कल्याणी गाडगीळ
शहराच्या मधोमध छानशा हिरवळीवर भला मोठा टीव्हीस्क्र ीन लावलाय..हिरवळीवर लोळण्यासाठी मऊमऊ बिनबॅग्ज ठेवल्या आहेत..बाजूला खाण्यापिण्याची चंगळ आहे. आणि संगीताच्या तालावर जल्लोष करत तुम्ही मस्त मजेत क्रिकेटची मॅच पाहताय..! कशी वाटली आयडिया?
--------------
तुम्ही वर्ल्डकप क्रिकेटचे सामने कुठे पाहता?
तुम्हाला वाटेल, किती हा उद्धट प्रश्न!
जे कुणी न्यूझीलंड -ऑस्ट्रेलियाला गेले असतील, ते मैदानावर प्रत्यक्ष पाहतील, उरलेले आपापल्या घरच्या टीव्हीवर पाहतील!
- हे झाले स्वाभाविक उत्तर!
पण इथे न्यूझीलंडमध्ये राहाणार्या उत्साही प्रेक्षकांसाठी आणखी एक तिसरा आणि अधिक मजेचा पर्याय उपलब्ध आहे!
क्रिकेटचे सामने पाहायला ना मैदानावर जायचे, ना मित्रमंडळी-कुटुंबियांना जमवून घरी टीव्हीसमोर कोचावर तंगड्या पसरून बसायचे!
- मॅच पाहायची ती फॅनझोनमध्ये जाऊन!
आता हे फॅनझोन म्हणजे काय?
न्यूझीलंडमधील ज्या ज्या शहरांमधे वर्ल्डकपचे सामने होणार तेथील सिटी काउन्सिलने शहरातील मोक्याच्या ठिकाणी भलीमोठी जागा राखून तिथे प्रेक्षकांना बसून, एकीकडे खात-पीत, मजेत भल्यामोठय़ा टीव्हीस्क्रीनवर सामने पाहायला मिळतील अशी धमाल व्यवस्था केली आहे! ऑकलंडमधे ऑकलंड बंदराशेजारी व ब्रिटोमार्ट या मुख्य रेल्वेस्टेशनजवळ हा फॅनझोन उभारला आहे- टाकुटाई स्क्वेअरमधे. सामन्यांच्या काळात सकाळी अकरा ते रात्नी अकरापर्यंत हा फॅनझोन उघडा असेल. ही संकल्पना आहे मोठी मजेची. तीनशे ते साडेतीनशे माणसे आरामात बसू शकतील अशी व्यवस्था.. खाली छान हिरवळ.. समोर भलामोठा टीव्हीस्क्र ीन.. मागे बसायला सुरेख लाकडी पॅव्हिलिअन.. हिरवळीवर अत्यंत आरामशीर अशा बिन बॅग्ज.
प्रेक्षकांना सामने पाहता पाहता खाण्याचाही आस्वाद घेता येईल अशी खास व्यवस्था! इटालियन पास्ता, टाको चिप्स, पिटा-पीट म्हणजे भरपूर भाज्या, चिकन किंवा मटण आणि विविध सॉस घालून केलेला चक्क पोळीचा मोठ्ठा रोल.. आणि अर्थातच शीतपेये! लहान मुलांसाठी खास वेगळे मेन्यू आणि आइसक्रीमही! या जागी मद्यपान, सिगारेट ओढणे, पाळीव प्राण्यांना आणणे, बेटिंग यांनाही अर्थातच बंदी आहे.
..समोरच एका मोठय़ा बोर्डवर बॅट हातात घेऊन चेंडू टोलविणार्या खेळाडूचे मैदानावरचे चित्न उभे केलेले. फक्त त्यातील खेळाडूच्या चेहेर्याच्या जागी एक कापलेला गोल. त्या बोर्डामागे उभं राहून गोलातून आपला चेहेरा दिसेल असा उभं राहून फोटो घेतला की तुम्हीच मैदानावर खेळत आहात असा आभास! आबालव्रुद्ध तिथे जाऊन फोटो काढणारच!!
शेजारीच एक तात्पुरती शेड उभारून त्यात धावपट्टी तयार केलेली आणि तीन स्टंप्स ठेवलेल्या. ठराविक अंतरावर चेंडू ठेवलेले. सहा चेंडू मारून विकेट उडाल्यास काहीतरी बक्षीस.
एकीकडे सामन्यांचे संपूर्ण वेळापत्नक आणि दुसरीकडे फॅनट्रेलचा मार्ग, वेळ व तारीख दाखिवणारा मोठा नकाशा. कोणालाच, काहीच विचारायची गरजच नाही. पण तरीही काही लागलेच तर स्वयंसेवक युनिफॉर्म घालून हवी ती मदत करायला हजर. काही गोंधळ होऊ नये म्हणून दोनतीन सिक्युरिटी गार्डही पहारा देत उभे!
परदेशातून न्यूझीलंडला आलेले प्रेक्षक आपापल्या पाठीवरल्या पिशव्या आणि बाकीचे सर्व सामान घेऊन तिथे चक्क हिरवळीत आडवे झालेले. शिवाय वयस्कर नागरिक, लहान मुले असलेली कुटुंबे, तरूण-तरुणी, जोडपी सगळे मजेत हिरवळीवर किंवा पॅव्हेलिअनमधे बसून सामना पाहत असतात. उत्तम झेल, चौकार, षटकार, विकेट उडाली की होणारा दंगा, शिट्ट्या, टाळ्या यांनी वातावरण अगदी क्रि केटमय होऊन जातं.
..या सार्वजनिक जागी असलेली स्वच्छता, सुरक्षा, निषिद्ध गोष्टींच्या नियमांचे कटाक्षाने पालन व अत्यंत आनंदाचे वातावरण अनुभवायलाच हवे असे. ते शब्दात उतरवणे खरेच कठीण. चुरशीचे सामने असले की हा चौक अक्षरश: गच्च भरतो. भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी सातशेच्यावर प्रेक्षक तिथे खचाखच भरलेले होते.
याच फॅन झोनमधे २५ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता नागरिकांना भेटण्यासाठी म्हणून न्यूझीलंडची अख्खी क्रिकेट टीम येणार होती. दक्षता म्हणून दोन स्त्नी पोलीस व चार सिक्युरिटी गार्ड्स भोवती गस्त घालत होते. कडक उन्हात उभे राहावे लागणार म्हणून स्वयंसेवक प्रेक्षकांना सनस्क्रीनचे मोफत वाटप करीत होते. पाण्याच्या क्रिकेटवीरांचे स्वागत करायला स्टेजच्या खाली माओरी मुलामुलींचा एक संच थांबला होता. पत्नकार व विविध टीव्हीचॅनेलचे कर्मचारी महत्त्वाचे क्षण टिपण्यात मग्न होते. दोन्ही बाजूला वेगवेगळ्या देशातील लोकांचे चेहरे त्यांच्या देशाच्या झेंड्यानुसार रंगविलेली एक मोठी बस क्रि केटची टीम व त्यांचे ट्रेनर्स यांना घेऊन बरोबर साडेतीनला फॅनझोनपाशी उतरली. प्रेक्षकांनी लगेच त्यांच्यासाठी वाट मोकळी करून दिली. अक्षरश: एका हाताच्या अंतरावरून हे क्रि केटवीर चालले आहेत आणि भोवती सुरक्षाकवच किंवा पिस्तुले घेतलेले पोलीस नाहीत ही गोष्ट कल्पनेपलीकडची वाटत होती.
माओरी पद्धतीने स्वागत केल्यावर क्रिकेटपटू स्टेजवर गेले. लेन ब्राऊन या ऑकलंडच्या मेअरने त्यांचे स्वागत केले. पाठोपाठ स्थानिक माओरी इवी (म्हणजे एक माओरी पंथ) प्रमुखाने माओरी गीत म्हणून क्रि केटवीरांचे स्वागत केले व त्यांच्या सामन्यांना शुभेच्छा दिल्या. न्यूझीलंडच्या क्रि केट संघाचे नांव ब्लॅक कॅप्स आहे. त्यांचा सध्याचा कर्णधार ब्रॅँडन मॅक्युलम याने छोटेसे भाषण केले. या समारंभासाठी काम करणार्या व आर्थिक मदत करणार्या लोकांचे औपचारिक आभार मानून व त्यांना क्रि केटचा टी शर्ट, प्रमाणपत्र इत्यादी देऊन लगेच क्रि केटवीर प्रेक्षकांना सह्या देण्यासाठी खाली उतरले. कडक उन्हामुळे तीन मोठ्या छत्र्या उभारून त्याखाली ही मंडळी खुच्र्यांवर स्थानापन्न झाली आणि सह्या घेण्यासाठी प्रेक्षक ओळीने त्यांच्यापुढून जाऊ लागले. एका बाजूने रांग लावून धक्काबुक्की न करता लोक पुढे सरकत होते. लहान मुलांनी त्यांच्या बॅट्स घरून आणल्या होत्या. त्यावर त्यांना सह्या मिळत होत्या. काहीजण अंगात घातलेला टी शर्टच खेळाडूंपुढे करून त्यावर सह्या घेत होते. काहींनी खास सह्या घेऊन आपापल्या शोकेसमधे ठेवण्यासाठी बॅटच्या लहानशा प्रतिकृती बरोबर आणल्या होत्या, त्यावरही सह्या घेणे चालू होते. फोन, कॅमेरे यांवर फोटो घेण्याची गर्दी उडाली होती. वीस मिनिटे हा कार्यक्रम चालू होता। प्रत्येक प्रेक्षकाला डब्ल्यूसीसीचा शिक्का असलेला एक छोटासा चेंडूही भेट म्हणून मिळाला. करमणुकीसाठी दोन प्रसिद्ध गायक त्याचवेळी स्टेजवर गिटार घेऊन गाणी म्हणत होते. संयोजकांनी जमलेल्या प्रेक्षकांतील तीन लकी प्रेक्षकांची निवड करून त्यांना २८ फेब्रुवारीच्या सामन्याची तिकिटे मोफत दिली. प्रेक्षकांत एकदम धमाल उडाली. संयोजकांनी ऑकलंडमधील सामन्यांच्या वेळी निघणार्या फॅनट्रेलची माहिती दिली आणि जास्तीत जास्त संख्येने त्यात सामील होऊन ऑकलंडशहर पायी चालत पाहण्याची व चालत चालत ईडन पार्क या मैदानापर्यंत जाण्याची संधी जरूर घ्या असे आवाहन केले.
वेळ झरकन निघून गेला. कार्यक्रमाची सांगता ऑस्ट्रेलियाबरोबरच्या सामन्यासाठी क्रिकेटवीरांना भरघोस शुभेच्छा देत झाली. स्टेजवरून उतरल्यावर पुन्हा माओरी मुलांनी हाकानृत्य करून त्यांना मानवंदना दिली. कडक उन्हात थंडावा यावा म्हणून जमिनीवरून उडणार्या पाण्याच्या कारंज्यात उभे राहूनच माओरी मुलांचे हाका नृत्य झाले.
रंगीबेरंगी बसमधून सगळी टीम, त्यांचे ट्रेनर्स ठरल्यावेळी तेथून निघाले. फॅनझोन जरासे रिकामे झाल्यासारखे वाटले, पण तिकडे मोठ्या स्क्रीनवर लगेच आयर्लंड विरुद्ध युनायटेड अरब एमिरेटस यांच्यातील सामना दाखवायला सुरु वात झाली आणि लोक सोयीच्या जागा पकडून सामना पाहण्यात दंग होऊन गेले.हा शिस्तशीर, देखणा तरी आटोपशीर समारंभ मनावर छान कोरला गेला आहे.