मुंबई : पुण्यातील भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे मंत्रालयातील दालन अक्षरश: डोक्यावर घेतले. बाणेर भागातील माजी सैनिकांची जागा माजी आमदार विनायक निम्हण यांनी हडपली असून, त्यांना मंत्रालय आणि महापालिकेतील काही अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत त्यांनी मंत्र्यांना चांगलेच फैलावर घेतले. महिला आमदारांचे रौद्ररूप पाहून रद्द झालेली बैठक राज्यमंत्र्यांना घ्यावी लागली. पुणे शहरानजीक बाणेरमधील या जागेची पॉवर आॅफ अटर्नी ही माजी आमदार निम्हण यांच्या नावे होती. ही जागा काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडून २५ माजी सैनिकांनी खरेदी केली. ही जागा निम्हण हडपत असल्याचा या प्लॉटधारकांचा आरोप असून, ते सातत्याने दाद मागत आले आहेत. हे प्लॉटधारक आणि पुणे महापालिकेचे अधिकारी यांची बैठक राज्यमंत्री पाटील यांनी आज दुपारी आपल्या दालनात बोलाविली होती.एक प्लॉटधारक सुदाम डोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बैठकीसाठी आम्ही दालनात पाऊल ठेवत नाही तोच महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी, बैठक रद्द झाली आहे असे आम्हाला सांगितले आणि ते निघून गेले. सूत्रांनी सांगितले की, मेधा कुलकर्णी तिथे आल्या आणि त्यांनी महापालिकेचे उपस्थित अधिकारी आणि पाटील यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. मंत्र्यांच्या आॅफिसमधून अन् महापालिकेतून निम्हण यांना पाठीशी घातले जात असेल तर ते सहन केले जाणार नाही. आता न्याय द्या, नाहीतर मी इथेच उपोषण करते, असे त्यांनी सुनावले. कुलकर्णी मोठमोठ्याने बोलत होत्या. सौम्य स्वभावाचे पाटील त्यांना समजविण्याची धडपड करीत होते. तर अधिकारी नि:शब्द उभे होते.शेवटी पाटील यांनी बैठक घेतली. प्लॉटधारकांनी ज्यांच्याबाबत गंभीर तक्रारी केल्या त्या अभियंता साहेबराव दांडगेंची बदली करण्याचे आणि प्लॉटधारकांना मिळालेल्या बांधकाम परवानगीचे नूतनीकरण का केले नाही, याचे उत्तर चार दिवसांत देण्यास त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
गृहराज्यमंत्र्यांच्या दालनात महिला आमदारांचे रौद्ररूप
By admin | Updated: April 24, 2015 01:12 IST