पुणे : शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मी अतिशय संवेदनशीलपणे सांगितलेले आहे. कर्जमाफी कधी करायची, या संदर्भातील काही नियम आहेत. त्याची एक पद्धती आहे. या सरकारने दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. उचितवेळी, याेग्यवेळी हा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘वारकरी भक्ती योग’ कार्यक्रमानंतर शनिवारी माध्यमांना सांगितले.
प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी अलीकडेच उपोषण केले. दुसरीकडे, महायुतीतील काही नेते आम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिलेच नव्हते, असे म्हणत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले हे स्पष्टीकरण महत्त्वाचे ठरते.
लवकरच प्राध्यापक भरती
विद्यापीठातील रिक्त जागांवर भरतीप्रक्रिया लवकरच सुरू होईल. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.