शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

‘केवळ शब्दांनी रुग्णांना बरे करणारा धन्वंतरी‘!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 06:05 IST

डॉ. ह. वि. सरदेसाई. आधाराच्या केवळ शब्दांनीच रुग्णाला बरे वाटायला लावणारे डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. डॉक्टरी क्षेत्रात त्यांनी अनेक मैलाचे दगड आखून दिले. ‘डॉक्टर’ आणि ‘रुग्ण’ कसा असावा, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिले. त्यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त..

ठळक मुद्देचांगला डाॅक्टर हा उत्तम ऐकणारा असतो. सहसा उत्तम बोलणाऱ्यांमधे या गुणाचा अपवाद असतो. कदाचित स्वत:च्या आवाजाच्या प्रेमात पडल्यामुळं असं घडत असावं. सरदेसाईसर मात्र याला अपवाद होते.

- डाॅ. चंद्रशेखर फणसळकर

डॉ. ह. वि. सरदेसाई.  सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील व्यक्तींसाठी आधारवड असा लौकिक असणारे, आधाराच्या केवळ दोन शब्दांनी रुग्णाला दिलासा देणारे आणि सतत हसतमुख असणारे निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ. त्यांच्याशी फक्त बोलून आणि भेटूनच आमचे आजार बरे होतात, असेही असंख्य रुग्णांचे अनुभव आहेत.सरांना जाऊन आता एक वर्ष झालं.

हे पूर्ण वर्षच आपल्या सर्वांना एका विलक्षण, अभूतपूर्व अशा अवस्थेत जगावं लागलं. निसर्गाने माणसाला मारलेल्या जोरकस थपडेनं त्याच्या कारभाराबरोबर त्याचा अहंकारही पार विस्कटून टाकला.‘सर्वशक्तिमान’ ‘सर्वश्रेष्ठ’ असा माणूस एका य:कश्चित विषाणूच्या अकस्मात हल्ल्यानं गांगरुन भेदरून गेला. त्याच्या पायाखालची जमीनच नव्हे तर त्याचं संपूर्ण आयुष्यच या धक्क्यानं अस्थिर झालं.

ही आपत्ती थेट माणसाच्या आरोग्याशी निगडित असल्यानं साहजिकच सर्वात मोठं आव्हान तिनं वैद्यक शास्त्राच्या पुढ्यात फेकलं. जगभरच्या डाॅक्टर जमातीचा कस पाहणारी परिस्थिती निर्माण झाली. या काळात मला स्वत:ला सरांची प्रकर्षांनं आठवण होत राहिली; त्यांचं नसणं खुपत,डाचत राहिलं. ते जर या काळात असते तर खूप उपयोग झाला असता असं वाटत राहिलं.

आयुष्याचा पाया डगमगायला लागावा, कशाचीच संगती न लागावी अशी अनिश्चितता निर्माण करणाऱ्या कुठल्याही काळात एखाद्या आधारवडासारखं विशाल आणि आश्वासक व्यक्तिमत्त्व असणाऱ्या सरांसारख्या व्यक्तीची उणीव सर्वांनाच भासते. मला तर त्यांचा जवळून सहवास लाभलेला. त्यांच्याकडून कितीतरी शिकायला मिळालेलं. अर्थातच त्यांच्या आठवणी या कठीण काळात पावलोपावली येत राहिल्या...

...‘डाॅक्टरला भेटूनच अर्धा बरा झालो!’ हे वाक्य आजकालचे डाॅक्टर-रूग्ण संबंध पाहता काहीसं अतिशयोक्तीपूर्ण वाटू लागलं आहे. दवाखान्यात जायचं म्हटलं की सहसा माणसाच्या अंगावर काटा येतो. डाॅक्टरच्या रूममधे प्रवेश करताना आपण वाघाच्या पिंजऱ्यात जात आहोत अशीच भावना पेशंटच्या मनात येत असते.

याचं कारण बहुतेक वेळा पेशंटशी संवाद न साधणारे डाॅक्टर्स हे असतं. यातील अनेकांकडे ज्ञान विपुल असलं तरी आस्था-जिव्हाळ्याच्या ओलाव्याअभावी ही डाॅक्टर मंडळी विशाल पात्राच्या कोरड्या नद्यांसारखी भासतात. रूग्णांना आजारापेक्षाही अधिक भीती अशा डाॅक्टरांची वाटते.

‘रुग्णाशी आस्थापूर्वक संवाद’ हा विषय वैद्यकशास्त्राच्या कुठल्याही ‘सिलॅबस’मधे नाही! पेशंटमध्ये विश्वास निर्माण करणारं आश्वासक व्यक्तिमत्त्व घडणं हे एका डाॅक्टरसाठी वैद्यक-ज्ञान संपादन करण्याइतकंच आवश्यक असलं तरी ते वैद्यकीय विद्यालयांच्या वर्गांतून, तेथील क्रमिक पुस्तकातून कधीच घडत नाही. त्यासाठी एका सुयोग्य गुरूचा सहवास लाभणं गरजेचं असतं. सरदेसाई सरांच्या रूपानं त्यांचे अनेक विद्यार्थी आणि नंतर कमी-अधिक काळ त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळालेल्या सर्व डाॅक्टर्सना तो लाभला. मीही त्यातलाच एक. पुस्तकांनी मला पदवी दिली, ‘डाॅक्टर’ मात्र मी सरांच्या छायेत,त्यांच्याकडे शिकून झालो.

चांगला डाॅक्टर होण्यासाठी वैद्यकीय विषयांच्या ज्ञानाखेरीज इतर अनेक गोष्टी शिकणं आवश्यक असतं. त्यातली एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या रुग्णाची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान जपणं. आपल्याकडे येणाऱ्या रूग्णाला कधीही लाचारी वाटू नये, स्वत:च्या आजाराची लाज वाटू नये; त्याच्या आजाराच्या वेदनेत अपराधीपणाच्या पीडेची भर पडू नये याची काळजी एका डाॅक्टरनं सतत घेतली पाहिजे.

सर अशा प्रकारचे डाॅक्टर होते. पेशंटच्या मनात डाॅक्टरविषयी प्रेमयुक्त आदर आणि विश्वास निर्माण करत उपचार केल्यास त्याचे केवळ शरीरच बरे होत नाही तर मनही तरतरीत होते हे सरांच्या पेशंटसकडे पाहून लगेच कळायचं. त्यांना भेटायला येणारी मंडळी दवाखान्यात आली नसून एखाद्या देवळात आली आहेत असं वाटायचं. डाॅक्टर सरदेसाईंना भेटायला मिळणार याबद्दलची उत्कंठा आणि आनंद त्यांच्या (आजारी) चेहऱ्यावर सुद्धा ओसंडत असायचा!

चांगला डाॅक्टर हा उत्तम ऐकणारा असतो. सहसा उत्तम बोलणाऱ्यांमधे या गुणाचा अपवाद असतो. कदाचित स्वत:च्या आवाजाच्या प्रेमात पडल्यामुळं असं घडत असावं. सर मात्र याला अपवाद होते. पेशंट बोलत असताना अत्यंत एकाग्रतेनं व संयमानं ते त्याचा शब्द न् शब्द कानांनी टिपून घेत असत. त्यांना मी कधीही रागावलेलं, चिडलेलं, संतापलेलं पाहिलं नाही. अगदी वेडगळ आणि निरर्थक वाटतील असे प्रश्न जरी समोरचा पेशंट विचारत असेल तरी चेहऱ्यावर स्मित ठेवून त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं सर उत्तर देत असत. पेशंटबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टीही त्यांच्या लक्षात राहात याचं मला आश्चर्य वाटायचं. पण या स्मरणशक्तीचं मूळ हे बारकाईनं व संयमानं ऐकण्यात आहे हे त्यांच्याबरोबर काम करत राहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं.

सरांच्या स्वत:च्या आयुष्यातही, विशेषत: शेवटी शेवटी, प्रकृतीवर मोठी गंडांतरं येत राहिली. गंभीर,वैद्यकशास्त्रास आजच्या मितीलाही पूर्णत: न उमगलेले आजार त्यांच्या वाट्याला आले. अशा परिस्थितीत कुठल्याही व्यक्तीनं धीर सोडला असता, पण या काळात सरांना मी एक क्षणही खचलेलं पाहिलं नाही. उलट याही काळात त्यांची मनस्थिती एरवी असायची तितकी व तशीच प्रसन्न असायची. स्वत:च्या आजाराविषयी ते अशाप्रकारे बोलत की वाटावं हे दुसऱ्याबद्दलच बोलतायत! या काळात त्यांच्याविषयी आणखी एक ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे उपचार करणाऱ्या डाॅक्टरांवर त्यांनी टाकलेला संपूर्ण विश्वास. स्वत: ज्ञानानं आणि अनुभवानं ज्येष्ठ असूनही त्यांनी एकदाही या डाॅक्टरांचे उपचार,सल्ले व निर्णय यांत ढवळाढवळ केली नाही वा त्यांना विरोध केला नाही.’डाॅक्टर कसा असावा?’ असं विचारलं गेल्यास सरांच्या दिशेनं अनेक बोटं उचलली जातील यात नवल नाही. पण ‘रूग्ण कसा असावा?’ असं मला कुणी विचारलं तर मी क्षणाचाही विचार न करता सरांकडं बोट दाखवेन. सरांची स्वत:च्या व्याधींबरोबरची झुंजदेखील अनेक रुग्णांना त्यांच्या स्वत:च्या आजाराशी लढायला स्फूर्तिदायक होईल अशी होती.

 

‘संवाद घडण्यामधे सर्वात मोठी अडचण असते ती तो घडलेलाच आहे असा नेहमी होणारा भ्रम’ असं जाॅर्ज बर्नाड शाॅ म्हणाला होता. आधुनिक तंत्रज्ञान माणसाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधून काढण्यास समर्थ आहे असं मानणाऱ्यांच्या या युगात शाॅच्या या शब्दांतील सत्यता मला प्रखरपणे जाणवते. विशेषत: सध्याच्या वैद्यक-व्यवसायाची स्थिती पाहून अधिकच. तंत्रज्ञानाच्या अतिरेकी मागे लागून रुग्णाशी संवाद साधायला विसरण्याची चूक आम्हा डाॅक्टरांकडून अनेकदा होते. त्यामुळे शीड फाटलेल्या बोटीसारखे आम्ही या व्यवसायात भरकटतो. अशा वेळी योग्य दिशा दाखवणाऱ्या दीपस्तंभासारखे सरदेसाई सरांसारखे गुरू भेटणं हे दैवात असलं तर किनाऱ्यापर्यंत सुखरूप पोहोचता येतं हे नक्की.

 

मला त्यांचा सहवास मिळाला आणि ‘नोबल’ मानल्या गेलेल्या या पेशातील खऱ्याखुऱ्या ‘नोबल’ तत्वाचा स्पर्श होऊन गेल्यासारखं वाटलं. त्या स्पर्शाने कायम प्रेरित राहून काम करता येणं हीच त्यांना गुरूदक्षिणा होईल.