ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.29 - भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीअगोदर त्यांनी भाजपाचे आमदार व पदाधिका-यांची बैठक घेतली. गावपातळीवर पक्षसंघटना मजबूत करण्याची सूचना देत असताना २०२४ साली लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रच होण्याची शक्यता असलल्याचे संकेत दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शाह सध्या देशातील विविध भागांना भेटी देऊन स्थानिक पदाधिका-यांशी संवाद साधत आहेत. भाजपातर्फे १ जूनपासून विस्तारक योजना राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा अचानक नागपूर दौरा ठरला.
नागपुरात येताच शाह यांनी अगोदर नागपुरातील आमदार, पदाधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीला उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.अजय संचेती हेदेखील उपस्थित होते. नागपूर व विदर्भातील पक्षविस्तारासंदर्भात त्यांनी पदाधिका-यांकडून जाणून घेतले. तसेच त्यांना विविध सूचना केल्या. २०१९ च्या निवडणूकांसोबतच २०२४ च्या टप्प्याकडे लक्ष देऊन पक्षबांधणीला लागा, अशी सूचना केली. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र होण्याची शक्यता आहे का असा प्रश्न नागपुरातील पदाधिका-यांनी शाह यांना केला. एकत्र निवडणूका घेणे शक्य आहे. मात्र लोकसभेसोबतच इतर निवडणूका घेण्यासाठी सर्वांची कालमर्यादा विचारात घ्यावी लागले. ही मोठी प्रक्रिया आहे. ती होईल तेव्हा होईल. मात्र असे झालेच तर आपली तयारी हवी या दृष्टीने संघटन बांधणी करायला हवी, असे शाह यांनी सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांना विचारणा केली असता या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र शाह यांनी कुठलेही स्पष्ट संकेत दिले नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान भाजपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी मात्र वरील वृत्ताला दुजोरा दिला.
सरसंघचालकांची घेतली भेट, समन्वयावर चर्चा
दरम्यान, शाह सायंकाळी ५ च्या सुमारास संघ मुख्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी डॉ.भागवत तसेच सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांची भेट घेतली. तिघांमध्येही सुमारे दीड तास बंदद्वार चर्चा झाली. शाह अडीच तास मुख्यालयात होते व सायंकाळी ७.४० वाजता ते तेथून रवाना झाले. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत संघ पदाधिका-यांनी मौन साधले. शाह यांनीदेखील बोलण्यास नकार दिला. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ च्या लोकसभा निवडणूकांसाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कमकुवत जनाधार असलेल्या प्रदेशावर जास्त लक्ष केंद्रीत करावे. तसेच मित्रपक्षांशी प्रभावी समन्वयावर भर द्यावा, अशी सूचना संघातर्फे शाह यांना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार, काश्मिरमधील तापलेले वातावरण, कर्नाटकमधील पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणूका या मुद्द्यांवरदेखील चर्चा झाली.
सरसंघचालक, शाह एकाच विमानात
अमित शाह दुपारी १२.१५ वाजता नागपुरात दाखल झाले. आश्चर्याची बाब म्हणजे सरसंघचालकदेखील त्याच विमानातून नागपूरात आले. मात्र बाहेर निघताना दोघेही एकत्र न येता वेगवेगळे बाहेर आले. सरसंघचालक संघ मुख्यालयाकडे रवाना झाले तर शाह यांच्या गाड्यांचा ताफा रविभवन शासकीय अतिथीगृहाकडे वळला.