यवतमाळ : येथील पोलीस शिपायाने पोलीस मुख्यालयाच्या आवारातील कवायत मैदानावर मंगळवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली. यामागे घरगुती वादाचे कारण असल्याचे सांगितले जाते.उत्तम मारोती हुलगुंडे (५२) रा. पळसवाडी कॅम्प असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. ते यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात नायक पोलीस म्हणून कार्यरत होते. मंगळवार त्यांचा साप्ताहिक सुटीचा दिवस होता. शिरस्त्याप्रमाणे ते सकाळी १० वाजता ग्रामीण पोलीस ठाण्यात गणतीला उपस्थित होते. त्यानंतर साप्ताहिक सुटीवर रवाना झाले. दरम्यान त्यांनी पोलीस मुख्यालय गाठले. दुपारी १२ वाजताच्या सुमारास पोलीस कवायत मैदानाजवळ ते अचानक कोसळले. त्यांनी विष घेतल्याचे लक्षात येताच तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
यवतमाळ पोलीस मुख्यालयात शिपायाची आत्महत्या
By admin | Updated: August 12, 2015 02:33 IST