आव्हानातला आशीर्वाद आयुष्य उजळेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 06:00 AM2021-06-27T06:00:00+5:302021-06-27T06:00:02+5:30

आयुष्यातील प्राधान्यक्रमांची कायमच उलथापालथ होत असते. यापुढे आपल्या सर्वांना एक गोष्ट सतत स्वतःला सांगावी लागणार आहे.. कोरोनाला सामोरे जाताना जे-जे चांगले बदल आपण स्वतःमध्ये केले ते टिकवून ठेवा..

Blessings in the challenge will brighten life! | आव्हानातला आशीर्वाद आयुष्य उजळेल!

आव्हानातला आशीर्वाद आयुष्य उजळेल!

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना जाईल तेव्हा जावो, स्वतःमधील उत्तम जाणणारा माणूस आव्हानाच्या डोळ्याला डोळा भिडवू शकतो हे नक्की!

- वंदना अत्रे

सकाळी लवकर गाडी पकडण्यासाठी एखाद्या दिवशी पहाटे उठण्याची वेळ आली तर आपली अजिबात कुरकुर नसते, पण प्राणायाम किंवा व्यायाम करण्यासाठी रोज पहाटे लवकर उठावे लागेल असे चुकून जरी कोणी सुचवले तरी आपण सोईस्करपणे गप्प बसतो...! आयुष्यातील छोटे-छोटे बदल करणे आपल्याला किती अवघड वाटत असते नाही! चारही दिशांनी आपल्या आयुष्यात आरपार घुसलेल्या कोरोना नावाच्या नकोशा पाहुण्याने आपल्याला मुकाटपणे किती बदलांना स्वीकारायला लावले याची कधी तुम्ही यादी केली आहे? बदलण्याची माणसाची क्षमता किती आहे, याची जणू परीक्षा घेणारा हा काळ आणि आव्हान आहे. मला कितीतरी वेळा असे वाटते, प्रत्येक संकटात, आव्हानात काहीतरी आशीर्वाद दडलेला असतो जो कधीच आपल्याला लगेच दिसत नाही; पण एखादे रहस्य हळूहळू उलगडत जावे तशी ही आशीर्वादाची उजळ बाजू हळूहळू समोर येऊ लागते.

कित्येकांचे बळी घेणारा, हजारो कुटुंबांची जीवघेणी मोडतोड करणारा, जिवलग आप्तांची दुःखं काठावर बसून बघण्यास भाग पाडणारा हा आजार कसला आशीर्वाद आपल्या मुठीत घेऊन येणार, असे कडवटपणे म्हणावेसे वाटणे स्वाभाविक; पण प्रत्येक आशीर्वादाची काही किंमत पण असते ना..! या आव्हानाने दिलेला आशीर्वाद कोणता? अनेकांना पायदळी चिरडत सुसाट वेगाने धावत असलेल्या माणसाला थांबवत त्याच्या आयुष्यातील कित्येक गोष्टींची खरी किंमत त्याने दाखवून दिली आहे.

पैसे, आरोग्य, कुटुंब, नोकरी, माणुसकी, निसर्ग, गरजा या गोष्टींना तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे ते १ ते १० या आकड्यात दाखवा असे तुम्हाला २०१९ साली सांगितले असते तर तुम्ही जे आकडे तेव्हा लिहिले असते तेच आज लिहाल का? आयुष्यातील प्राधान्यक्रमांची अशी उलथापालथ होत असताना यापुढे आपल्याला सर्वांना एक गोष्ट सतत स्वतःला सांगावी लागणार आहे. कोरोनाला सामोरे जाताना जे-जे बदल आपण स्वतःमध्ये केले ते टिकवून ठेवण्याची!

या संकटाने आपल्याला हात धुण्याच्या आणि सामाजिक स्वच्छतेच्या सवयी नव्याने लावल्या. नियमित व्यायाम आणि प्राणायाम अशा योगशास्त्रातील अनेक साधना स्वतःच्या जीवनशैलीत सामावून घ्यायला लावल्या. आपल्या गरजा, नाती, आपल्याला उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर, निसर्ग या प्रत्येक गोष्टीकडे नव्याने बघायला लावले. कोरोना निरोप घेतोय असा भ्रम झाल्यागत आपण पुन्हा नव्याने जगणे सुरू करीत असताना हे सगळे बदल पुसून, पाटी कोरी करून पुन्हा पूर्वीच्याच शैलीने जगण्याच्या मोहात न पडणे हे नव्या परिस्थितीतील आव्हान आहे. या दीड वर्षाने आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या संयमाची ओळख करून दिली आहे. कोणत्याही आव्हानात माघार न घेता चिवटपणे टिकून राहणाऱ्या लढाऊ बाण्याचा परिचय करून दिला आहे. अनोळखी माणसाच्या हाकेला धावून जाणाऱ्या सहृदयतेच्या दर्शनाने आपण अनेकदा हेलावून गेलो आहोत. हे सगळे सांभाळून ठेवणे फार महत्त्वाचे आहे असे तुम्हाला नाही वाटत? त्यासाठी एक फार छान उपाय आहे, आणि तो म्हणजे आपल्या उत्तमाची डायरी लिहिणे. आपल्यातील उत्तमाची जाणीव ती आपल्याला वारंवार करून देते.

उत्तमाची डायरी!

सकारात्मक मानसशास्त्रातील हा एक फार प्रभावी उपाय आहे. सर्वसामान्यतः डायरी लिहिली जाते ते आपल्या मनात खदखदत असलेले दुःख, कोणापुढे मांडता न येणारे अपयश लिहिण्यासाठी. डायरी हा आपल्या जीवनाचा असा आरसा असतो जो कोणीही कधीही बघू नये अशी आपली इच्छा असते. सकारात्मक मानसशास्त्र सांगते, रोज प्रत्येकाने आपल्या उत्तमाची डायरी लिहावी. त्या दिवसात आपण जे-जे काही चांगले केले असेल त्याची, ऐकलेला चांगला विचार, जे विचार आपले कौशल्य सुधारण्यासाठी उपयोगी पडणारे आहेत, ज्या विचारांवर तुमची श्रद्धा आहे त्या सगळ्या गोष्टी या उत्तमाच्या रोजनिशीत लिहा. तुमच्यासाठी, स्वास्थ्यासाठी, प्रगतीसाठी, कोणते शब्द उपयोगी आहेत ते शोधून काढा अन् त्याची डायरीत नोंद करून ठेवा. स्वतःशी संवाद साधण्यासाठी याच शब्दांचा उपयोग करा.

उत्तमाची डायरी का लिहायची? ती आपल्याला आपल्यामधील उत्तमाची वारंवार ओळख करून देते आणि त्यावरील आपला विश्वास वाढवताना आपला आत्मविश्वासपण वाढवते. कोणतेही आव्हान हाताळण्यासाठी स्वतःची, स्वतःमधील सामर्थ्याची ओळख असणे पुरेसे आहे. कोरोना जाईल तेव्हा जावो, स्वतःमधील उत्तम जाणणारा माणूस आव्हानाच्या डोळ्याला डोळा भिडवू शकतो हे नक्की!

(ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)

vratre@gmail.com

Web Title: Blessings in the challenge will brighten life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.