ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २६ - युती व आघाडीमध्ये 'घटस्फोट' झाल्यानंतर राज्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे सूत जुळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. विधानसभेच्या कामकाजावरुन राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणी 'फिक्सिंग' केले हे स्पष्ट होते असे सूचक विधान करत फडणवीस यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना - भाजपची २५ वर्षांची युती व काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षांची आघाडी गुरुवारी तुटली आहे. यामुळे राज्यात नवीन राजकीय समीकरणे दिसू शकतील अशी चिन्हे आहेत. युती तुटल्यावर शिवसेना नेत्यांनी भाजप - राष्ट्रवादीमध्ये जवळीक निर्माण झाल्याचा आरोप केला होता. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आघाडी तोडण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'टायमिंग'वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेनेच्या आरोपाला अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत जाणार नाही असे स्पष्टीकरण दिले. भाजपनेच विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार उघड केला होता अशी आठवणही त्यांनी करुन दिली. राज्यात भाजप व घटक पक्षांची सत्ता येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच युतीत येण्याबाबत आठवले यांच्याशी चर्चा सुरू असून लवकरच त्यावर निर्णय होईल, असे फडवणीस यांनी नागपूरमधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारीक अन्वर यांनीही भाजपसोबत जाण्याचे वृत्त निराधार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्यास सक्षम आहे असेही अन्वर यांनी नमूद केले.