- मनोहर कुंभेजकर
मुंबई –मुंबई शहराचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे मालाड पश्चिमचे आमदार असलम शेख यांनी दि,८ सप्टेंबर रोजी ईदची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना एका पत्राद्वारे केली आहे.
यावर्षी रबी-उल-अव्वल (ईद-ए-मिलादुन्नबी (स.अ.व.)) आणि शहरातील इतर मोठे सण एकाच काळात येत आहेत. गणेश विसर्जन मिरवणुका व अनंत चतुर्दशीमुळे शहरात गर्दी आणि हालचाली वाढणार असल्याने सौहार्द, शांतता आणि सर्व धर्मांतील नागरिकांच्या भावना विचारात घेऊन मुस्लिम समाजाने स्वतःहून दि,८ सप्टेंबर रोजी ईद मिलाद मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे.
असलम शेख म्हणाले की, राज्यात इतर धर्मांच्या मोठ्या सणांना सार्वजनिक सुट्टी दिली जाते. मग मुस्लिम समाजाच्या धार्मिक उत्सवाला का नाही? हा दिवस केवळ एका धर्माचा नव्हे, तर सामाजिक ऐक्याचा, शांततेचा आणि भाईचार्याचा संदेश देणारा आहे.
धार्मिक व सामाजिक नेत्यांनीही या मागणीचे समर्थन करत राज्य सरकारकडे त्वरित निर्णय घेण्याचा आग्रह धरला आहे. सर्व नागरिकांचा विचार करून दि,५ सप्टेंबर ऐवजी दि, ८ सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली पाहिजे. जेणेकरून शहरात आणि राज्यात हा उत्सव शांतता, सहिष्णुता आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा होऊ शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले.