शब्द उच्चारले. ते म्हणाले, ‘यापुढे एकतर अहिंसा राहील किंवा अस्तित्वहीनता असेल.’ जगातील हुकूमशहांची आजची संख्या 49 एवढी आहे. त्यांची त्यांच्या देशावर असलेली हिंस्र दहशत मोठी आहे. माणसे मारणे वा त्यांना देशोधडीला लावणे हा त्यांच्या लहरीचा भाग आहे. हे सारे हुकूमशहा येत्या 25 वर्षांत नाहिसे होतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र ते जोवर खरे होत नाही तोवर जगाला त्यांची दहशत बाळगणे भाग आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की याच काळात अनेक लोकशाही देश हुकूमशाहीच्या मार्गाने जाताना दिसत आहेत. त्यातल्या काहींनी वर्णाच्या, काहींनी धर्माच्या तर काहींनी प्रादेशिक र्शेष्ठतेच्या खोट्या कल्पना उराशी बाळगल्या आहेत. जगाच्या इतिहासात आजवर 14 हजारांहून अधिक युद्धे झाली आहेत. त्यातली 12 हजारांवर युद्धे धर्माच्या नावाने झाली. शेकडो वर्षांच्या इतिहासात झालेल्या या तथाकथित धर्मयुद्धांनी किती निरपराधांचा जीव घेतला असेल याची कल्पना आपण करू शकतो. गांधीचा धर्म सार्‍यांना कवेत घेणारा व सर्वधर्मांच्या ठायी एकात्मता पाहणारा होता. त्यात धर्मयुद्ध बसणारे नव्हते तर मनुष्यधर्माची उपासना येणारी होती. एकट्या विसाव्या शतकात जगातल्या हुकूमशहांनी त्यांच्या विचारांधतेपायी वा लहरीपायी ठार मारलेल्या वा मरायला सोडलेल्या स्वदेशी लोकांची संख्या 16 कोटी 90  लक्ष एवढी असल्याचे मार्क पामर हा अमेरिकी अभ्यासक आकडेवारीनिशी सांगतो. त्यात हिटलरने दोन कोटी, स्टॅलिनने पाच तर माओने सात कोटी माणसे मारली आहेत. या मरणार्‍यांत युद्धात मृत्यू पावलेल्यांचा समावेश नाही हे येथे उल्लेखनीय. या तिघांखेरीज जगात असलेल्या लहानसहान हुकूमशहांनीही आपली माणसे या ना त्या कारणाखातर मारली आहेत. गांधी हे सार्‍या हिंसाचारावरचे प्रभावी उत्तर आहे. माणसांची मने सर्व तर्‍हेच्या अहंतांपासून मुक्त झाली व ती माणसामाणसांत एकात्मता पाहू व अनभवू शकली तर हा हिंसाचार काही काळातच थांबू शकतो व तत्त्वज्ञांना हवे असलेले जग एकत्र आणू शकतो. भारत हा बहुधर्मी, बहुभाषी व सांस्कृतिकबहुल असा देश आहे. त्यातील प्रत्येकाविषयीचा जनतेतील अहंभावही मोठा आहे. अल्पसंख्यकांवरील हिंस्र हल्ले सध्या मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. जातींच्या अस्मिता टोकदार झाल्या आहेत आणि भाषेविषयीचे दुराग्रहही रस्त्यावर आले आहेत. या अहंता पूर्वीही होत्या. धर्मांचे, जातींचे व भाषांचे वैर तेव्हाही होते. मात्र गांधीजींच्या नेतृत्वाचा स्वातंत्र्यलढय़ातील काळ या सार्‍यांचा देशाला विसर पाडणारा होता. त्या लढय़ात सहभागी झालेले लोक जात, पात, धर्म, भाषा इत्यादींचे वेगळेपण विसरले होते. गांधींचे अनुयायी पाहिले तरी त्यांच्या अशा सर्वसमावेशक व राष्ट्रनिष्ठ स्वरूपाची कल्पना येऊ शकते. गांधींच्या काळात दबलेल्या वा विसरल्या गेलेल्या या अहंता त्यांच्या पश्चात पुन्हा डोके वर काढून व हिंस्र बनून का उभ्या राहिल्या? गांधींच्या विचारांचा व आचारांचा प्रभाव या सार्‍यांना त्यांचे हे स्वरूप विसरायला कसा लावू शकला? ज्याचे व्यक्तिमत्त्व थेट माणुसकीला आवाहन करते व माणसाचे माणूसपण जागवते त्या नेत्यालाच असे करता येणे शक्य होते. इतरांचे नेतृत्व जातीधर्मांच्या अस्मितांवरच उभे होते. या सार्‍यांवर मात करणारा देशभक्तीचा जागर एकट्या गांधींनाच जमल्याचे या देशाच्या इतिहासाने पाहिले.मोगलांनी हा देश जिंकून ताब्यात ठेवला. इंग्रजांनी तो राजकीय व प्रशासनिकदृष्ट्या संघटित केला. मात्र त्या दोहोंच्याही इतिहासात हा देश राष्ट्र म्हणून कधी उभा राहिला नाही. त्या राष्ट्रीयत्वाचे पहिले दर्शन गांधींच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्यलढय़ातच जगाला दिसले. या लढय़ाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर जगभरातील अनेक वसाहतींचे व गुलाम देशांचे राष्ट्रीयत्व जागे केले. गांधींचा लढा त्यामुळे केवळ भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालेला दिसला तरी त्याने जगभरच्या जनतेतील स्वातंत्र्याच्या प्रेरणांना उभारी दिली. ‘तुमच्या देशात गांधी जन्माला आला नसता तर मी अमेरिकेचा अध्यक्ष कधी होऊ शकलो नसतो’ असे उद्गार अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा जेव्हा भारताच्या संसदेत काढतात तेव्हा गांधींनी गुलामीविरुद्ध समाजाला उभे करतानाच वर्णविद्वेषाविरुद्ध आणि धार्मिक तेढीविरुद्धही लढण्याच्या प्रेरणा निर्माण केल्या हे लक्षात येते. नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग, ऑँग सॉँग स्यू की यासारखे राष्ट्रनिर्माते आपण गांधींकडून प्रेरणा घेतल्याचे जेव्हा सांगतात तेव्हा गांधींचे हे जागतिक अस्तित्व ध्यानात येते. गांधींच्या देशातील 27 वर्षांच्या राजकारणात त्यांना टीकाकारही फार लाभले. या टीकाकारांनी केलेल्या टीकेला गांधींनी कधी उत्तर दिले नाही. त्यामुळे गांधींचा विचार त्याच्या मूळ स्वरूपात नव्या पिढय़ांपर्यंत पोहोचणे अवघड झाले. त्याचे टीकाकार मात्र पुरेसे बोलकेच नव्हे तर वाचाळही होते. ती टीका जेवढी सार्वत्रिक झाली तेवढा गांधीविचार सार्वत्रिक झाला नाही आणि त्यांच्या उत्तराधिकार्‍यांना तो अधिकारवाणीने लोकांपर्यंत पोहोचविता आला नाही. त्याचा जागर पुन्हा एकवार त्याच्या मूळ स्वरूपात करणे ही राष्ट्राचीच नव्हे तर सार्‍या जगातील माणुसकीची सेवा व धर्म ठरणार आहे.राग, द्वेष, वैर, हिंसा व युद्ध या सार्‍या महामार्‍यांवरचा एकमेव गुणकारी उपाय गांधी हा आहे. तो प्रेम, मैत्री, बंधुता, अहिंसा व चर्चेने प्रश्न सोडवण्याचा मार्ग सांगतो. आजच्या जगात या गोष्टी गांधीजींएवढय़ा प्रभावीपणे सांगणारा नेता कुठेही अस्तित्वात नाही. मात्र गांधी नसला तरी त्याचा मंत्रविचार आजही जीवित आहे आणि तो जागवित आजच्या जगासमोरचे सारे प्रश्न, त्यात शांततेएवढेच पर्यावरणाचेही प्रश्न सामील आहेत, सोडवू शकणारा आहे. त्याची उपासना हा त्याच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने करण्याचा उपचार नाही, तो विचार आचरणात आणण्याची प्रतिज्ञा करण्याचा हा मुहूर्त आहे. suresh.dwadashiwart@lokmat.com(लेखक ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत.)