भविष्याची ‘डिजिटल’ किल्ली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:02 AM2020-03-01T06:02:00+5:302020-03-01T06:05:03+5:30

आगामी काळात आपण कुठे असू,  आपलं भविष्य आणि भवितव्य काय,  हे डिजिटल टेक्नॉलॉजी निश्चित करणार आहे.  त्यातून निर्माण होणारा डेटा महाप्रचंड असणार आहे.  डेटाच्या याच वैश्विक धाग्यानं  जगाच्या प्रगतीचं वस्र विणलं जाणार आहे.  तेच एकमेव जागतिक चलनही असणार आहे.  येत्या काळात अतिशय वेगानं या चलनाचा प्रसार होईल  आणि ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या वारूवर  प्रत्येकजण स्वार झालेला असेल. त्याचं  ‘लोकशाहीकरण’ करणं हे आपल्यापुढचं मुख्य आव्हान आहे.

The 'digital' key of the future! | भविष्याची ‘डिजिटल’ किल्ली!

भविष्याची ‘डिजिटल’ किल्ली!

Next
ठळक मुद्दे‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला नुकतेच भारताच्या दौर्‍यावर येऊन गेले. मुंबईत झालेल्या ‘फ्यूचर डिकोडेड’ या शिखर संमेलनातील त्यांच्या भाषणाचा हा संक्षिप्त सारांश..

- सत्या नडेला

विज्ञान-तंत्रज्ञान आपलं अवघं विश्व व्यापत असताना एका नव्या दशकाची पहाट आता होते आहे. अर्थात गेल्या दशकानं त्याची पायाभरणी केली. मोबाइल क्रांती आणि ग्राहकांचा वरचष्मा असलेल्या ‘कन्झ्युमर इंटरनेट’नं गेल्या दशकात सर्वसामान्यांचं विश्व एका झटक्यात बदलून टाकलं. मात्र यासंदर्भात एक टीकाही केली जाते. ‘कन्झ्युमर इकॉनॉमी’ हा अतिशय महत्त्वाचा भाग असला तरी अर्थव्यवस्थेचा तो एकमेव घटक नाही. त्यातला तो एक अतिशय छोटासा भाग आहे. शिवाय या सर्व प्रगतीतून प्राप्त केलेला नफादेखील अतिशय तुटपुंजा आहे. या काळातलं सर्वाधिक यशस्वी झालेलं बिझनेस मॉडेल म्हणजे एका छत्राखाली उभं राहिलेलं नेटवर्क मॉडेल. पण हे एवढंच आपल्यासाठी पुरेसं नाही.
जेव्हा पुढच्या दशकाकडे आपण नजर टाकतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, आपली उत्पादकता वाढली पाहिजे आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा विविध क्षेत्रांत विस्तार होतानाच त्याचा विधायक परिणामही घडून आला पाहिजे. लहानसहान व्यापारापासून ते मोठय़ा  उद्योगधंद्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी हे परिणाम दिसले पाहिजेत.
पुढच्या दहा वर्षांत हेच तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहे. आगामी काळात आपण कुठे असू, आपलं भविष्य आणि भवितव्य काय, हेदेखील डिजिटल टेक्नॉलॉजीच निश्चित करणार आहे. प्रo्न असा आहे, की या तंत्रज्ञानाला सर्वसमावेशी करण्यासाठी आपण काय आणि कसे प्रय} करणार आहोत? 
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, मग ते घर असो, ऑफिस असो किंवा उद्योग, शेती, ऊर्जा, हॉस्पिटल्स, रिटेल क्षेत्र अथवा आणखी काही, प्रत्येक गोष्ट संगणकाशी, तंत्रज्ञानाशी जोडली जाते आहे. हा खरा बदल आहे आणि आगामी काळात पूर्ण ताकदीनिशी हा बदल घडून येणार आहे. आज ज्या युगात  आपण वावरतोय, ते ‘इंटेलिजण्ट क्लाउड’ किंवा इंटेलिजण्ट एज’चं युग आहे. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा यातला वाटा खूपच मोठा आहे.
येणार्‍या काळात ही कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वव्यापी असणार आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात ती आपल्याला दिसेल आणि भविष्यात जे काही अनुभव आपण घेणार आहोत, तेदेखील संकुचित नसतील.
तंत्रज्ञानाच्या या लाटेवर प्रत्येक भारतीय संस्थेनं स्वार झालं पाहिजे, त्यासाठी स्वत:ची तंत्रज्ञान यंत्रणा उभारली पाहिजे आणि त्यावर मांड ठोकून जगात स्वैर संचार केला पाहिजे. आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानाची कास कोणालाच सोडता येणार नाही. तंत्रज्ञान हे प्रत्येकाला आपलं अविभाज्य अंग बनवावं लागेल. त्यासाठी आपली तंत्रज्ञान क्षमता आपल्या स्वत:लाच विकसित करावी लागेल आणि त्याबाबत अधिकाधिक स्वयंपूर्ण व्हावं लागेल. हे आपण किती लवकरात लवकर साध्य करू, त्यावर भविष्यातील आपलं स्थानही अवलंबून असेल. आगामी दशक आपल्या त्या स्थानावर शिक्कामोर्तब करेल. भारतासारख्या देशासाठी हाच काळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि या काळात आपली सर्वसमावेशी प्रगती कशी होईल याकडे भारताला जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल.
आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना, झटपट ते आपलंसं करताना तंत्रज्ञानावरचा विश्वास, कृत्रिम बुद्धिमत्तेसोबतची नीतिमत्ता या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
हे जग अधिक शाश्वत करण्यासाठी जगातल्या प्रत्येकासाठी काही ना काही भूमिका आहे आणि ही भूमिका निभावणं ही आपली जबाबदारी आहे. 
आगामी दशक हे त्यादृष्टीनं आपल्या प्रत्येकापुढे चालून आलेली एक संधी आहे. त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. 
नजीकच्या काळात भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी मोठी सुवर्णसंधी आहे. टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीच्या बाहेरही तब्बल 72 टक्के नोकरीच्या संधी या इंजिनिअर्सना उपलब्ध आहेत. भारतात सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची मागणी वाढते आहे.
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमधून जात असताना, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कायापालट होत असताना प्रत्येक इंडस्ट्री, अगदी आयटी क्षेत्राबाहेरील कंपन्यांनाही सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची गरज भासते आहे आणि त्यांनी आपली दारं अशा तरुणांसाठी उघडी केली आहेत. येणारे दशक नजरेसमोर ठेवून अनेक कंपन्या, संस्था आजच या सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी गुंतवणूक करताहेत. ही संधी आपण सोडता कामा नये.
तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत असताना सायबर सुरक्षेचा प्रश्न्नही तितकाच गंभीर बनला आहे. सायबर क्राइमच्या माध्यमातून 2018मध्ये सहाशे अब्ज डॉलर्सचा फटका बसला. 2019 मध्ये हेच नुकसान तब्बल दोन ट्रिलिअन डॉलर्सपर्यंत पोहोचलं. यापुढच्या काळात सायबर क्राइमकडे अधिक गांभीर्यानं पाहावं लागेल आणि त्याचा कडेकोट बंदोबस्तही करावा लागेल. 
आगामी काळात तंत्रज्ञानातील प्रगतीच अर्थव्यवस्थेच्या चक्रालाही गती देणार आहे. मात्र या प्रगतीचा लाभ समाजातल्या प्रत्येकापर्यंत आणि लहानात लहान घटकापर्यंत कसा पोहोचेल, याची काळजीही आपल्याला घ्यावी लागणार आहे. 
तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं प्रत्येकानं सक्षम होणं हीच  आपल्या यशाची गुरुकिल्लीही आहे; पण हे घडत असताना डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करणार आहोत आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेची सर्वसमावेशी वाढ होणार आहे की नाही, याकडेही आपल्याला बारकाईनं लक्ष द्यावं लागेल.
येत्या पाच वर्षांत म्हणजे 2025 पर्यंत 175 झेटा बाइट्स इतका प्रचंड संगणकीय डेटा आपल्याकडे जमा झालेला असेल आणि 2030पर्यंत तब्बल एक अब्ज संगणकीय साधनं एकमेकांशी जोडलेली असतील. जणू अख्ख्या जगाचा तो महासंगणक असेल! आज संपूर्ण जगभरात 57 डेटासेंटर रिजन्स आहेत. येत्या काळात त्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढेल. या सार्‍या गोष्टी केवळ आपलं भविष्यच घडविणार नाहीत, तर त्याला दिशाही देणार आहेत. मात्र त्यासाठीच्या पायाभूत सुविधा आपल्याला आधी निर्माण कराव्या लागतील. भविष्यातील जगाच्या गरजा काय असतील, हे लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तजवीजही करावी लागेल.
येणार्‍या काळात निर्माण होणारा डेटा महाप्रचंड असणार आहे. डेटाच्या याच वैश्विक धाग्यानं जगाच्या प्रगतीचं वस्र विणलं जाणार आहे. ‘लिमिटलेस इस्टेट’ म्हणून आजच तो नावारूपाला आला आहे. ही ‘इस्टेट’ यापुढे आकार, विविधता आणि वेग या सार्‍याच दृष्टीनं आणखी वाढत जाणार आहे. हा ठेवा सांभाळायचा, वाढवायचा तर त्यासाठीच्या हाताळणीचं स्किलही आपल्याला प्राप्त करावं लागेल.
ही ‘डेटा इस्टेट’ हेच आगामी काळातलं एकमेव जागतिक चलन असणार आहे. ‘रिअल टाइम’मध्ये हे चलन वापरण्याचं स्किल ज्याच्याकडे असेल, तोच या काळात आघाडीवर असेल. येत्या दहा वर्षांत अतिशय वेगानं या चलनाचा प्रसार होईल आणि ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) वारूवर प्रत्येकजण स्वार झालेला असेल. त्याचं ‘लोकशाहीकरण’ करणं हे आपल्यापुढचं मुख्य आव्हान आहे. 
आज जगातल्या तब्बल 73 टक्के डेटाचा आपण काही उपयोगच करत नाही. तो अक्षरश: वाया जातो. पण हा ‘कचरा’ नसून सोनं आहे. त्याचं विेषण करून, त्याच्या वापरातून मोठी संपत्ती निर्माण होऊ शकते. 
नव्या युगात जगाची प्रगती करायची असेल, तर प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येकाला, त्यातल्या तज्ज्ञाला आधी सुपीक आणि उत्पादनक्षम बनवावं लागेल. हा वैश्विक ‘सिटिझन डेव्हलपर’च जगाला पुढे घेऊन जाईल. त्यासाठी त्याला सक्षम करणं हे आपल्यापुढचं आणखी एक आव्हान आहे. 
येत्या तीन वर्षांत, 2023 पर्यंंत वेगवेगळ्या क्षेत्रातील तब्बल पाचशे दशलक्ष अँप्स तयार झालेली असतील. गेल्या चाळीस वर्षांपेक्षा ही संख्या जास्त आहे. त्यासाठीही हे सिटिझन डेव्हलपर्स उपयुक्त ठरतील.
आपल्याकडे कोणती स्किल्स आहेत, ती पारंपरिक की अद्ययावत, यावरही आपलं भवितव्य अवलंबून असेल. आजच्या घडीला जगातील 54 टक्के कर्मचार्‍यांना आपली स्किल्स तपासावी लागतील, त्यात वाढ करावी लागेल किंवा अत्यावश्यक स्किल्स नव्यानं शिकावी लागतील.
तो काळ आता गेला, जेव्हा आपण शाळा, कॉलेजात जात होतो, पदवी घेत होतो, काही स्किल्स शिकत होतो आणि त्याबळावर नोकरी मिळवत होतो. आता नव्या युगाची स्किल्स आपल्याला कायम शिकत राहावी लागतील. आपला जॉब, आपले स्किल्स आणि आपला अभ्यासक्रम यांची सांगड घालत राहावी लागेल. ‘रिअँक्टिव्ह’ न राहता ‘प्रोअँक्टिव्ह’ व्हावं लागेल. प्रतिक्रियेकडून क्रियेकडे वळावं लागेल.
आगामी दशक सर्वार्थानं परिवर्तनाचा काळ आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांंच्या आयुष्यालाच एक नवं वळण, नवी दिशा मिळणार आहे. ‘डिजिटल टुल्स’ हे त्यासाठीचं प्रमुख अस्र आहे. बदलाच्या या काळात मायक्रोसॉफ्ट प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे. प्रगतीचा दरवाजा सर्वांंना खुली करून देणारी आधुनिक तंत्रज्ञानाची ‘डायनॅमिक्स 365’ ही गुरुकिल्ली तुमच्या हाती देतानाच प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक लहानमोठय़ा भारतीय संस्थेची डिजिटल क्षमता समृद्ध करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येक जण, प्रत्येक संस्था अधिकाधिक स्वतंत्र, स्वावलंबी कशी बनेल, स्वत:ची तंत्रज्ञान क्षमता विकसित करताना प्रत्येकाला स्वबळावर कसं पुढे जाता येईल, हे मायक्रोसॉफ्टचं मूलभूत आणि प्रमुख मिशन आहे..

(शब्दांकन : ‘मंथन’ प्रतिनिधी)

Web Title: The 'digital' key of the future!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.