मुंबई : गिरणी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे मुख्यमंत्री लक्ष देत नसल्याने गिरणी कामगार संघटना मंगळवारी दादर येथील भाजप कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या आंदोलनानंतरही गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास कामगार तीव्र आंदोलन करतील, असा इशारा संघटनांनी दिला आहे. मुंबईतील बंद गिरण्याच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात लॉटरीही काढण्यात आली. परंतू सर्व गिरणी कामगारांना घरे कधी मिळतील, तसेच ती कोणत्या ठिकाणी असणार याचा कोणताही खुलासा शासनाने केलेला नाही. तसेच गिरणी कामगारांच्या अर्जांची छाननी करण्याची मागणीही संघटनांनी लावून धरली आहे. या मागण्यांची दखल घेण्यात येत नसल्याने गिरणी कामगार संघटनांनी जुलै महिन्यात भाजप कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी संघटनांच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापर्यंत हे आश्वासन पूर्ण न झाल्याने संघटनांनी पुन्हा भाजप कार्यालयावर धडकण्याचा इशारा दिला आहे.या मोर्चामध्ये सर्व श्रमिक संघटना, कामगार कल्याणकारी संघ, गिरणी कामगार सेना, मुंबई गिरणी कामगार युनियन, गिरणी कामगार सभा, एनटीसी एससी एसटी असोशिएशन या संघटना सहभागी होणार असल्याचे, कामगार नेते बाळ खवणेकर यांनी सांगितले.
गिरणी कामगारांचा आज मोर्चा
By admin | Updated: September 8, 2015 02:03 IST