Join us  

Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

१७ वर्षांनंतर प्रथमच भारतीय संघाचा पाकिस्तान दौरा शक्य व्हावा यासाठी पीसीबी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 4:23 PM

Open in App

Champions Trophy 2025:  २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) तयार करत असलेल्या वेळापत्रकात भारतीय संघाचे सर्व सामने एकाच शहरात खेळवण्यात येणार आहेत. १७ वर्षांनंतर प्रथमच भारतीय संघाचा पाकिस्तान दौरा शक्य व्हावा यासाठी पीसीबी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पीसीबीने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे दोन आठवड्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार केला आहे. ESPNCricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार भारताचे सर्व सामने लाहोरला हलवले जाऊ शकतात कारण अंतिम सामना देखील येथे होणार आहे.

भारताचे सर्व सामने एकाच शहरामध्ये खेळवण्यात येणार असल्याने सुरक्षेची चिंता कमी होऊ शकते. हे सामने लाहोरमध्ये असल्याने वाघा बॉर्डरही जवळच असेल, त्यामुळे भारतीय चाहत्यांना तिथे जाणे सोपे होईल. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, त्यांनी एक मसुदा तयार केला आहे आणि तो आयसीसीकडे पाठवला आहे. मसुद्यावर अजून चर्चा व्हायची आहे आणि भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार की नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल.

२००८ च्या आशिया कपपासून भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळलेला नाही. त्याच वर्षी मुंबई हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध सतत बिघडत गेले. गेल्या वर्षी जेव्हा पाकिस्तानने आशिया चषकाचे यजमानपद भूषवले तेव्हा त्यांना हायब्रीड मॉडेल स्वीकारावे लागले आणि भारताने सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते. गेल्या वर्षी भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलची मागणी केली होती, परंतु त्यावर गंभीर चर्चा झाली नाही. पाकिस्तानने आपले सामने पाच वेगवेगळ्या मैदानांवर खेळले आणि ते ग्रुप स्टेजमधून बाहेर पडले.

 १९९६ च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे भारत आणि श्रीलंकेसोबत संयुक्तपणे यजमानपद भूषवल्यानंतर पाकिस्तान आयसीसीची ही पहिलीच स्पर्धा आयोजित करत आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानआयसीसी