Anjali Damania Ujjwal Nikam news marathi: 'उज्ज्वल निकम हे धनंजय मुंडे यांना सरकारी वकील म्हणून हवे होते. माझ्या मनाची पूर्ण तयारी नव्हती', असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी नियुक्तीबद्दल भाष्य केले. धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत त्यांनी उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीबद्दल भूमिका मांडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकार वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.
उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, अंजली दमानियाची भूमिका काय?
अंजली दमानिया म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांची अडीच महिन्यांपूर्वी भेट झाली होती. त्यांची नियुक्ती करणार असे बोलले जात होते. आता त्यांची नियुक्ती झाली आहे, त्यामुळे बरं यासाठी वाटतंय की, धनंजय देशमुख यांना ते वकील म्हणून हवे होते. त्यांचा निकमांवर प्रचंड विश्वास आहे. माझी त्यांच्याशी (धनंजय देशमुख) जेव्हा चर्चा झाली होती, तेव्हा माझ्या मनाची त्याबद्दल इतकी तयारी नव्हती. कारण उज्ज्वल निकमांच्या मुलाने एकदा धनंजय मुंडेंची एकदा केस लढली होती. त्यामुळे मी प्रॅक्टिकल होते."
...म्हणून मी उज्ज्वल निकमांच्या नावाला नकार दिला होता
"धनंजय देशमुख यांना उज्ज्वल निकम यांच्या प्रचंड विश्वास आहे उज्ज्वल निकमांवर आणि मला देखील वाटतं की, वकील म्हणून ते अतिशय उत्तम आहेत, पण त्यांचा मुलगा लढला होता म्हणून मी नकार दिला होता. पण, देशमुख कुटुंबाला ते हवे असतील, तर त्यांची मागणी पूर्ण झाल्याचे बघून चांगलं वाटतं आहे", असे दमानिया निकमांच्या नियुक्तीबद्दल बोलल्या.
"ते वकील म्हणून कर्तबगार आहेत. ते प्रत्येक गोष्ट लावून धरतील, मुद्दे लावून धरतील. कारण ही ताकदीने लढवावी लागणारी केस आहे आणि उज्ज्वल निकम अतिशय उत्तमपणे ते करतील", अशी अपेक्षा दमानियांनी व्यक्त केली.
"राजकारण बाजूला ठेवून वकील म्हणून ते अतिशय उत्तम आहेत. मलाही याची खात्री आहे. पण, कसं आहे की, त्यांच्या मुलाने धनंजय मुंडेंची केस लढवली होती. त्यामुळे त्याबद्दल नकारात्मक होते, पण मला असं वाटतं की, ते वकील म्हणून उत्तम आहे आणि ते चांगले लढतील अशी अपेक्षा आहे", अशी भूमिका अंजली दमानिया यांनी उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीबद्दल मांडली.