शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

हळदीची पेवं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 06:05 IST

जमिनीच्या पोटात चाळीस लाख पोती हळद साठवणारं सांगलीचं गुपित

ठळक मुद्देपेव कसं खोदतात? त्यात हळद कशी भरतात?

- श्रीनिवास नागे

मराठीत ‘पेव फुटणं’ हा वाक्यप्रचार कसा आला माहितेय? तर जमिनीखाली असलेली हळदीची पेवं फोडल्यावर त्यातून पिवळीधम्मक, घमघमाट सुटणारी हळकुंडं बाहेर पडायची. त्यावरूनच हा वाक्यप्रचार आला ! पण हे पेव म्हणजे काय..? तर पावसाळ्यात हळद साठविण्यासाठी जमिनीत कोठारं खणण्याची सुपीक कल्पना !

जमिनीखालचं हे कोठार किंवा पोकळी म्हणजेच ‘पेव’. त्यात वाळवलेली हळकुंडं भरून ठेवली जातात. अनुभव आणि निरीक्षणातून हे तंत्र शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनीच शोधलेलं.

हळकुंड स्वरूपातली हळद साठवण्याची ही पारंपरिक आणि किफायतशीर पद्धत. पेवांमध्ये हळद सुरक्षित राहते आणि फुगल्यामुळं तिचं वजनही काहीसं वाढतं. हळद तशी कीडनाशक, पण हळदीचं पीक अत्यंत नाजूक. हळकुंडं उघड्यावर ठेवल्यास पावसाळ्यात किडीची (डंख) लागण ठरलेली. हळकुंडाला ओलसरपणा लागला, तर ती आतून काळपट-लाल पडतात, त्यांचा दर्जा खालावतो. त्यामुळं ती जमिनीखालच्या उबदार पेवांत भरून ठेवली जातात.

सांगली शहराला खेटून असलेल्या हरिपूर, सांगलीवाडी परिसरात पहिल्यांदा हळकुंडं साठविण्यासाठी पेवं खोदली गेली. इथल्या जमिनीत पाच-सहा फुटांपर्यंत काळ्या मातीचा थर लागतो. त्याखाली ३० ते ७० फुटापर्यंत लाल किंवा चिकण किंवा माण माती. ती नदीतल्या गाळासारखी घट्ट. त्याखाली वाळू आणि काळा दगड. हरिपूर हे कृष्णा-वारणा नद्यांच्या संगमावरचं गाव. गावात नदीकाठालाच ही वैशिष्ट्यपूर्ण जमीन दिसते. या वैशिष्ट्यपूर्ण मातीमुळं हरिपूरला पेवांचं पेव फुटलं !

एका पेवात १५ ते २५ टन हळद बसते. मातीच्या टणकपणामुळं वरून गाड्या फिरल्या तरी ढासळत नाही.

ही पेवं भाड्यानं दिली जातात. खुणेसाठी पेवाचं तोंड बंद करताना मालकाच्या नावाची पाटी लावली जाते. पाटीवर पेवाचा क्रमांक, पेवाच्या आणि हळदीच्या मालकाचं नाव, हळकुंडांचं प्रमाण आणि त्यावर कर्ज काढलं असल्यास बँकेचं नाव लिहिलेलं. पाटीवरची माहिती तीन चिठ्ठ्यांवरही लिहिलेली. एक चिठ्ठी पेवाच्या झाकणाच्या आत, दुसरी हळदीच्या मालकाकडं, तर तिसरी बँकेकडं. कर्जतारण म्हणून पेव !

सत्तरच्या दशकापर्यंत हरिपुरात आठशेवर पेवं होती. नंतर ती दोन हजारांवर गेली. २००४ पर्यंत साडेचार-पाच हजार पेवं झाली. त्यात चाळीस लाख पोती हळद मावायची. पण कृष्णा नदीला २००५ मध्ये आलेल्या महापुरानं पेवांना दणका बसला. त्या महापुरात पेवांच्या तोंडातून पाणी आत गेलं आणि ती आतून ढासळली. कायमची खराब झाली. मालकांनी ती बुजवली. कशीबशी दीडेक हजार शिल्लक राहिली. हळद साठवण्याच्या पारंपरिक व्यवस्थेला खीळ बसली. हळूहळू पेवांचा वापर कमी झाला.

२०१९ मधल्या महापुरानंतर तर पेवं संपुष्टातच आली. ती बुजवून त्यावर घरं बांधली गेली.

----------------------------

पेव कसं खोदतात? त्यात हळद कशी भरतात?

1. पेव खोदताना काळ्या मातीच्या थरापर्यंत विटा रचून घेतात.

2. पेवाचं तोंड सुरू होतं लाल मातीच्या थरापासून. तिथं सुरुवातीला आढी असते. त्यावर फाकण म्हणून फरशी बसवायची सोय.

3. लाल मातीच्या थरात २५ ते ३० फुटांपर्यंत खोल आणि पंधरा फूट रुंदीचा लंबगोलाकार आकाराचा खड्डा खोदला जातो. या मातीच्या टणक-घट्टपणामुळं पेवात पाणी व हवा यांचा शिरकाव अशक्य.

4. पेवात हळद हवाबंद राहायची सोय. पेव तळाच्या भागात रुंद, तर तोंडाकडं निमुळतं म्हणजे चंबूसारखं असतं. तोंड तीन फूट व्यासाचं.

5. आतली बाजू शेणानं सारवलेली. कडेला उसाचा पाला, गवताच्या पेंड्या, तर तळाला शेणाच्या सुक्या गोवऱ्या लावायच्या. त्यामुळं आत एकदम उबदार.

6. पेवात सुटी हळकुंडं ओतली जातात. ते भरलं की, गवताच्या पेंड्या टाकून तोंडवर फरशी बसवून ते मातीने लिंपायचं.

7. वरच्या चार-पाच फुटांपर्यंतच्या खड्ड्यात काळी माती भरायची. हा थर सच्छिद्र. वरून जमीन तापल्यानं पेवातली हवा हळूहळू गरम होऊन बाहेर पडते. मग काही तासांनी पेव हवाबंद करायचं.

8. आत ऑक्सिजन नसल्यामुळं कीडामुंगी तयार होत नाही. त्यातली हळद पाच-दहा वर्षांपर्यंत सुरक्षित राहते. कोरडेपणा आणि ऊब यामुळं हळदीला हवा तसा रंग मिळतो.

9. पेवातून हळद काढताना वा भरताना एक-दोन दिवस तोंड उघडून ठेवायचं. त्यामुळं आत साठलेली हळदीची दूषित हवा निघून जाते.

10. ती हवा गेली की नाही हे पाहण्यासाठी आत कंदील सोडायचा. कंदील पेटता राहिला तर आलबेल ! मग त्यात हमालांना उतरवायचं.

(वृत्तसंपादक, लोकमत, सांगली)

(छायाचित्रे : नंदकिशोर वाघमारे)