ठाणे : श्रावण महिन्यात वेगवेगळी व्रते करण्याची प्रथा आहे. ही व्रते मनाचे आरोग्य उत्तम राहावे, संयम राखण्याची सवय व्हावी, यासाठी सांगितली आहेत. आधुनिक काळात खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी वेगळी व्रते सांगितली आहेत. रविवारी निसर्गभ्रमण करायचे, सोमवारी मोबाइल वापरायचा नाही, मंगळवारी व्हॉट्सॲप पाहायचे नाही. बुधवारी फेसबुक पाहायचे नाही, गुरुवारी घरातील टीव्ही बंद ठेवायचा, शुक्रवारी घराची स्वच्छता करायची आणि शनिवारी घरातील महिलांना विश्रांती देऊन पुरुषांनी स्वयंपाक करायचा! असे केल्याने आपल्या मनाचे आरोग्य नक्कीच चांगले राहील, असा विश्वास सोमण यांनी व्यक्त केला. सोमण म्हणाले की, आषाढ अमावास्येला ‘दिव्याची अमावास्या’ असे म्हणतात. या वर्षी गुरुवारी, २४ जुलै रोजी दिव्याची अमावास्या आहे. या दिवशी दीपपूजन करावयाचे आहे. रात्री १२:४१ पर्यंत आषाढ अमावास्या आहे. या दिवशी स्त्रिया घरातील दिवे एकत्र मांडतात. त्यांच्याभोवती रांगोळी घालतात आणि ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करतात. दीपपूजन केल्याने धन, धान्य व लक्ष्मी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. पूर्वीच्या काळी दिवे नव्हते. पावसाळ्यात घरात जास्त अंधार होतो. घरातील दिवे सुस्थितीत असावेत, त्यांची देखभाल केली जावी, म्हणून कदाचित हे सांगितले असावे, असेही साेमण यांनी सांगितले.
उद्यापासून श्रावणमासाला हाेणार सुरुवातउद्या, शुक्रवार २५ जुलैपासून शनिवार २३ ऑगस्टपर्यंत श्रावणमास आहे. श्रावणात रविवारी आदित्य पूजन, सोमवारी शिवपूजन, मंगळवारी मंगळागौरी पूजन, बुधवारी बुधपूजन, गुरुवारी बृहस्पती पूजन, शुक्रवारी जिवंतिका पूजन आणि शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन करण्याची प्रथा आहे. नववधू दर सोमवारी वेगवेगळी मूठभर धान्य शंकराला वाहते. नवीन घरात सासरी आलेल्या गृहिणीच्या हाताला धान्य दान देण्याची सवय व्हावी, हा त्यामागचा हेतू असावा, असे सोमण म्हणाले.