पुणे : राज्यातील १२५ नाट्यगृहांचे सर्वेक्षण होऊन दीड महिना उलटला तरी दुरुस्तीबाबतच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीला मुहूर्त सापडलेला नाही. अहवालातील त्रुटींची दखल घेऊन नाट्यगृहे कधी कात टाकणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाट्यगृहांची दुरवस्था, उत्तम दर्जाच्या ध्वनी-प्रकाश योजनेचा अभाव, प्रेक्षकांच्या आसन व्यवस्थेचा बोजवारा, सभागृहांचे नाट्यगृहात झालेले रुपांतर या पार्श्वभूमीवर सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी नाट्यगृहांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे हे सर्वेक्षण सुमारे अडीच महिने करण्यात आले. सर्वेक्षण समितीत पदाधिकारी, विद्यार्थी आणि रंगकर्मींचा समावेश होता. या समितीतर्फे सुमारे १२५ नाट्यगृहांची सद्यस्थिती पडताळून पाहण्यात आली. त्यानंतर या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला.सांस्कृतिक संचालनालयातर्फे प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप बैठक झालेली नाही. बैठकीनंतरच नाट्यगृहांबाबत निर्णय होऊन अंमलबजावणीला सुरुवात होईल.- अजय आंबेकर, संचालक, सांस्कृतिक संचालनालय
नाट्यगृहे कधी कात टाकणार?
By admin | Updated: September 15, 2015 01:10 IST