उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येणार, भाजपसोबत पुन्हा महायुती स्थापन करणार अशा प्रकारची वक्तव्ये गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटाचे नेते, भाजपाचे नेते करत आहेत. तशा प्रकरच्या घडामोडी सुरु असल्याची वृत्ते देखील प्रसारमाध्यमांत येत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील नुकताच दावा केला होता. यावर भाजपाचे खासदार नारायण राणे यांची प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊतांना चांगले दिसत नाही. ते ज्या बातम्या देतात त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात, अशी टीका राणे यांनी केली. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे चांगले काम करताहेत. काही दिवस ते गप्प होते, पुन्हा कामाला लागले आहेत. त्यामुळे राऊतांना चांगले दिसत नसल्याने ते शब्द वापरतात. त्याला एक दिवशी चांगले बोलायला आम्ही शिकवू, असा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.
याचबरोबर शिरसाट यांच्या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या वक्तव्यावर राणे यांनी आपले मत मांडले. माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत, असे राणे म्हणाले. येणाऱ्या पावसाच्या आत मुंबई गोवा महामार्गाचे बहुतांश काम करण्याचे प्रॉमिस ठेकेदाराने केलेले आहे, असेही राणे म्हणाले.
शिरसाट काय म्हणालेले...दोन्ही शिवसेना एकत्र यायला हवी, असे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटते. आजही आम्ही सुखदु:खाची विचारपूस करतो. अशावेळी दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा शिंदेसेनेचे प्रवक्ता संजय शिरसाट यांनी येथे एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.