‘फेड-एक्स’ आणि ‘बजाज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:00 AM2020-06-14T06:00:00+5:302020-06-14T06:00:06+5:30

लोकांपर्यंत पोहोचणे हे प्रत्येक उद्योगाचे ध्येय. त्यासाठी त्यांची ‘ब्रॅण्ड आयडेंटिटी’  लोगोपासून सुरू होते; पण तिथेच ती थांबत नाही.  लोकांशी संवाद साधत असतानाच लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावे यासाठीही लोगोचा वाटा खूपच मोठा असतो. ग्राफिक डिझाइनच्या दुनियेत  आयकॉन ठरलेला फेड-एक्स कंपनीचा लोगो  आणि बजाजची कॅचलाइन यांचा इतिहास आपल्याला कायम याच गोष्टींची आठवण करून देतो..

‘Fed-X’ and ‘Bajaj’ | ‘फेड-एक्स’ आणि ‘बजाज’

‘फेड-एक्स’ आणि ‘बजाज’

Next
ठळक मुद्देकोणत्याही उद्योगाची ब्रॅण्ड आयडेंटिटी ही लोगोपासून सुरू झाली तरी तिथे थांबत नाही. ती लोगोच्या पलीकडे जाऊन लोकांशी संवाद साधत असते.

- स्नेहल जोशी
मागच्या आठवड्यात आपण पाहिलं, एखादी व्यक्ती, कंपनी किंवा सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचं ब्रॅण्डिंग अतिशय महत्त्वाचे आहे. ब्रॅण्डिंगची सुरुवात लोगोपासून होते. आपण कोण आहोत? आपली मूल्यं-तत्त्व काय आहेत? आपण लोकांना काय देऊ इच्छितो? आपल्या कामाची पद्धत काय? उद्योगामागचा आपला हेतू, प्रेरणा काय आहेत? या सगळ्याचा आकृतिबद्ध चित्ररूपी सारांश म्हणजेच लोगो.
लोगो तयार करण्याची प्रक्रिया त्यामानाने सरळ आहे. पण ब्रॅण्ड आयडेंटिटी तयार करण्यासाठी सातत्याने प्रय} करावे लागतात. उद्योजकांना आपली ओळख, आपली उद्दिष्ट आणि मूल्य ही लोगोच्या पलीकडे जाऊन त्याच्या  वागणुकीतून, कार्यपद्धतीतून, उत्पादनातून, जाहिरातीतून,  हरप्रकारे सतत लोकांसमोर व्यक्त करावी लागते आणि सिद्धही करावी लागते. जेव्हा एखाद्या उद्योगाची ओळख त्याच्या प्रत्येक संपर्क-बिंदूतून व्यक्त होते आणि त्या उद्योगाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनते तेव्हाच ब्रॅण्ड आयडेंटिटी त्या उद्योगाच्या मूलतत्त्वांचं आणि संस्कृतीचं दृढ प्रतीक ठरते.
फेड-एक्स
ग्राफिक डिझाइनच्या दुनियेत आयकॉन ठरलेला फेड-एक्स कंपनीचा लोगो पाहुयात. फेड-एक्स म्हणजे फेडरल एक्स्प्रेस ही अमेरिकन कंपनी 1971 साली  पॅकेजिंग आणि डिलिव्हरी यासाठी स्थापन झाली. काही वर्षातच आपल्या अतिशय कार्यक्षम प्रणालीमुळे फेड-एक्स कुरिअर क्षेत्रात पथदर्शक ठरली.
कामातली अचूकता, शीघ्रता, वक्तशीरपणा आणि ध्येयसिद्धीची चिकाटी फेड-एक्सच्या प्रत्येक कामातून दिसू लागली. आता यांचा लोगो प्रथमदर्शनी फक्त कंपनीचं नाव लिहिलंय असा भासतो; पण थोडं बारकाईने बघितलं तर लक्षात येईल. इंग्रजी ‘इ’ आणि ‘एक्स’ या अक्षरांच्या मधली मोकळी जागा म्हणजेच निगेटिव्ह स्पेस पहा. त्यात आपल्याला एक बाण दिसतो, आणि त्यातच ब्रॅण्डचा सगळा अर्थ दडलेला आहे.
हा लोगो डिझाइन करणारे लांडॉर असोसिएट्सचे लिंडन लीडर सांगतात की, लोगो डिझाइन करताना कोणता एक असा योग्य फॉन्ट त्यांना मिळेना. अखेर त्यांनी ‘फ्युचुरा बोल्ड’ आणि ‘युनिव्हर्स 67’ असे दोन वेगळे फॉन्ट वापरून त्यातही आवश्यक ते बदल करून डिझाइनचं उद्दिष्ट साध्य केलं. निगेटिव्ह स्पेसचा अतिशय परिणामकारक वापर केल्याने हा लोगो बहुचर्चित झाला आहे. 
यातला निळा रंग हा जांभळ्याकडे झुकणारा आहे; तो प्रतिष्ठा दर्शवतो आणि केशरी रंग उत्कर्षाचं प्रतीक म्हणून वापरला आहे.
फेड-एक्सचा जसजसा विस्तार होत गेला, तशा नवनवीन सेवा ते सुरू करत गेले. या नव्या सेवादेखील लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच प्रमाणे एखादं पार्सल कुठल्या सेवेअंतर्गत मार्गस्थ करायचं आहे किंवा ग्राहकांना आपण नेमकी कुठली सेवा घेतो आहोत हे कळण्यासाठीदेखील लोगोचा वापर केला जातो. 
फेड-एक्सने आपला लोगो कायम ठेवून फक्त  ‘इएक्स’ या अक्षरांच्या रंगात बदल करत नवीन सेवा लोकांसमोर आणल्या. म्हणजे ब्रॅण्ड तोच, कार्यप्रणाली  तीच, शीघ्रता आणि विश्वासार्हताही आधी प्रमाणेच, फक्त सेवा नवीन हे त्यांनी यातून दर्शवलं आहे.
कोणत्याही उद्योगाची ब्रॅण्ड आयडेंटिटी ही लोगोपासून सुरू झाली तरी तिथे थांबत नाही. ती लोगोच्या पलीकडे जाऊन लोकांशी संवाद साधत असते. प्रत्यक्ष उत्पादन अथवा सेवा, त्यांचं पॅकेजिंग, दुकानं, छापील माध्यमं, टीव्ही, रस्त्यांवरचे फलक, इंटरनेट, सोशल मीडिया या सगळ्या माध्यमांतून ब्रॅण्ड आयडेंटिटी आपल्यापर्र्यंत पोहोचत असते. आणि म्हणूनच या सगळ्या माध्यमांमध्ये एकवाक्यता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच बरोबर आपण लोकांच्या लक्षात राहणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
हमारा बजाज..
आता हेच उदाहरण बघा - ‘हमारा बजाज’ एवढे दोनच शब्द. मला खात्री आहे तुम्ही हे शब्द चालीवरच वाचले असतील आणि पहिल्या बजाज चेतकपासून ते आत्ताच्या पल्सरपर्यंत सगळ्या गाड्या आणि त्यांच्या जाहिराती मनातल्या पडद्यावर उमटून गेल्या असतील. बजाज कंपनीच्या नुसत्या जाहिरातींचासुद्धा इतिहास खरोखरच रंजक आहे. सुरुवातीला बजाज कंपनी परदेशी गाड्यांची विक्री भारतात करत असे. पण 70च्या दशकात बजाजने स्वत:ची दुचाकी बाजारात आणायचं ठरवलं. 
त्याकाळात चार चाकी वाहन ही अतिशय र्शीमंती, विलासी कल्पना होती. पण सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खासगी वाहन म्हणून दुचाकीचा पर्याय आकर्षक होता. मध्यमवर्गाला चैन म्हणून परवडेल अशा किमतीची आणि त्यांच्या स्वभावाला पटेल अशी दणकट आणि टिकाऊ चेतक स्कूटर बजाजने बाजारात आणली. चेतकची जाहिरात करण्यासाठी, भारतीय जाहिरात जगताचे गुरु, अँलेक पद्मसी यांना बोलावले.
भारतात अजूनही उदारीकरणाचे वारे वाहायला लागले नव्हते. तेव्हा जाहिरात मोहिमेत राष्ट्रीय प्रतिमा बिंबवणे साहजिक होते. राष्ट्रीय भाषेत असलेल्या ‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज’ या टॅग-लाइनमध्ये, ‘सगळ्यांना आपलीशी वाटावी, विशेषत: मध्यमवर्गीय जनतेला परवडेल अशी, भारतीय लोकांनी भारतासाठी तयार केलेली दणकट गाडी’ एवढा सगळा भाव समाविष्ट आहे. आणि तो बजाजच्या कामगिरीतून सिद्धही झाला. 
चेतक स्कूटरने बजाज कंपनीला नवीन वळण तर दिलंच; पण ‘हमारा बजाज’मुळे कंपनीला नवा सूरही गवसला होता. उदारीकरणानंतरसुद्धा ‘हमारा बजाज’ मोहीम अगदी मागच्या वर्षापर्यंत चालू राहिली. अर्थात 21व्या शतकात तिला ‘नये भारत की नयी तसवीर’ची जोड मिळाली आणि तीही सार्थच ठरली. ‘हमारा बजाज’ जिंगल म्हणजे जणू काही भारताचं गौरव गीतच बनली.. 

snehal@designnonstop.in
(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)

Web Title: ‘Fed-X’ and ‘Bajaj’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.