अफगाण स्टार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 06:01 AM2019-04-07T06:01:00+5:302019-04-07T06:05:03+5:30

अफगाणिस्तानमधील कोटीभर लोक जो टीव्ही रिअ‍ॅलिटी शो बघतात त्याची पहिली महिला विजेती जहरा. डोक्यावर बांधलेल्या स्कार्फच्या वर्णनासह जहरा आज जगभरातील मीडियावर झळकतेय! तालिबान्यांकडून मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असतानाही जहरा म्हणते, आमचा आवाज घोटणाऱ्या संस्कृतिरक्षकांशी मी माझे स्वर घेऊन लढेन, लढत राहीन आणि गात राहीन..

First woman to win ‘Afghan Star’ TV show to fight Taliban with music | अफगाण स्टार..

अफगाण स्टार..

Next
ठळक मुद्दे‘कार्यक्र माची विजेती म्हणून जहराचे नाव जाहीर झाले तेव्हा ती म्हणाली, हे मला एक स्वप्नच वाटत आहे. जागेपणी मी जे सतत बघत होते ते. आणि जे प्रत्यक्षात आलेच तर कदाचित उद्या एखादा सुसाइड बॉम्बर माझ्या चिंधड्या उडवून टाकेल इतके माझ्या जिवावर उठणारे स्वप्न..

- वंदना अत्रे
‘वेश्यांसारखे तंग आणि सगळे अंग दाखवणारे कपडे घालून स्टेजवर गाणी-बिणी म्हणत नाचणाऱ्या बाईची मान चिरून तिला तिच्या कुकर्माची शिक्षा द्यायला आम्ही कमी करणार नाही..’ असे म्हणत इस्लामची संस्कृती सांभाळण्याचा वगैरे ठेका घेतलेले कट्टर धर्माभिमानी ज्या भूमीवर आजही पाय घट्ट रोवून उभे आहेत त्या देशातील संगीताची अतिशय लोकप्रिय स्पर्धा जिंकणारी ती पहिली स्री. जहरा इलहाम.
अफगाणिस्तानमधील कोटीभर लोक जो ‘अफगाण स्टार’ नावाचा टीव्ही रिअ‍ॅलिटी शो डोळ्यात प्राण आणून बघत असतात त्याची पहिली विजेती. शेकडो पुरु ष स्पर्धकांबरोबर ज्या दोन(च) स्रिया या स्पर्धेत सहभागी झाल्या, त्यातील एक. हा कार्यक्र म सुरू झाल्यापासून तेरा वर्ष ज्याच्या विजेतेपदावर फक्त पुरु ष गायकांनी हक्क सांगितला आणि अनेक वर्षं ज्या स्पर्धेत स्रिया सहभागीसुद्धा होऊ शकल्या नाहीत त्या संगीत स्पर्धेची विजेती. त्यामुळेच, स्रियांनी एखादी संगीत स्पर्धा जिंकली हा चिमूटभर बातमीचासुद्धा विषय उरलेला नसताना जहरा मात्र जगभरातील मीडियाच्या पहिल्या पानावर झळकली. तीही तिने डोक्यावर बांधलेल्या स्कार्फच्या तपशीलवार वर्णनासह...! कारण एकच. एकीकडे जहरा जिंकावी यासाठी तिला लाखो अफगाण लोक आपले पसंतीचे मत देत असताना दुसरीकडे अमेरिका आणि तालिबान यांच्यामध्ये शांततेच्या वाटाघाटी (!) प्रगतिपथावर जात आहेत. अमेरिकन सैन्य अफगाण भूमीतून परतीच्या मार्गावर निघाल्याचे संकेत या वाटाघाटीमध्ये सहभागी प्रतिनिधी देत आहेत, तेव्हा सर्वसामान्य अफगाणी स्रियांना मात्र अनेक प्रश्नांनी अस्वस्थ केले आहे. या शांततेच्या वाटाघाटी अफगाण स्रियांच्या पदरात नेमके काय टाकणार आहेत? या फौजांची माघारी म्हणजे युद्धापासून मुक्ती की पुन्हा एकदा तालिबानी जुलुमाचे राज्य? पुन्हा बुरख्यात करकचून आवळलेले जीव घुसमटून टाकणारे जिणे की आपल्या मर्जीने जगण्याचे दुर्मीळ स्वातंत्र्य? अफगाणमधील स्रियांना अशा अनेक प्रश्नांनी सध्या अस्वस्थ केले आहे. जहरा जिंकल्यावर तिचे अभिनंदन करताना तानिम नावाच्या एका तरु णीने फेसबुकवर जहराला लिहिले, ‘बाई गं, ही स्पर्धा जिंकलीस हे तुझे मोठेच यश; पण याच्यानंतर अंधारात गुडूप होऊ नकोस. आम्ही हजारो स्रिया तुझ्याकडे बघतोय. आमच्याही आयुष्यात अशी स्वातंत्र्याची पहाट उगवावी यासाठी...’
‘अमेरिकन आयडॉल’ या स्पर्धेच्या धर्तीवर चालणारी ‘अफगाण स्टार’ नावाची ही संगीत स्पर्धा २००५ साली ‘टोलो’ नावाच्या लोकप्रिय चॅनलवर सुरू झाली. अर्थात अफगाणिस्तानमधील सर्वोत्तम उगवत्या गायकाचा शोध घेण्यासाठी ! या शोधात एखादी गायिका भेटली असती तरी ‘टोलो’चा त्याला विरोध नव्हता, नसणारच.. पण त्याच्या इच्छेला किंवा विरोधाला कोण भीक घालणार? कारण एखाद्या तरु ण गायिकेला अशा शोधात भाग घ्यायचा म्हणजे त्या आधी चेहºयावरचा नकाब खाली उतरवून तोंड उघडावे लागणार. पुरुष वादकांबरोबर रियाझ करावा लागणार, देशभरातील पुरु षांना आपल्यासाठी मते मागावी लागणार आणि असे बरेच काही. ज्या देशाच्या नाक्या-नाक्यावर बंदुका घेऊन बसलेले तालिबान नावाचे संस्कृतिरक्षक बसलेले आहेत त्यांच्यापुढे मान वर करून असे संगीत स्पर्धेत भाग घेण्याचे चवचाल उद्योग करण्याचे पाप कोण करणार? आणि त्यामुळे इस्लामची संस्कृती धोक्यात येईल (कदाचित बुडेलसुद्धा !), संकटात असलेला देश अधिक गर्तेत ढकलला जाईल त्याचे काय? त्यामुळे या स्पर्धेचे दोन हंगाम होईपर्यंत एकाही तरु णीने मान वरती करून या स्टेजकडे बघण्याची हिम्मतसुद्धा केली नाही. लेम सहर नावाची तरु णी ही या स्पर्धेत पुष्कळ पुढच्या फेऱ्यांपर्यंत मुसंडी मारणारी पहिली तरु णी. पहिल्या वर्षी एक हजार स्पर्धकांनी या स्पर्धेच्या पहिल्या, चाचणीच्या फेरीत सहभाग घेतला. दुसºयाच हंगामापासून या स्पर्धेची लोकप्रियता एवढी वाढली की अफगाणिस्तानमधील सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही कार्यक्र म होण्याचा मान त्याला मिळाला. केवळ अफगाणिस्तानच नाही तर पाकिस्तान, इराक अशा अन्य मुस्लीम देशांचे स्पर्धकपण आपले नशीब आजमावून बघण्यासाठी त्यात उतरू लागले. जगभरात सर्वत्र होणाºया संगीताच्या रिअ‍ॅलिटी शोप्रमाणेच याही कार्यक्रमात आधी सर्व स्पर्धकांची चाचणी फेरी होते. त्यातून निवडलेल्या स्पर्धकांची मग स्टेजवर स्पर्धा सुरू होते, ज्यामध्ये दर आठवड्याला परीक्षकांचे मत आणि लोकांच्या मतांचा सहभाग याच्या आधारे एकेक स्पर्धक बाद होत जातो आणि अशा रीतीने अंतिम विजेतेपदावर शिक्कामोर्तब होते. एकदा कार्यक्र म तुफान लोकप्रियतेच्या मार्गाने निघाला की ती लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी ज्या ज्या क्लृप्त्या केल्या जातात त्या अर्थात याही स्पर्धेत वापरल्या गेल्याच. त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे, पूर्वीच्या विजेत्यांना घेऊन पुन्हा त्यांच्यातून सुपर विजेता निवडण्याची स्पर्धा. सुपरस्टार निवडीच्या अशा दोन महास्पर्धा धडाक्यात पार पडून विजेत्यांना भल्या थोरल्या, नामवंत ब्रान्डच्या गाड्या वगैरे बक्षिसादाखल मिळाल्या; पण तरीही या सगळ्या वर्दळीपासून तरुण मुली मात्र दूर, आहे-नाहीत अशा किरकोळ संख्येने होत्या... गळ्यात स्वर नसलेल्या जनावरागत... तोंडाला करकचून स्कार्फ आवळून... ही सगळी गळचेपी झुगारून, लोकांना आपल्यासाठी मत द्या असे आग्रहाने वारंवार विनवण्याची आणि जोमाने पुरु ष स्पर्धकांना टक्कर देण्याची हिमत दाखवली ती झुलेला हशेमी नावाच्या तरु णीने. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या दोन स्पर्धकांपैकी ती एक. झुलेलाला ज्या विजेतेपदाने हुलकावणी दिली ते मोठ्या रु बाबात कमवले ते जहराने... याच स्पर्धेत तिच्याबरोबर तेवढ्याच तयारीने उतरलेली सादिका मददगार जिंकणार की जहरा हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय होता. जहराचा उंच पट्टीमधील टोकदार आवाज आणि कमालीचा संयम हा तिच्या पारड्यात विजय टाकणारा हुकुमी एक्का ठरला...
अफगाणमधील हजरा या अल्पसंख्य जमातीची असलेली जहरा ज्या गझनी गावची त्या गावावर कित्येक वर्ष तालिबानींची कमालीची पोलादी पकड होती. तालिबानी जुलुमाला कंटाळून हजारो हझरा अफगाणिस्तान सोडून गेले. पण आपल्या जमातीचे लोकसंगीत हा जहरा आणि तिच्या कुटुंबाचा एक जिवाभावाचा विषय होता. त्यामुळे तिच्या पालकांनी विशेषत: तिच्या आईने तिला सतत प्रोत्साहनच दिले. स्पर्धा सुरू झाल्यावर तिला जशी प्रेक्षकांनी भरभरून मते दिली तसे अनेकांनी सोशल मीडियावर तिच्या नावानं कडाकडा बोटे मोडणारे आणि तिला शाप देणारे निरोपही दिले. पण उमेद देणारे आणि खचवून टाकणारे असे दोन्ही तिच्या आसपास घडत असताना जहरा मात्र अविचल होती. तिच्या गळ्यातील स्वरांशी प्रामाणिक. त्यामुळे जेव्हा स्पर्धेची विजेती म्हणून तिच्या नावाची घोषणा ऐकण्याचा अद्भुत क्षण तिच्या वाट्याला आला तेव्हा ती म्हणाली, ‘कार्यक्र माची विजेती म्हणून माझे नाव स्टेजवरून जाहीर झाले तेव्हा मला जणू काही ऐकूच येत नव्हते... आणि जे ऐकू येत होते ते खोटे वाटत होते.. किंवा स्वप्न... हो, स्वप्नच असणार ते. माझ्या देशातील कमालीची लोकप्रिय असलेली संगीत स्पर्धा जिंकण्याचे अशक्य, अवघड स्वप्न. माझ्या जागेपणी मी जे सतत बघत होते ते. आणि जे प्रत्यक्षात आलेच तर कदाचित उद्या एखादा सुसाइड बॉम्बर माझ्या चिंधड्या उडवून टाकेल इतके माझ्या जिवावर उठणारे स्वप्न... पण मी खरेच जिंकले आहे.’
अफगाणिस्तानातमधील अतिशय लोकप्रियपण सतत तालिबानींच्या बंदुकीचे लक्ष्य असलेली गायिका आर्याना सईद ही जहराची रोल मॉडेल. युद्धग्रस्त अफगाण भूमीचा वयाच्या आठव्या वर्षी निरोप घेऊन बाहेर पडलेली आर्याना मायभूमीत पुन्हा पुन्हा येते ती एकाच कारणासाठी; या संस्कृतीचे संगीत जिवंत राहावे यासाठी.
काबूलमध्ये सशस्र वाहनातून फिरणाºया, जिवाला असलेल्या सततच्या धोक्यामुळे स्वत:ला सक्तीने एकांतवासात कोंडून घेतलेल्या आर्यानाचे संगीत ऐकून एका सतरा वर्षाच्या मुलीने फेसबुकवर लिहिले, ‘आपण मुली दुबळ्या नाही हे तुझ्याकडे बघून मी स्वत:ला सारखी सांगत असते...’ तिने जे लिहिले ते जहराने जगून दाखवले.
‘तुझा विजय ही मत्सरग्रस्त अफगाण पुरु षांच्या कचकचीत थोबाडीत मारलेली आहे...’ इतक्या जहाल भाषेत सानिता रासा नावाच्या तरु णीने जहराला लिहिले तेव्हा तिने उत्तर दिले, ‘आपल्या गळ्यातील मुक्त स्वर आणि आपला आवाज घोटणाºया या संस्कृतिरक्षकांशी मी माझे स्वर घेऊन लढेन... लढत राहीन.. आणि गात राहीन.. मला प्रिय असलेले माझ्या भूमीचे सूर... कारण हा विजय माझा एकटीचा नाही तर आपल्या सगळ्या मैत्रिणींचा आहे. स्वर-लय-नाद याच्यासह जगू इच्छिणाºया अफगाण मुलींचा..

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

vratre@gmail.com

Web Title: First woman to win ‘Afghan Star’ TV show to fight Taliban with music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.