सुरेश भटेवरा / नवी दिल्ली बुधवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारला चारही बाजूंनी घेरण्याची तयारी विरोधी पक्षांनी चालवली आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर, देशभरातील बँकांसमोर लागलेल्या रांगा, बंद एटीएम आणि घिसाडघाईने राबवलेल्या निर्णयांच्या विरोधात, विरोधकांची अभेद्य एकजूट झाल्याचे चित्र दिसत आहे. मार्क्सवादी, भाकप, द्रमुक, समाजवादी, जनता दल (यू) व बसपच्या नेत्यांनी दरम्यान एकत्रित बैठक घेतली. सीताराम येचुरी बैठकीनंतर म्हणाले, नोटबंदीचा निर्णय मागे घ्या, अशी आमची मागणी नाही. निर्णयाला आमचा विरोधही नाही. मात्र, निर्णयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत.उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हिवाळी अधिवेशन गोंधळ गदारोळाने गाजणार आहे. नोटबंदीच्या विरोधात काँग्रेस, समाजवादी, बसप व तृणमूलने उघड भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. मल्लिकार्जुन खडगे म्हणाले की, ‘नोटबंदीच्या मुद्द्याखेरीज भोपाळमधील सिमी आरोपींचे एन्काउंटर, ओआरओपी, तीन तलाक, काश्मीरची स्थिती, अर्थसंकल्पात रेल्वे बजेटचे विलिनीकरण, यावरही आम्ही जाब विचारणार आहोत.’
हिवाळी अधिवेशनावर ‘पाचशे, हजार’चे दाट धुके
By admin | Updated: November 16, 2016 07:02 IST