जत्र पाणी वत्र फायदा

By admin | Published: September 17, 2016 01:46 PM2016-09-17T13:46:32+5:302016-09-17T13:46:32+5:30

‘तिरस्कार’ ते ‘पुरस्कार’ असा जबरदस्त प्रवास केलेल्या अंबाजोगाईतल्या राडी तांडा गावाची कहाणी

Benefits of water borne water | जत्र पाणी वत्र फायदा

जत्र पाणी वत्र फायदा

Next
>संजय तिपाले
 
‘आपल्याला पाण्यासाठी काम करायचंय, मोठं बक्षीस आहे’, असं गावच्या सरपंचांनी सांगितलं तेव्हा, ‘बिनपैशाचं कुठं राबायचं अस्तंय व्हय, अन् खड्डे खोदून कुठं पाणी साचत असतं का?’ - अशा प्रतिक्रिया होत्या. पण पुढे गावाने हिंमत धरली आणि सलग पंचवीस दिवस न थकता, न थांबता टिकाव, खोरे, टोपल्यांसह संघर्ष सुरू ठेवला. ...गावाला वॉटरकप तर मिळालाच, पण राज्यभरात हातभट्टीसाठी बदनाम झालेल्या गावाला सन्मानाची नवी ओळखही मिळाली आहे.
 
हातभट्टीच्या सुळसुळाटामुळे अख्ख्या राज्यात झालेली छी- थू... ८० टक्के कुटुंबांचे ऊसतोडीसाठी स्थलांतर... पाण्याचे सततचे दुर्भिक्ष... निसर्गाच्या लहरीपणामुळे बेभरवशाची शेती... अशा सगळ्याच विपरीत परिस्थितीत एका गावाला कुणी ऊर्जा देऊ शकेल का?
मराठवाड्यात असे झाले आहे खरे!
- पानी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते’ वॉटरकप स्पर्धेमुळे या गावात एक चैतन्य निर्माण झाले आणि पाहता-पाहता श्रमदानाची चळवळ अशी काही उभी झाली की, हातभट्टीने बदनाम झालेला अंबाजोगाई तालुक्यातील राडी तांडा एकदम प्रकाशझोतात आला....
कालपर्यंत हातभट्टी न्यायला येणाऱ्यांची वर्दळ असलेल्या राडी तांड्यावर आता पाहाल तर वेगळाच माहौल आहे. जलसंधारण, तलाव, मातीनाला बांध, नाला सरळीकरण, खोलीकरण... ही कामे पाहायला दूरदूरहून लोक येत आहेत. गावकऱ्यांनाही त्याचे भलते अपू्रप. कामे पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या भोवती गलका करत अवघ्या ४५ दिवसांत झालेला हा करिश्मा गाववाले मोठ्या कौतुकाने सांगतात. श्रमदानाची ‘भट्टी’ या गावाने अशी काही जमवली की, आता दुष्काळ कायमचा हटला आहे. 
गावाला सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत तृृतीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाल्यावर एकच उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली ती ‘जत्र पाणी साजवचं, वत्र फायदा हमार तांड्यावासूच..’ याचा अर्थ आता जेवढं पाणी गावशिवारात पडेल, तेवढं साचेल, त्याचा फायदा आम्हाला होईल’!
अंबाजोगाई शहरातून जाणाऱ्या अहमदपूर रस्त्यावर अंबा साखर कारखाना. त्यापुढे अर्धा किमी अंतरावर उत्तरेकडे जाणारा रस्ता राडी तांड्यावर घेऊन जातो. अवघी ९९३ एवढी लोकसंख्या व १६९ उंबरे असलेल्या या तांड्याने तिरस्कार ते पुरस्कार हा केलेला प्रवास अतिशय गमतीशीर आहे. त्यामागे त्यांचे अपार कष्टही आहेत. 
 
सत्यमेव जयते या वॉटरकप स्पर्धेविषयी गावाला काहीच माहीत नव्हते. अंबाजोगाईत या स्पर्धेविषयी सरपंच, ग्रामसेवकांची एप्रिल महिन्यात बैठक बोलावली होती. 
सरपंच गोविंद राठोड, ग्रामसेवक विनोद देशमुख या दोघांनी बैठकीला हजेरी लावली. सरपंच गोविंद राठोड, त्यांचे बंधू काशीनाथ राठोड, विठ्ठल राठोड, ईश्वर आडे, भगवान राठोड ही मंडळी प्रशिक्षणासाठी कोरेगाव ता. सातारा येथे गेली. तीन दिवस तेथे जलसंधारण कामांच्या अनुषंगाने तांत्रिक माहिती जाणून घेतल्यानंतर ते सर्व जण गावी परतले. दुसऱ्या दिवशी ग्रामसभा बोलावली. गावात भाजपा-राष्ट्रवादी अशा दोन पार्ट्या. ग्रामसभेला सर्वांना निरोप धाडला. 
 
‘आपल्याला पाण्यावर काम करायचयं, मोठं बक्षीस आहे’, असं सांगितलं तेव्हा, ‘बिनपैशाचं कुठं राबायचं असतं व्हयं, अन् खड्डे खोदून कुठं पाणी साचत असतं का?’-अशा प्रतिक्रिया होत्या. 
अंबाजोगाईतील ज्ञानप्रबोधिनी सेवाभावी संस्थेचे प्रसाद चिक्षे यांनी ग्रामसभेतच गावाने दारू सोडली अन् जलसंधारणाची कामं केल्यास एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. सरपंच गोविंद राठोड यांना यामुळे हुरूप आला. ते मागे हटले नाही, जेवढ्यांना सोबत यायचं त्यांनी या.. असं म्हणत त्यांनी दहा ते बारा जणांना सोबत घेऊन कुदळ, टिकाव उचलला. 
 
पायथा ते माथा!
गावाचं एकूण क्षेत्र ११० हेक्टर. त्यापैकी १६ हेक्टरवर गायरान, तर उर्वरित ९४ हेक्टर वहितीसाठी आहे. गावच्या माथ्याला असलेल्या गायरानात कामं केली तर पायथ्याशी असलेल्या जमिनीत पाण्याचा निचरा होईल, असा ठोकताळा मांडून २० एप्रिल रोजी पहिला टिकाव जमिनीत मारला. त्यानंतर पुढे सलग २५ दिवस गावाने न थकता, न थांबता टिकाव, खोरे, टोपल्यांसह संघर्ष सुरूच ठेवला. बक्षीस मिळेल की नाही माहीत नव्हतं, फक्त पावसाचं पाणी आडवायचं अन् जिरवायचं एवढंच डोक्यात ठेवून पायथा ते माथा कामं केली.
जलपुनर्भरणामुळे झटपट ‘रिझल्ट’
उन्हाळ्यात जलस्वराज्य योजनेची विहीर
कोरडीठाक पडली होती, यंदा आणखी एकही मोठा पाऊस नाही; परंतु ही विहीर अल्पशा पावसावरच डबडब करतेय. जलसंधारणाच्या कामांमुळे मिळालेल्या या झटपट ‘रिझल्ट’ने गावाला कष्टाचं चिज झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे आता छतावर पडणारं पाणीही साचविण्याचा धडाका गावाने लावला आहे. घरोघर जलपुनर्भरणाचे छोटे-छोटे प्रयोग केले आहेत. कोणी घराजवळ खड्डा घेऊन त्यात पाणी सोडलं आहे तर कोणी ते नियमित वापरात आणलं आहे. प्रत्येक घरापुढे शोषखड्डे घेण्यात आले आहेत. त्यामुळे नाल्यांमध्ये पाणी साचत नाही, परिणामी रोगराईला तांड्यावर थारा नाही. आता शौचालयांची बांधकामं वेगाने सुरू आहेत. ग्रामस्थांनी एकदाच एकत्र शौचालयाची भांडी खरेदी केली असून, पाणंदमुक्त तांडा करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 
 
तांडा दारूमुक्त, शिवार जलयुक्त
सरपंच गोविंद राठोड सांगत होते, तांड्यावरील ८० टक्के कुटुंबं हातभट्टी बनवत असत, ऊसतोडीसाठी सहा महिने स्थलांतर व गावी परतल्यावर हातभट्टी बनवून ती शेजारच्या गावात विकायची हा शिरस्ता बनलेला. जलसंधारण कामांसाठी गावातील गट-तट, भांडण-तंटे, मतभेद बाजूला सारले अन् जिद्दीने कामाला लागलो. आता गावावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तांडा दारूमुक्त, अन् शिवार जलयुक्त ही किमया वॉटरकप स्पर्धेमुळे घडली. बक्षिसापोटी मिळालेले १० लाख व मुख्यमंत्र्यांनी सहायता निधीतून जाहीर केलेली तेवढीच रक्कम असे २० लाख रुपये आता गावाच्या पदरी आहेत. हा पैसा गावच्या विकासाला लावायचा आहे.
स्वत:चं काम समजून गाळला घाम
सुरुवातीला आठवडाभर जलसंधारण कामांवर राबणाऱ्यांची संख्या २०च्या पुढेही सरकली नव्हती. हळूहळू लोकांना याचं महत्त्व पटू लागलं अन् घराघरातून महिला-पुरुष स्वत:च्या शेतातील काम समजून येऊ लागले. सर्वांनी कामं वाटून घेतली होती. प्रशिक्षण घेऊन आलेल्यांनी तांत्रिक मार्गदर्शन केलं. सरपंच पत्नी मीनाक्षी व जाऊ अनुसया यांच्याकडे श्रमदानासाठी येणाऱ्यांकरता नास्ता बनविण्याची जबाबदारी होती. काशीनाथ राठोड वाहनातून जेवण कामाच्या ठिकाणी नेत. ग्रामपंचायतचे कर्मचारी अनिल आडे व विशाल आडे हे पाणी व जेवण देण्यासाठी दिमतीला असत. 
राबणारे हात मिळाले; परंतु एवढ्यावर भागणार नव्हतं. कुशल कामांसाठी हवी होती यंत्रसामग्री व त्यासाठी पैसा. ज्ञानप्रबोधिनी सेवाभावी संस्थेने दीड लाख रुपये व मानवलोक संस्थेने ८० हजार रुपये दिले. एक एकरासाठी ३०० रुपये याप्रमाणे घराघरातून वर्गणी गोळा केली. यातून जवळपास ४० हजार रुपये जमा झाले. या सर्व पैशांतून भाड्याने जेसीबी लावून बांधबंदिस्ती, दोन बंधारे, नाला सरळीकरण, खोलीकरण केलं. काम झाल्यावर गावाला पै ना पै चा हिशेबही दिला.
 
साडेतीन हजार घनमीटर पाणी साचणार
गावाने मातीचे दोन बंधारे तयार केले असून, त्यात पहिल्याच पावसात पाणी साचलं आहे. गावात गेलो तेव्हा तीन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिल्याने या बंधाऱ्यात उगवलेल्या गवतावर गुरं चरत होती. २२०० मीटरवर नाला खोलीकरण व सरळीकरणाची कामं झाली. गायरानात जागोजागी चर खोदले असून, त्याला क्रमांक दिले आहेत. १५ फूट लांब, दोन फूट रुंद व एक फूट खोल खोदलेल्या सीसीटीमध्ये (समान समपातळी स्तर) सुमारे ३ हजार ४८९ घनमीटर एवढं पाणी एका पावसात साचू शकतं. 
वनविभागाने गायरानात लावलेली झाडं उन्हाळ्यात वाळली होती, ती आता या कामांमुळे पुन्हा हिरवीगार झाली आहेत. ४५ दिवसांची मोहीम गावाने मोठ्या कष्टातून अवघ्या ३५ दिवसांत फत्ते केली. आपण फक्त निमित्तमात्र आहोत, अख्खं गाव एक दिवसही खाडा न घेता राब राब राबलं त्याचंच हे फळ आहे, असं सरपंच राठोड सांगतात.
राडी तांडा
लोकसंख्या: ९९३
महिला: ४४०
पुरुष: ५५३
कुटुंब संख्या: १६९
क्षेत्र: ११० हेक्टर
पाझर तलाव: २
विंधन विहिरी: २१
 
महाश्रमदानात राबलं 
अख्खं गाव
४५ दिवसात १०० गुण मिळविण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर काम केलं. महाश्रमदान हा त्यातीलच एक उपक्रम. या दिवशी झाडून सारं गाव कामावर होते. अवघ्या एका तासात १२२९ सीसीटी खड्डे खोदून गावाने श्रमदानातही विक्रम केला. ग्रामसेवक विनोद देशमुख यांनी कृतिआराखडा तयार केला होता. एक दिवसही सुटी न घेता ते तांड्यावर असायचे. कुठल्याही स्थितीत बक्षीस मिळवायचंच या ईर्षेने गाव कामाला लागलं अन् वॉटरकप स्पर्धेच्या बक्षिसावर नाव कोरलं.
पाण्याचा ताळेबंद
दुतर्फा झाडं, सलाईनप्रमाणे त्यावर उलट्या बाटल्या लटकवून पाणी ठिबकण्याची केलेली व्यवस्था, प्रत्येक झाडांना जाळ्या व त्यावर पाणी फाऊंडेशन असे फलक ही आता राडी तांडा गाव आल्याची खूण बनली आहे. गावपरिसरात पाचशे झाडं लावून ती भरउन्हाळ्यात जोपासत रहिवाशांनी ‘ग्रीन तांडा’ करण्याचं ठरवलं आहे. ग्रामपंचायतीच्या भिंतीवरच पाण्याचा ताळेबंद तांड्याने जलसंधारण कामातून केलेल्या प्रगतीची साक्ष देतो. पावसाचं पडणारं अपेक्षित पाणी, वाहून जाणारं पाणी, शेती, बांधकामासाठी व रोजची पाण्याची गरज असा वर्षाचा हिशेब या ताळेबंदात मांडून ठेवला आहे. या कार्यालयात फिल्टर यंत्रणा उभारली असून लवकरच गावाला पाच रुपयांत १५ लिटर स्वच्छ व निर्जंतूक पाणी मिळणार आहे.
 
(लेखक लोकमतचे बीड येथील वार्तासंकलक आहेत.)
 

Web Title: Benefits of water borne water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.