शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

अजिंठ्याच्या लेण्यांमधल्या मुक्कामाची तब्बल ६६ वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 06:05 IST

डॉ. वॉल्टर स्पिंक हे अमेरिकन इंडॉलॉजिस्ट! भारतीय कला-इतिहासातला सोन्याहून तेजस्वी तुकडा असलेल्या अजिंठा लेण्यांच्या निर्मितीची कहाणी शोधण्यासाठी अख्खे आयुष्य वाहिलेल्या या संशोधकाचा १६ फेब्रुवारी जन्मदिन. त्यानिमित्ताने..

ठळक मुद्देडॉ. स्पिंक यांनी अजिंठा लेण्यांच्या निर्मितीचा निश्चित कालानुक्रम नोंदवताना लेण्यांचा पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून एक उत्खनित वास्तू म्हणून अभ्यास केला, त्याद्वारे तत्कालीन घटनांचा एक अनुक्रम मांडून त्यातून अजिंठ्याच्या रचना निर्मितीचे टप्पे निश्चित केले.

- शर्मिला फडके

प्राचीन भारतीय कला-कौशल्याचा मुकुटमणी मानली गेलेली, दीड हजाराहून जास्त वर्षे टिकून असलेली अजिंठ्याची लेणी, त्यातल्या भित्तिचित्रांमधला आजही न उणावलेला रंगांचा झळाळ, कोमल रेषांचा डौल, अत्युत्तम लयीतली रंग-चित्रांकित कथनात्मकता याची मोहिनी जगभरातल्या कलारसिकांच्या मनावर आहे.

अजिंठ्याच्या भित्तिचित्रांचा मध्यवर्ती विषय आहे बोधिसत्त्व, म्हणजे बुद्धाचे विविध जन्मांमधील अवतार, त्याची शिकवण सांगणाऱ्या जातककथांमधल्या निवडक प्रसंगांचे कथन. त्यात सलगता आहे, ठळक व्यक्तिरेखा आहेत, विविध समूह चित्रे आहेत. भित्तिचित्रांमधून आपल्या समोर दीड हजार वर्षांपूर्वीचे आपल्याच भूभागावर अस्तित्वात असलेले, म्हटले तर परिचित तरीही अनोखे जग उलगडते. त्यात ऐश्वर्यसंपन्न अभिजन आहेत तसेच सामान्य जन आहेत. अप्सरा, यक्ष, राक्षस आहेत. पशू-पक्षी आहेत. सुशोभित घरे, राजमहाल, रस्ते आहेत. बोधिसत्वाचा रत्नखचित मुकुट, तलम वस्त्रांची श्रीमंती, परदेशी प्रवाशांचे चित्रण, उत्तम मदिरा असलेले बुधले, समुद्रात विहरणाऱ्या नौका, फळा-फुलांचे बगिचे, धान्य या सगळ्यातून एका समृद्ध व्यापारसंपन्न, स्थिर नागरी जीवनाचे अस्तित्व जाणवते. नागरिकांचे दैनंदिन जीवन, खाणे-पिणे, समजुती, श्रद्धा, त्यांची देहबोली, चेहेऱ्यावरचे शांत, आश्वस्त भाव, वैविध्यपूर्ण व सुबक अलंकार, शस्त्रे, वाद्ये, खेळणी, करमणुकीची साधने... अजिंठ्याच्या भित्तिचित्रांमधे हे सर्व आहे. एका सुसंस्कृत, समाधानी, निश्चिंत, प्रगत, बुद्धिमान, धार्मिक समाजाचे बारीकसारीक तपशिलांसह केले गेलेले हे दृश्य दस्तावेजीकरण आहे. यातून आपल्याला अनेक गोष्टींचे आकलन होते. सुसंस्कृत संपन्न राहणीमान असलेला समाज, शिल्प-चित्र, संगीत, नृत्यादी कलागुणांची कदर करणारी राजसत्ता, व्यापार उदिमाने मजबूत झालेली आर्थिक क्षमता आणि प्रजाजनांच्या सुखरूपतेविषयी व सुरक्षिततेबाबत जागरूक असणारी स्थिर व खंबीर शासनव्यवस्था.

प्राचीन भारतीय इतिहासातला एक वैभवशाली कालखंड अजिंठ्याच्या भित्तिचित्रांमधे जिवंत गोठवला गेला आहे.

हा अद्वितीय पाषाण आविष्कार जन्माला आला तेव्हा महाराष्ट्रात वाकाटकांचे वैभवशाली, बलाढ्य साम्राज्य होते. संपूर्ण भारतभरात कला-कौशल्याचे पुढील काळात जागतिक स्तरावर मास्टरपीस ठरलेले अत्युत्तम नमुने उभारले जात होते. राजवाडे, भव्य वास्तू, मंदिरे बांधली जात होती. कालिदासाच्या मेघदूताची निर्मिती होत होती. प्रतिभावंत कलाकार घराणी, कला-शाळा घडत होत्या. त्यातीलच कसबी, कुशल कला-कारागिरांच्या हातून अजिंठ्याच्या भित्तिचित्रांची निर्मिती घडली. शिल्पकाराची छिन्नी आणि चित्रकाराचा कुंचला दोन्हींचे कसब त्यात पणाला लागले.

अजिंठ्याच्या या संपूर्ण पाषाण-लेणीसमूहाकरिता एकूण किती कलाकार त्याकरिता काम करीत होते, किती धन लागले, किती कालावधी लागला, कोण राज्यकर्ते होते, त्या वेळी सामाजिक परिस्थिती नेमकी कशी होती, असे असंख्य मूलभूत प्रश्न अजिंठा लेण्यांचा दोनशे वर्षांपूर्वी पुनर्शोध लागला तेव्हापासून प्रत्येक संशोधकाच्या, कलारसिकाच्या मनात ठाण मांडून होते. त्याकरिता अनेक अंदाज बांधले गेले, गृहीतके मांडली गेली. परंतु त्याचे निश्चित, पुराव्यासहित तपशीलवार उत्तर दिले डॉ. वॉल्टर स्पिंक यांनी. भारतीय कला-इतिहासातला एक सोन्याहून तेजस्वी तुकडा, ज्याला अनेक वर्षे एकाकी, निखळलेला मानले गेले, त्याच्या मागचे - पुढचे दुवे सांधता येतात, एका कडीमध्ये गुंफता येते, ही लेणी कोणा अनामिक भारतीयांनी नाही, तर एका सुसंगत इतिहासाचा भाग असलेल्या, वंशावळीचा दुवा माहीत असलेल्या धनाढ्य, बलाढ्य राजवटीने उभारलेली आहेत हे अजिंठ्याच्या चित्र-शिल्पांवर निरातिशय प्रेम करणाऱ्या या इंडॉलॉजिस्टने अतिशय प्रभावीपणे, पुराव्यानिशी दाखवून दिले.

डॉ. वॉल्टर स्पिंक अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात कला-इतिहासाचे मानद प्राध्यापक होते. २०१९ साली, वयाच्या ९१व्या वर्षी त्यांचे निधन झाले, तोपर्यंत ते सातत्याने कार्यरत होते.

अजिंठा लेण्याची सर्वप्रथम सुरुवात झाली महाराष्ट्रात सातवाहन साम्राज्याच्या आधिपत्याखाली. ही लेणी त्या काळात निर्माण होत असलेल्या इतर लेण्यांप्रमाणेच होती, उदा. कार्ले-भाजे, कान्हेरी. त्यानंतर हे काम बंद पडले व दुसऱ्या टप्प्यात सुमारे तीन शतकांच्या नंतर वाकाटक राजवटीत पुन्हा सुरू झाले. वाकाटक सम्राट हरिषेणाच्या अवघ्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत ही सर्व लेणी निर्माण झाली, याचे सुस्पष्ट, निस्संदिग्ध पुरावे डॉ. स्पिंक यांनी त्यांच्या सात खंडांच्या ग्रंथमालेत मांडले आहेत.

डॉ. स्पिंक यांनी अजिंठा लेण्यांच्या निर्मितीचा निश्चित कालानुक्रम नोंदवताना लेण्यांचा पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून एक उत्खनित वास्तू म्हणून अभ्यास केला, त्याद्वारे तत्कालीन घटनांचा एक अनुक्रम मांडून त्यातून अजिंठ्याच्या रचना निर्मितीचे टप्पे निश्चित केले. लेण्याच्या बांधकामाचे टप्पे, पद्धत, तत्कालीन राजकीय परिस्थितीचा त्यावर झालेला परिणाम इत्यादी संदर्भात पायाभूत निरीक्षणे नोंदवली. लेण्यांची रचना, खांब, कोरीवकाम यासोबतच भित्तिचित्रांच्या अभ्यासातून मिळालेल्या पुराव्यांचा सखोल विचार केला. त्यांनी लेण्यांच्या लाकडी दरवाजांच्या सांध्यांच्या जोडणीच्या दगडी भिंतींवर राहिलेल्या खुणा, लेण्यांची सूर्यभ्रमणानुसार केलेली रचना अभ्यासली, शिलालेख वाचले, शिल्प, भित्तिचित्रांची शैली, प्रत्येक रेषा, अगदी हलगर्जीपणाने उमटलेले रंगांचे ओघळही त्यांच्या नजरेतून सुटले नाहीत, त्यांनी प्रत्येक बारीकसारीक तपशिलांची नोंद केली.

ही गोष्ट सोपी तर नव्हतीच, त्याकरिता प्रचंड चिकाटी, संशोधन, शारीरिक-मानसिक परिश्रम आणि वेळ खर्ची पडला. स्पिंक यांच्या संशोधनानुसार लेणीनिर्मितीचा मुख्य काळ एकूण १७ वर्षे आहे, हा काळ निश्चित करण्याकरिता त्यांनी तब्बल ६६ वर्षे अभ्यास केला. म्हणजे लेणीनिर्मितीच्या कालावधीपेक्षा तिप्पट काळ. अजिंठ्याला स्पिंक यांनी पहिली भेट दिली १९५२ साली, सप्टेंबर २०१८ ची त्यांची अजिंठ्याची भेट अखेरची ठरली. या ६६ वर्षांच्या कालावधीत स्पिंक यांनी अत्यंत बारकाईने, लेण्यांमधील दालनांचा इंच न इंच तपासून, अभ्यासून आपली निरीक्षणे तपशीलवार सात ग्रंथांमध्ये नोंदवली. लेणीनिर्मितीच्या कामाचे टप्पे, प्रगती, आलेल्या अडचणी, राजकीय अस्थिरता आणि हस्तक्षेप या सगळ्याचा वेध घेतला. त्याबद्दल अधिक पुढच्या रविवारी.

(पूर्वार्ध)

sharmilaphadke@gmail.com

(लेखिका कला आस्वादक आहेत.)

(छायाचित्रे सौजन्य- प्रसाद पवार, नाशिक)