प्रशांत देसाई, भंडाराराज्यातील जिल्हा परिषद शाळांची अद्ययावत माहिती जीआयएस मॅपिंगमुळे आता एका ‘क्लिक’वर उपलब्ध होणार आहे. युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन (यू-डायस)च्या माध्यमातून शाळांची माहिती घेण्यात आलेली आहे. यू-डायसवर भरण्यात येणाऱ्या माहितीत शाळेतील विद्यार्थी संख्या, शाळेचा बँक पासबुक नंबर व शाळेत असलेल्या भौतिक सोयीसुविधांचा अंतर्भाव असेल़ शाळेची अक्षांश व रेखांक्षासह शाळेचे ठिकाण, शाळा कोडसह नमूद करण्यात आली आहे. ज्या शाळांची मॅपिंग करताना अडचणी येत आहेत, त्या ठिकाणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी अॅण्ड्राईड मोबाइलच्या साहाय्याने शाळांच्या सांकेतिक क्रमांकावरून शाळेची माहिती या प्रणालीला जोडण्यात येणार आहे. या प्रणालीतून शाळेचे रिपोर्टकार्ड बनल्यावर ती माहिती गुगलवर ‘स्कूल रिपोर्टकार्ड डॉट ईन’ या संकेतस्थळावर एका क्लिकवर बघायला मिळणार आहे. इंटरनेटच्या महाजालामुळे ही सगळी माहिती आता एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे.राज्यातील जिल्हा परिषद शाळांना अवकळा आली आहे. अनेक शाळा बंद पडलेल्या असून, कित्येक शाळा शेवटच्या घटका मोजत आहेत. या शाळा इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत मागे राहू नये, यासाठी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय व राज्यातील शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. यात १३ राज्यांतील शाळांची माहिती जीआयएस मॅपिंग प्रणालीने जोडण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा संकेतांक शाळेच्या दर्शनी भागात लिहिणे अनिवार्य राहणार आहे. या शाळांची माहिती कुठेही बघायला मिळावी, यासाठी राज्याचा सांकेतिक क्रमांक टाकणे गरजेचे आहे. जसा महाराष्ट्राचा सांकेतिक क्रमांक (२) आहे. त्यानंतर जिल्हा, तालुका व गावाचा तीन आकडी क्रमांक व शाळेचा दोन आकडी क्रमांक असा अकरा अंकी सांकेतिक क्रमांक टाकावा लागेल.
जि.प. शाळांची माहिती एका ‘क्लिक’वर
By admin | Updated: April 13, 2015 05:00 IST