सुरेश द्वादशीवार
दाभोलकरांना गोळ्या घालून संपवलेच गेले होते, गोविंद पानसर्यांचा ‘अपराध’ तर आणखीच मोठा!
त्यांनी अंधश्रद्धा पसरवणार्या बुवाबाबांची उपरणी नुसती खेचलीच नाहीत, तर त्या श्रद्धांच्या मूळस्थानी असणार्या धर्मश्रद्धांनाच आव्हान दिले. हे त्यांच्या विरोधकांना कसे चालणार होते?
पानसर्यांचा अपराध हा की ते या परंपरेने बदनाम ठरविलेल्या विज्ञाननिष्ठेच्या परंपरेशी एकनिष्ठ राहिले.
-----------------
मार्क्स म्हणाला होता, ‘सगळ्या चिकित्सांचा आरंभ धर्मचिकित्सेपाशी होतो.’
- मात्र धर्माचा एकमेव आधार श्रद्धा हा असल्याने आणि श्रद्धेला चिकित्सा मानवणारी नसल्याने अशा चिकित्सा सहसा होत नाहीत आणि झाल्या तरी त्या त्यांच्या शेवटापर्यंत पोहचत नाहीत.
प्रस्थापित श्रद्धांना प्रश्न विचारणे वा त्यांच्याविषयी शंका घेणे हेच या क्षेत्रात मुळात पाप मानले जाते. ‘संशयात्मा प्रणश्यति’ हा त्या प्रकाराचा शेवट असतो. हा विनाश आपोआपही घडत नाही, तो घडविला जातो.
श्रद्धेला प्रश्न विचारण्याचा पहिला मान गांधींनी ज्याला ‘जगातला पहिला सत्याग्रही’ मानले त्या सॉक्रेटिसकडे जातो. तो सगळ्या श्रद्धांविषयी संशय घ्यायचा. तो बोलून दाखवायचा आणि त्याच्यासोबतच्या तरुणांच्या तो ते गळीही उतरवायचा.. परिणामी अथेन्सच्या लोकन्यायालयाने त्याला विषप्राशन करण्याची म्हणजे मृत्युदंडाची शिक्षा दिली. सॉक्रेटिसचा परात्पर शिष्य आणि जगातील बहुसंख्य शास्त्रांची पायाभरणी करणारा अँरिस्टॉटल याला लोकांनी तशी शिक्षा दिली नाही. मात्र त्याच्या भोवतालचे वातावरणच असे बनविले की विषप्राशन करून त्यालाही आपला देह ठेवावासा वाटावा.
- श्रद्धा हे असे सार्मथ्यशाली प्रकरण आहे. त्याला आव्हान देण्यात अनेक पिढय़ांचे आयुष्य खर्ची पडले आहे. हजारो वर्षे सार्या जगात सतीप्रथा होती. भारतात तिच्यावर कायद्याने बंदी आल्यानंतरही ती बरीच वर्षे चालू राहिली. वपन संपायला किती काळ लागला? नाभिक समाजातील बहाद्दर तरुणांनी नकार दिला तेव्हाच या क्रूर प्रथेची समाप्ती झाली.
सगळ्या सुधारकांच्या वाट्याला तरी कसले जिणे आले? ल्यूथरला जिवंत जाळले, आपल्या आगरकरांना त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रेतयात्रा पाहावी लागली. सावित्रीबाईंपासून आंबेडकरांपर्यंतच्या सार्यांच्या वाट्याला कसले जिणे आले?
‘स्वतंत्र विचार करणारी स्त्री चेटकीण आहे आणि प्रत्येक चेटकीण ही देहदंडाला पात्र आहे’ असे चौथ्या शतकात पोपने सांगितले.. त्यापायी नंतरच्या काळात किती लाख स्त्रिया जिवंत जाळल्या गेल्या? गावकुसाबाहेरचे जिणे आपल्या समाजातील किती जणांच्या वाट्याला परवापर्यंत येत राहिले?
..तात्पर्य, श्रद्धा ही साधी गोष्ट नाही. ती धार्मिक असो वा सामाजिक, सांस्कृतिक असो वा राजकीय, ती जेवढी दयाळू तेवढीच प्रसंगी क्रूर होत असते. माणसे धर्मांध असतात तशी विचारांधही असतात. शंका वा संशय त्यांनाही चालत नाही. हिटलरने दोन, स्टॅलिनने पाच आणि माओने सात कोटी ‘संशयात्मे’ गेल्याच शतकात ठार मारले. श्रद्धा आणि विचार यांच्यातले भांडण सनातन आहे. त्यांच्यातली तडजोड हाच तर समाजाचा प्रवास असतो.
अब्राहम लिंकन ठार होतो, गांधीजींना गोळ्या घातल्या जातात, मार्टिन ल्युथर किंगची हत्त्या होते आणि
केनेडींचीही शिकार केली जाते.. या माणसांच्या मृत्यूच्या बातम्या होतात. समाज त्यामुळे काही काळ हळहळतो. मात्र काळ लोटला की सारे शांत होते. मारणारे सापडत नाहीत आणि कालांतराने समाजही सारे विसरतो.
तालिबान, अल् कायदा, इसिस किंवा बोकोहराम यांनी केलेल्या हत्त्याकांडांच्या बातम्या ताज्या म्हणून मोठय़ा वाटतात. अशी किती हत्त्याकांडे सगळ्या धर्म-पंथांनी पचविली याचा छडा कधीतरी लावावाच लागेल. सध्या दिल्लीतील शिखांच्या हत्त्याकांडाची चर्चा जोरात आहे आणि गुजरातेतील मुसलमानांच्या हत्त्याकांडाची कथा विस्मरणात गेली आहे. ही हत्त्याकांडे संपणारी नाहीत. त्यांच्या बातम्या दर दिवसाआड आपल्यापर्यंत येतच आहेत. दरक्षणी कोणा ना कोणाला त्याविषयीच्या धमक्या अजून दिल्या जात आहेत.
‘नरेंद्र दाभोलकरांचे आणि एन. डी. पाटलांचे हातपाय तोडा’ असे आपल्या प्रवचनातून सांगणारा एक बाबा आपल्या महाराष्ट्रातच शेकडो लोकांच्या श्रद्धेचा व दर्शनाचा विषय आहे की नाही? आसाराम नावाचा बलात्कारी माणूस तुरुंगात असतानाही त्याच्या शिष्यांचे तांडे त्याला भेटायला तेथे जातात की नाही? आणि समाजजीवनात काडीचा बदल घडवून आणू न शकणारी श्री श्रींसारखी माणसे त्यात सन्मानाचेच नव्हे, तर समृद्धीचे जिणे जगतातच की नाही?
नरेंद्र दाभोलकरांची हत्त्या होऊन किती दिवस झाले? त्यांना मारण्याच्या धमक्या येणे सुरू झाले त्याला किती दिवस लोटले? ‘दाभोलकरांचे मारेकरी पकडू’ म्हणणारे राज्याचे गृहमंत्रीही आता इतिहासजमा झाले आहेत. दाभोलकरांचे मारेकरी मात्र अजूनही मजेत आणि मोकळेच आहेत की नाही? दाभोलकरांच्या कुटुंबीयांना मारण्याच्या धमक्या नियमितपणे मिळतातच की नाही?
- गोविंदराव पानसर्यांचा ‘अपराध’ तर आणखीच मोठा! त्यांनी अंधश्रद्धा पसरवणार्या बुवाबाबांची उपरणी नुसती खेचलीच नाहीत, तर त्या श्रद्धांच्या मूळस्थानी असणार्या धर्मश्रद्धांनाच आव्हान दिले. विज्ञाननिष्ठेची शपथ घेतलेल्या या माणसाने ‘प्रबोधन’ नावाचे लोकजागरण करणारे नियतकालिक काढले आणि त्यातून विज्ञानाविरुद्ध जाणार्या प्रत्येकच रूढीची, परंपरेची आणि श्रद्धेची रेवडी उडविली. त्यांनी चार्वाकाला प्रमाण मानले आणि चार्वाकाच्या वैज्ञानिक आग्रहापुढे कोणत्याही धर्मातली श्रद्धा उभी राहू शकणारी नव्हती.
चार्वाकांनी वेदांना दुष्ट, भंड आणि निशाचरांची निर्मिती मानले आणि मृत्यूनंतरच्या सगळ्याच निर्वाणादि कथा अविश्वसनीय ठरविल्या. पूर्वजन्म नाकारला, पुनर्जन्म झिडकारला आणि ‘देव’ व ‘दानव’ यासारख्या अनुभवाला न येणार्या सार्याच गोष्टी खोट्या ठरविल्या. ‘यज्ञात बळी दिलेला पशू स्वर्गात जात असेल तर सगळे स्वर्गेच्छू स्वत:लाच यज्ञाच्या वेदीवर बळी का देत नाहीत?’ असा उद्दाम प्रश्नही चार्वाकांनी विचारला. त्यांची समाजमनावरची पकड नाकारणे अशक्य असल्याने प्रत्येक भारतीय धर्मग्रंथाने चार्वाकांना आपल्या टीकेचे पहिले लक्ष्य बनविले. ते बनविताना त्यांनी सत्यासत्याची चाडही ठेवली नाही. अगदी ‘ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत’ हा चार्वाकांच्या नावावर खपविलेला श्लोकार्धही चार्वाकांचा नव्हता. नवव्या शतकात झालेल्या जयंत भट्ट या नैय्यायिकाचा हा श्लोक मुळात
‘यावत् जिवेत् सुखम् जिवेत्,
नास्ति मृत्यू: अगोचर:,
भस्मिभूतस्य देहस्य
पुनरागमनम् कृत:’
- असा आहे. चौदाव्या शतकात झालेल्या सर्वदर्शनसंग्रहकार माधवाचार्य या वेदांत्याने त्यातला ‘नास्ति मृत्यू अगोचर:’ हा श्लोकार्ध बदलून त्यात ‘ऋणं कृत्वा’ हा बदनाम श्लोकार्ध घातला. हे करण्याचे कारण चार्वाकांची यथेच्छ कुचेष्टा करता यावी हे होते.. अशा अनेक गोष्टी येथे पुराव्यादाखल सांगता येतील.
चार्वाकांचे आव्हान एवढे जबर होते की त्यांना नेस्तनाबूत करायला सगळे धर्म, सगळ्या राजसत्ता आणि सगळे अर्थबळ एकत्र आले. मृत्यूनंतरचे जीवन, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म, पूर्वजन्म इ. कल्पना मानणारे व त्या श्रद्धांवर उभे असलेले सारे धर्म व धर्मानुयायी त्यांच्यावर उलटले. धर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता असे सारेच विरोधात गेल्याने चार्वाक एकाकी झाले आणि उपेक्षित ठरले. परिणाम व्हायचा तोच झाला. स्वत:ला सहिष्णू म्हणविणार्या भारतीय धर्म परंपरेने चार्वाकांचा एकही ग्रंथ शिल्लक ठेवला नाही. त्यामुळे आज एकविसाव्या शतकातही चार्वाकांचा अभ्यास त्यांच्या टीकाकारांच्या ग्रंथांच्या आधारे करावा लागतो. (तेराव्या शतकात सापडलेला ‘तत्वोपप्लवसिंह’ हा ग्रंथ चार्वाकांचा असल्याची एक चर्चा काही काळ पुढे आली. मात्र जयराशी भट्ट या त्या ग्रंथाच्या कर्त्याने ‘आपण चार्वाकासह कोणतेही मत बाधित करून दाखवू शकतो’ असे त्यात म्हटल्याने ती चर्चाही पुढे थांबली.)
गोविंदराव पानसरे यांचा पंथ खरोखरीच एवढा उच्छृंखल आहे काय? की त्याची तशी बदनामी त्याच्या विरोधकांनी केली?
- महाभारताच्या वनपर्वात द्रौपदी म्हणते, ‘चार्वाकांचे ग्रंथ मला समजावून सांगायला माझ्या वडिलांनी विद्वान पंडितांची नियुक्ती केली होती.’ एका राजकन्येला ज्या ग्रंथाची शिकवण दिली जाते ते उच्छृंखल किंवा ऋणं कृत्व: कसे असतील? श्रीमत् आद्य शंकराचार्यांनीही चार्वाकमताला सामान्य जनांचे मत किंवा लोकायत असेच म्हटले आहे आणि सामान्य माणूस कर्ज काढून तूप पिणारा असत नाही हे त्यांनाही कळणारे आहे.. वास्तव हे की चार्वाक विज्ञाननिष्ठ होते आणि त्यांच्या तर्ककठोर वैज्ञानिक चिकित्सेपुढे एकाही धर्माची परंपरा टिकू शकणारी नव्हती. पण सारा समाजच धर्मनिष्ठ असल्याने आणि राजधर्मापासूनचे सारे धर्म परंपरांनाच तेवढय़ा मान्यता देणारे असल्याने चार्वाक बदनाम झाले.
- गोविंदरावांचा अपराध हा की ते या परंपरेने बदनाम ठरविलेल्या विज्ञाननिष्ठेच्या परंपरेशी एकनिष्ठ राहिले.
स्वातंत्र्य आणि तर्कशुद्धता या तशाही धर्ममान्य बाबी नाहीत. त्या सलमान रश्दीला देशोधडीला लावतात आणि त्याचे शीर कापून आणणार्याला दहा कोटी दिनारांचे बक्षीस द्यायला तयार होतात. तसलिमा नसरीनला तिचा मुसलमान देश आश्रय देत नाही आणि भारतासारखा सेक्युलर देशही तिला रहायला जागा देत नाही. एम. एफ. हुसेन या आपल्याच नागरिकाला तो कतारसारख्या नगण्य देशाचा आश्रय घ्यायला लावतो आणि नरेंद्र दाभोलकरांची पुण्याच्या रस्त्यावर भरदिवसा हत्त्या होतानाही पाहतो.
गोविंदरावांची चार्वाकनिष्ठा आणि त्यांनी हाती घेतलेले प्रबोधनाचे काम याएवढेच किंवा याहूनही जास्तीचे दाहक आहे.. त्यांच्या नियतकालिकाचे नाव आहे प्रबोधन! अखेर प्रबोधनाचा तरी अर्थ काय?
- माणसाच्या जीवनात दोन निष्ठा असतात. त्यातली एक जन्मदत्त, ती जन्माने मिळते. घर, कुटुंब, जात, गाव, भाषा व देश इ. विषयीची ही निष्ठा मिळवावी लागत नाही. ती जन्माने चिकटते. दुसरी निष्ठा मूल्यांविषयीची असते. ती परिश्रमपूर्वक मिळवावी व आत्मसात करावी लागते. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, नीती, लोकशाही व ज्ञानाविषयीची ही निष्ठा आहे. प्रबोधनाचा खरा अर्थ जन्मदत्त निष्ठांकडून मूल्यनिष्ठांकडे जाणे हा आहे. हा उन्नयनाचा मार्ग आहे.
- तो ज्यांना मान्य नाही तेच गांधींना मारतात, दाभोलकरांची हत्त्या करतात आणि गोविंदराव पानसर्यांवर गोळ्या झाडतात.
‘नरेंद्र दाभोलकरांचे आणि एन. डी. पाटलांचे हातपाय तोडा’ असे आपल्या प्रवचनातून सांगणारा एक बाबा आपल्या महाराष्ट्रातच शेकडो लोकांच्या श्रद्धेचा व दर्शनाचा विषय आहे की नाही? आसाराम नावाचा बलात्कारी माणूस तुरुंगात असतानाही त्याच्या शिष्यांचे तांडे त्याला भेटायला तेथे जातात की नाही?
आणि समाजजीवनात काडीचा बदल घडवून आणू न शकणारी श्री श्रींसारखी माणसे त्यात सन्मानाचेच नव्हे, तर समृद्धीचे जिणे जगतातच की नाही?
(लेखक लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)