सावंतवाडी : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्रकार परिषदेत शिंदे सेनेच्या महिलांनी एक अनोखी मागणी ठेवली आणि सर्वानाच धक्का दिला. आपल्या वरिष्ठ नेत्याला मंत्री करा म्हणून चक्क राज्यमंत्र्यांना विनवणी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.केसरकर मागणार नाहीत पण आमची विनंती मुख्यमंत्र्या पर्यत पोचवा दीपक केसरकर यांना मंत्री करा अशी मागणी यावेळी केली. ही मागणी ऐकून प्रत्यक्षात आमदार केसरकर ही थोडे चक्रावून गेले. त्यानंतर खुद्द मंत्री योगेश कदम यांनी तर आता पत्रकार परिषद सुरू आहे या विषयावर आपण बैठकीत बोलू असे सांगत या महिला पदाधिकाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र केसरकरांना मंत्री करा असे सांगत असतानाच माजी नगरसेविका अनाराजीन लोबो यांना मात्र चांगलेच गहिवरून आल्याचे दिसून आले.मंत्री योगेश कदम हे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. सुरूवातीला त्यानी आमदार दीपक केसरकर यांच्या सर्पक कार्यालयाला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी औपचारिक गप्पा ही मारल्या. या गप्पा ऐन रंगात येत असतानाच शिंदे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून थेट मंत्री कदम यांच्याकडे शिंदे सेनेशी प्रामाणिक राहिलेल्या आमदार दीपक केसरकर यांना मंत्रीपद द्या, त्यांच्यावर अन्याय करू नका, त्यांना प्रवाहात सामावून घ्या, आमचे भाई साधे आहेत. ते काही मागणार नाहीत, असे सांगितले तसेच ही आमची मागणी मुख्यमंत्र्यापर्यंत पोचवा अशी विनवणी केली. घाटावरील आमदार ट्रक भरून माणसे नेतात तसे आमचे भाई करणारे नाहीत त्यामुळे आमच्या मागणीचा विचार करा असे सांगितले. महिलांच्या या भूमिकेमुळे सर्वच जण चक्रावून गेले होते.त्यांना केसरकर यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मागणी करण्याची ही जागा नाही, असे त्यांना सांगितले. तर कदम यांनीही ही पत्रकार परिषद सुरू आहे आपण नंतर आढावा बैठक झाल्यानंतर बोलू, असे सांगून कदम यांनी त्यांना प्रतिसाद दिला.पण अनारोजीन लोबो महिला जिल्हाप्रमुख निता कविटकर भारती मोरे यांनी आपली मागणी लावून धरली.
केसरकर यांना एकनाथ शिंदे मोठे पद देतीलआमदार दीपक केसरकर हे ज्येष्ठ नेते आहेत त्याचा सन्मान राखला जाईल यात कुठलीही शंका नाही. पण सर्वांची मागणी बघता एकनाथ शिंदे हे केसरकर यांना मोठे पद देतील यांची मला खात्री आहे असे मंत्री कदम यांनी महिलांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.