मोरेश्वर बडगे - नागपूरपंतप्रधान नरेंद्र मोदी ७ आॅक्टोबरच्या नागपूरच्या सभेत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीबाबत काय बोलतात याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. गोंदियाच्या रविवारच्या सभेत मोदींनी विदर्भ राज्याच्या मागणीचा विषय अनुल्लेखाने टाळला. त्यामुळे विदर्भाची घोर निराशा झाली. नागपूरच्या सभेत मोदींनी विदर्भ राज्याबाबत स्पष्ट घोषणा करावी अशी जनतेची अपेक्षा आहे. कारण विदर्भ राज्याच्या मागणीला अनुकूल असा तो एकमेव राजकीय पक्ष उरला आहे. दोन्ही काँग्रेस, शिवसेना, मनसे यांनी महाराष्ट्राचे तुकडे करण्याला विरोध करण्याची भूमिका जाहीर केली आहे. पण भाजप स्पष्ट भूमिका घेत नसल्याने विदर्भवाद्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे. निवडणूक आठ दिवसांवर आली असतानाही भाजपने विदर्भ राज्याचा विषय हा निवडणुकीचा इश्यू बनवल्याचे दिसत नाही. भाजपच्या प्रचारामध्येही विदर्भ राज्याचा विषय निघत नाही. विदर्भाचा बॅकलॉग, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याची कुठेही चर्चा होताना दिसत नाही. मात्र व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांमध्ये निवडणूक बुडून निघते आहे. पक्ष म्हणून भाजपने विदर्भ राज्याची मागणी सातत्याने उचलून धरली. २० वर्षांपूर्वी भाजपच्या भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विदर्भ राज्याचा ठराव संमत झाला होता. आजही भाजपचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस विदर्भ राज्याची भाषा बोलतात. पण भाजपच्या निवडणूक अजेंड्यात विदर्भ राज्याची मागणी नाही. शिवसेनेचा अडथळा दूर झाला असताना भाजपने चालवलेल्या ह्या लपवाछपवीमुळे संशयाचे वातावरण पसरले आहे. नागपूरच्या सभेत स्पष्ट घोषणा करून मोदींनी संभ्रम दूर करावा, राजकीयदृष्ट्याही ते त्यांच्या फायद्याचे ठरू शकते असा राजकीय समीक्षकांचा तर्क आहे.
मोदी आज विदर्भ राज्यावर बोलतील?
By admin | Updated: October 7, 2014 00:55 IST