- डॉ. अमेय पांगारकर (एआयतज्ज्ञ)युग बदलतंय... प्रश्न एवढाच आहे की, आपण त्यासोबत बदलणार आहोत की, मागे राहणार आहोत?’आजचं युग वेगाचं, स्पर्धेचं आणि नवनवीन संधींचं आहे. या संधी साधण्यासाठी सर्वांत मोठी किल्ली म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय). कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) हे दोन शब्द आपण रोज ऐकतो. काम कितीही लहान असो वा मोठं - त्यामध्ये ‘एआय’चा सहभाग झपाट्याने वाढतो आहे. आज शिक्षण असो वा व्यवसाय, शेतकरी असो वा डॉक्टर, कलाकार असो वा बँक अधिकारी - प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या प्रकारे ‘एआय’चा करिष्मा अनुभवत आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, डॉक्टरांना रोगनिदानाची अचूकता, शेतकऱ्यांना पिकांची माहिती, उद्योगधंद्यांत उत्पादनक्षमता, ग्राहकांना तत्काळ सेवा - हे सगळं ‘एआय’मुळे शक्य होतं. इतकंच काय मोबाइल, ऑनलाइन खरेदी, तुम्हाला खायला काय आवडतं? फिरायला कुठे जायला आवडेल? सोशल मीडियावरील तुमचा आवडता कन्टेंट, रील्स हे सुचवणेदेखील ‘एआय’च अदृश्य काम आहे. त्यामुळेच ‘एआय’ आता अपरिहार्य झाला आहे.
पण, या झपाट्याने होण्याऱ्या बदलांची दुसरी बाजू म्हणजे ‘एआय’ तुम्ही जागा घेईल का? ‘एआय’ हा मानवी बुद्धीला पर्याय आहे का? एआय नोकऱ्या खाईल का? महत्त्वाचं म्हणजे एआय हा मानवी बुद्धीला पर्याय नाही. उलट तो आपल्याला अधिक सक्षम बनवतो. जसं संगणक आल्यानंतर माणसाने आपली कामं जलद केली, तसंच एआयमुळे आपली विचारशक्ती, सर्जनशीलता आणि निर्णयक्षमता अधिक कार्यक्षम होते. एआय म्हणजे आपल्या नोकऱ्यांचा शत्रू नाही. उलट, तो आपल्या क्षमतांचा विस्तार आहे. जसे मोबाइलशिवाय आज आपण कल्पनाच करू शकत नाही, तसाच एआय उद्या आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग होणार आहे; कदाचित झालाय; आपल्याही नकळत! याचा स्वीकार करताना भीती न बाळगता, त्याचा योग्य वापर करायला शिकलं पाहिजे. जर आपण या बदलाकडे पाठ फिरवली, तर आपण कालबाह्य होऊ.
‘एआय’शी हातमिळवणी कराबदलाला स्वीकारणे हीच खरी शहाणपणाची खूण आहे. काळाशी जुळवून घेतल्यास आपण फक्त टिकून राहणार नाही, तर पुढे जाणार आहोत आणि या प्रवासात ‘एआय’ हा आपला विश्वासू सोबती ठरणार आहे. उद्याचं जग त्याचं आहे आणि त्या जगात आपली जागा पक्की करण्यासाठी ‘एआय’शी हातमिळवणी करणे हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे.