‘चवन्नी’ आणि ‘अठन्नी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:34 PM2018-06-10T13:34:54+5:302018-06-10T13:34:54+5:30

सटोडियांच्या जगात सावधगिरी इतकी बाळगली जाते की एकदा कुठला मोबाइल नंबर वापरला की पुन्हा त्याचा वापर होत नाही.

'Chavanni' and 'Akthani' | ‘चवन्नी’ आणि ‘अठन्नी’

‘चवन्नी’ आणि ‘अठन्नी’

googlenewsNext

रवींद्र राऊळ|

गेल्या आयपीएलमध्ये सट्ट्यात चित्रपट अभिनेता अरबाज खान पावणेतीन कोटी रुपये हरला आणि क्रिकेटमधील सट्टेबाजी नव्यानं चर्चेत आली. कधीकाळी पावसावर, कापसाच्या दरावर खेळला जाणारा सट्टा नंतर मटक्यापासून क्रिकेटपर्यंत पोहचला आणि लाखो, करोडो रुपयांचे त्यातले व्यवहार अक्षरश: किरकोळ वाटायला लागले. पोलिसांच्या अंदाजानुसार एका क्रिकेट मॅचमागे तब्बल वीस हजार कोटी रुपयांची उलाढाल होते!


‘सेशन एक पैसे का है’, ‘मैने चवन्नी खा ली है’, ‘डिब्बे की आवाज कितनी है’, ‘तेरे पास कितने लाइन है’, ‘आज फेवरिट कौन है’, ‘लाइन को लंबी पारी चाहिए’...
म्हटलं तर ही सारी वाक्यं निरर्थक अथवा अनाकलनीय वाटू शकतात; पण क्रिकेटच्या सट्टेबाजीत मात्र या वाक्यांमध्ये लाखोंची उलाढाल करण्याची ताकद असते!
अभिनेता आणि चित्रपट निर्माता अरबाज खान याने आपण गेल्या आयपीएलमध्ये सट्ट्यात दोन कोटी ७५ लाख रुपये हरल्याची कबुली पोलिसांना दिली आणि सट्टेबाजीचा विषय फिरून चर्चेत आला.
आयपीएल क्रिकेट सामन्यांतील सट्ट्याप्रकरणी अटकेत असलेला बुकी सोनू जलाल याने अरबाज खाननं आपल्याकडे सट्टा लावल्याचं सांगितल्यानं ठाणे पोलिसांनी त्याची चौकशी केली. आयपीएलच्या चार ते पाच सीझनमध्ये त्यानं सट्टा लावल्याची कबुली दिल्याचं सांगण्यात येतं. आता अरबाज खानप्रमाणे अन्य बडी नावंही सोनू जलालच्या चौकशीतून पुढे येण्याची शक्यता आहे. अर्थात क्रिकेट सट्टेबाजीत पुढे आलेलं अरबाज खान हे बॉलिवूडमधील काही पहिलं नाव नाही.
क्रिकेट सामने सुरू झाले की, सट्टेबाजीचा फीव्हर वाढत जातो. पोलिसांचे छापे पडतात, बुकींची धरपकड होते. त्यांचे मोबाइल, लॅपटॉप आणि लाखोंची रोकडही जप्त होते; पण पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी या सट्टेबाजीला काही केल्या आळा बसत नाही.
सट्टेबाजीच्या या विश्वाबद्दल सामान्य माणसाला कायम गूढ वाटत असतं. लाखो - कोटींचे आकडे छाती दडपून टाकत असतात; पण बहुतेकदा हे सारं ऐकीवच असतं. कारण या धंद्यात गोपनीयता इतकी की बुकी कोण, पंटर कोण याची गंधवार्ताही कुणाला नसते.
क्रिकेटच्या सट्टेबाजीचा निश्चित आकडा उपलब्ध होऊ शकत नाही. मात्र बुकींच्या व्यवहारावरून भारतात एका क्रिकेट मॅचमागे १० ते २० हजार कोटींची उलाढाल होत असते, असा पोलिसांचा अंदाज आहे.
खरं तर ‘सट्टेबाज आणि सटोडिये यांच्यातला हा आपापसातील व्यवहार. हार-जित त्यांच्यातच चालते. मग समाजाला त्याचं काय देणं-घेणं’, असाही काहींचा सूर असतो. पण ही सट्टेबाजी म्हणजे समाजासाठी कसं स्लो पॉयझन आहे, याचा अंदाज त्यांना नसतो. अनेक गुन्हेगारीच्या, आत्महत्येसारख्या अनुचित घटनांमागे सट्टेबाजी कारणीभूत असते. मात्र त्या समाजासमोर एकत्रितपणे येत नसल्याने त्यातील दाहकतेची कल्पना फारशी कुणाला येत नाही.
क्रिकेट सट्ट्याचं व्यसन जडलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनीतील एका कॅशिअरने कंपनीला खरेदीची बनावट बिलं सादर करून ९० लाख रुपये पत्नी आणि मित्राच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले आणि ती रक्कम सट्ट्यात लावली. अडीच वर्षानंतर ही अफरातफर व्यवस्थापनाच्या लक्षात आली; पण तोपर्यंत सारी रक्कम तो सट्ट्यात गमावून बसला होता.
घर आणि पत्नीचे दागिने विकून मिळवलेले ४५ लाख रुपये क्रिकेट सट्ट्यात हरलेल्या ग्वाल्हेरच्या एका इसमाने ट्रेनखाली आत्महत्या केली. सुसाइड नोटमध्ये त्याने आपली सट्टेबाजीची कहाणी लिहून ठेवली होती.
देशात एकही असं शहर नसेल की जेथे सट्टा लावला जात नाही. पुण्यातील एका फ्लॅटवर धाड घालण्यासाठी पोलिसांनी बेल वाजवली तेव्हा हॉलमध्ये टीव्ही मालिका पाहणाऱ्या वृद्ध दांपत्याने दार उघडलं. आत शिरलेल्या पोलिसांनी बेडरूममध्ये प्रवेश केला तेव्हा त्या दांपत्याचा मुलगा आपल्या मित्रासोबत लॅपटॉपवर बेटिंग घेत असल्याचं आढळलं. कॉटवर दहा -बारा मोबाइल फोन विखरून पडले होते. विशेष म्हणजे आपला मुलगा बेडरूममध्ये फोनवरून बेटिंग घेतोय, याची आईवडिलांना काहीच कल्पना नव्हती. सट्टेबाजीनं असं अनेक युवकांना आपल्या नादी लावलंय.
क्रिकेट बेटिंगच्या वादातून एका अठरावर्षीय युवकाची हत्या करून आरोपींनी त्याचा मृतदेह विहिरीत फेकून देण्याची घटना मुंबईत घडली.
अनेक सुखी संसार या सट्टेबाजीने गिळंकृत केलेत.
या व्यवहारात ओतल्या जाणाºया पैशांच्या राशींमुळे मैदानाबाहेरील सट्ट्याची कीड स्टेडियममध्ये म्हणजेच अगदी खेळपट्टीपर्यंत पोहोचते आणि फिक्सिंग होतं. आयपीएल स्पर्धेतील सट्टेबाजीनं क्रिकेट क्षेत्र हादरलं होतं. काही वर्षांपूर्वी आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला होता. काही महिन्यांपूर्वी याच संघातील एका खेळाडूने आपल्याला मॅच फिक्सिंगसाठी पैसे आॅफर केल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. रणजी सामन्यातील सहकारी खेळाडूकडून आपल्याला ही आॅफर देण्यात आल्याचे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सांगितले. आॅफर देणारा खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाही. मात्र गेल्या महिन्यात रणजी सामन्याच्या वेळी ड्रेसिंग रूममध्ये आपल्याला त्याच्याकडून मॅच फिक्स केल्यास पैसे देण्याचं आमिष दाखवण्यात आल्याचं राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूने सांगितलं होतं.
२०१३मधील आयपीएल सामन्यावेळी स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून एस. श्रीकांत याला अटक करण्यात आली होती. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवास यांचे जावई गुरुनाथ मयप्पन याच्यावरील बेटिंगचे आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले होते.
दहा वर्षांपूर्वी मुंबईतील दीपा बारमधील नर्तिका तरन्नुम ऊर्फ तन्नू जाफर खान हिच्या घरावर आयकर खात्याने छापा घातला असता तिची कोट्यवधींची मालमत्ता असल्याचं उघडकीस आलं होतं. क्रिकेट बेटिंग घेत असल्याचा तिच्यावर आरोप होता. सिनेअभिनेता आदित्य पांचोली हा श्रीलंकन क्रिकेट खेळाडूंना घेऊन तरन्नुमला भेटण्यास जात असल्याचीही चर्चा होती. मात्र दोघांनीही त्या आरोपांचा इन्कार केला. पोलीसही त्याबाबत काही सिद्ध करू शकले नाही.
अभिनेता विंदू दारासिंह हाही आयपीएल सामन्यातील फिक्सिंग प्रकरणात गजाआड झाला होता.
पोलीस रेकॉर्डवर येणाºया या घटना म्हणजे केवळ हिमनगाचं एक टोक. सट्टेबाजीच्या आॅक्टोपसचा अदृश्य विळखा. तो दिवसेंदिवस घट्टच होत चाललाय..



‘डिब्बे की आवाज’!
सटोडिये आणि पंटरांची या व्यवहारातील भाषाही भलतीच विचित्र. आपले व्यवहार सट्टा न खेळणाºयांना कळू नये, याची खबरदारी घेणारी. बुकींची चौकशी करताना उघड होणारी ही सांकेतिक भाषा पोलिसांचंही चांगलंच मनोरंजन करते.
सट्टा लावणाºयाला ‘लाइन’ म्हणून संबोधलं जातं. हा लाइनवाला एजंट म्हणजे पंटरच्या माध्यमातून बुकीशी संपर्क साधतो. बुकीला ‘डिब्बा’ म्हणून ओळखलं जातं. एजंटला आगाऊ रक्कम देऊन सट्टेबाजाला आपलं खातं खोलावं लागतं. त्या खात्याची एक मर्यादा असते. सट्ट्याचा भाव म्हणजे ‘डिब्बे की आवाज’. आयपीएल क्रिकेट सामन्यात २० षटकांना ‘लंबी पारी’ तर दहा षटकांना ‘सेशन’ आणि सहा षटकांपर्यंत सट्टा लावण्याची ‘छोटी पारी’ खेळणं म्हटलं जातं. सामन्याच्या पहिल्या बॉलपासून टीमच्या विजयापर्यंत भाव चढत उतरत असतात. एक लाखाचा एक पैसा, ५० हजारांचा ‘अठन्नी’, तर २५ हजारांचा ‘चवन्नी’ असा उल्लेख होतो. जर कोणी बेट लावली आणि तो कमी करू इच्छित असेल तर त्याला एजंटला फोन करून ‘मैने चवन्नी खा ली’, असं त्याला सांगावं लागतं.
अर्थातच या साºया व्यवहारांसाठी लॅपटॉप, मोबाइल, व्हाईस रेकॉर्डर इत्यादी अत्याधुनिक साधनांचा पुरेपूर वापर होतो. सटोडियांच्या जगात सावधगिरी इतकी बाळगली जाते की एकदा कुठला मोबाइल नंबर वापरला की पुन्हा त्याचा वापर होत नाही. बिंगो सॉफ्टवेअरचा यात अधिक वापर होतो. कारण ठरावीक सामन्यानंतर सारा डाटा लागलीच पुसून टाकता येतो.

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य वार्ताहर आहेत.)

Web Title: 'Chavanni' and 'Akthani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.