डॉक्टर महिला : संगणक अभियंता पतीचे कृत्यपुणे : संगणक अभियंता पतीने डॉक्टर असलेल्या पत्नीचा तिच्याच दवाखान्यात धारदार हत्यारांनी वार करीत खून केल्याची घटना वाकड येथे रात्री साडेआठच्या सुमारास घडली. आईचा वडीलांकडून खून होताना पाहिलेला तीन वर्षांचा मुलगा बाहेर येऊन जोरजोरात रडू लागल्यावर ही घटना उघडकीस आली. शेजारच्या दुकानदाराने धावत पोलीस चौकीमध्ये जाऊन माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी धावले.
नंदीनी मनोज पाटीदार (वय 30, रा. वाकड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती मनोज पाटीदार (वय 33) याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदीनी या डॉक्टर होत्या. त्यांचा वाकडमध्येच आशिर्वाद रिजेन्सीमध्ये मदर केअर नावाचा दवाखाना आहे. तर मनोज संगणक अभियंता असून एका खासगी आयटी कंपनीमध्ये नोकरीस आहे. नंदीनी यांचे माहेर येरवड्यात आहे. हे दोघेही त्यांच्या तीन वर्षांच्या मुलासह वाकडमध्ये एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहण्यास होते. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांच्यामध्ये कौटुंबिक वादामधून भांडणे झाली होती. त्यावेळी त्यांचा मुलगाही तेथे हजर होता. आरोपीने नंदीनी यांना ओढत दवाखान्याच्या आतमध्ये नेले.
बराच वेळ त्या दोघांमध्ये वाद विवाद सुरु होता. साधारणपणे साडेआठच्या सुमारास त्यांचा मुलगा रडत बाहेर आला. त्यावेळी शेजारील दुकानदाराने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वडीलांनी आईला मारहाण केल्याचे सांगितले. दुकानदाराने आतमध्ये जाऊन पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नंदीनी त्यांना दिसल्या. या दुकानदाराने धावत जाऊन जवळच्या पोलीस चौकीमध्ये माहिती दिली. माहिती समजताच उपनिरीक्षक किंद्रे त्यांच्या सहका-यांसह घटनास्थळी धावले. मनोज याचा शोध तातडीने सुरु करण्यात आला होता.