पलूस/भिलवडी (जि़ सांगली) : पलूस पंचायत समितीच्या आमसभेत उसाला एफआरपीप्रमाणो दर देण्याच्या ठरावाबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या कारणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस कार्यकत्र्यात खडाजंगी झाली. त्यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांना काँग्रेस कार्यकत्र्यानी बेदम मारहाण केली. मारहाण आणि वादावादीमुळे सभा गोंधळात पार पडली. हा प्रकार पालकमंत्री पतंगराव कदम यांच्यासमोरच घडला. मारहाणीत राजोबा जखमी झाले असून, त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
पलूस पंचायत समितीची आमसभा पालकमंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार सकाळी साडेअकराला पंचायत समितीच्या आवारात सुरू झाली. या वेळी व्यासपीठावर युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम उपस्थित होते. याप्रसंगी संदीप राजोबा यांनी गेल्या उसाच्या एफआरपीबाबत केलेल्या ठरावाचे काय झाले, असा सवाल केला. येथे उसाच्या दराचा या ठिकाणी संबंध नाही, असे काँग्रेस कार्यकत्र्यानी राजोबा यांना सुनावले. त्यातून वादावादी सुरू झाली.
पतंगरावांच्या घरावर दगडफेक
संदीप राजोबा यांना मारहाण झाल्याचे पडसाद शनिवार दुपारनंतर सांगलीत उमटले. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकत्र्यानी पालकमंत्री पतंगराव कदम यांच्या ‘अस्मिता’ निवासस्थानावर दगडफेक केली. या वेळी कार्यकत्र्याना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.