गंगाखेड (जि. परभणी) : तालुक्यातील कोद्री येथील एक खून प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने शनिवारी विषप्राशन केले. परभणी येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.नरसिंग लटपटे या तरुणाचा मृतदेह ६ फेब्रुवारी तलावात सापडला होता. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. नरसिंगचा मित्र विठ्ठल लटपटे याला पोलिसांकडून वारंवार चौकशीसाठी बोलावले जात होते. त्याला कंटाळून विठ्ठलने शनिवारी विषप्राशन केले. विषप्राशन करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली असून गंगाखेड पोलिसांनी नरसिंग याच्या खुनासंदर्भात आपल्याला वारंवार चौकशीसाठी बोलाविले. मारहाण करून मानसिक त्रास दिला. ठाण्यातील त्या तीन-चार कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून विष घेत आहे, असे त्याने या चिठ्ठीत म्हटले आहे.नरसिंग लटपटे याच्यासंदर्भात माझ्याकडे असलेली पूर्ण माहिती दिली तरीही, पोलिसांना माझी कोणतीच गोष्ट खरी वाटत नाही. या खुनाचा तपास पोलीस चुकीच्या दिशेने करत आहेत, असे नमूद करून नरसिंगच्या मारेकऱ्याचा लवकर शोध लावावा, अशी विनंतीही या चिठ्ठीत त्याने केली आहे.
पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने केले विषप्राशन
By admin | Updated: February 29, 2016 04:15 IST