आज रामटेकमध्ये प्रचार सभा नागपूर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराचा मोर्चा पूर्व विदर्भाकडे वळविला आहे. रविवारी रामटेक येथे काँग्रेसचे उमेदवार सुबोध मोहिते यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी जाहीर सभा घेणार आहेत. रामटेकच्या नेहरू मैदानावर दुपारी १२ वाजता ही जाहीर सभा होईल. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रामटेक मतदार संघात लोकसभेत भगवा फडकला. त्यामुळे विधानसभेत तरी काँग्रेस रामटेकचा गड सर करणार का, याकडे लक्ष लागले आहे.राहुल यांच्या सभेसाठी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण मतदारसंघाची निवड केली असल्यामुळे पक्षाची यंत्रणा कामाला लागली आहे. सभेला केंद्रातील व राज्यातील काँग्रेस नेतेही उपस्थित राहतील. राहुल गांधी यांचे रामटेक येथे हेलिकॉप्टरने आगमन होईल. त्यासाठी नेहरू मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. नेहरू मैदानावर शेकडो कामगार रात्रंदिवस कामाला लागले आहेत. सुरक्षा यंत्रणेने शुक्रवारी या मैदानाची पाहणी केली. सुरक्षा यंत्रणा शनिवारपासून या कामाची सूत्रे आपल्या हाती घेणार आहे.(प्रतिनिधी)
गड जिंकणार का राहुल गांधी ?
By admin | Updated: October 12, 2014 01:25 IST