मुंबई : राजकारणातील पुरुषांनी काही क्षेत्रे ही महिलांकरिता राखीव केली असून आम्हाला त्या क्षेत्रांपुरते मर्यादीत राहण्याची सक्ती का केली जाते, असा सवाल राजकारणातील स्त्री शक्तीने एकमुखाने केला. मात्र, यापुढे या सापत्न वागणुकीकरिता कुढत न बसता संघर्ष करण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.‘आर. आर. पाटील फाऊंडेशन’ प्रस्तुत ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार २०१६’ या सोहळ््यात डॉ. नीलम गोऱ्हे, मंदाताई म्हात्रे, विद्या चव्हाण आणि यशोमती ठाकूर या राजकारणातील कर्तृत्ववान महिलांना महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सूत्रसंचालक या नात्याने बोलते केले. प्रारंभीच या सर्व महिला राजकारणातील आपल्या सहकारी असल्याने आपल्या प्रश्नांनी त्या नाराज झाल्या तर उद्या मला त्यांना तोंड दाखवणे कठीण होईल,असे सांगत पंकजा यांनी संभाषणाची सुरुवात केली.सर्वात ज्येष्ठ महिला राजकारणी नीलम गोऱ्हे यांना त्यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हाची चळवळींची दशा-दिशा आणि आताची परिस्थिती याबाबत पंकजा यांनी विचारले. त्यावर गोऱ्हे म्हणाल्या की, प्रश्नांचे स्वरुप तेच आहे. मात्र अविष्कार बदलले आहेत. आता ‘पोकेमॉन गो’ सारख्या खेळाबद्दलही आम्हाला बोलावे लागते. चळवळ करून ज्या प्रश्नांची उत्तरे दीर्घकाळ मिळत नाहीत ती एखाद्या लक्षवेधीच्या माध्यमातून मिळतात आणि संबंधितांना दिलासा लाभतो. ही लोकशाहीत विधिमंडळाच्या सभागृहांची ताकद आहे. (टाळ्या)नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांवर हातोडा घालण्यावरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि मंदा म्हात्रे यांच्यात झालेल्या संघर्षाचा धागा पकडून पंकजा यांनी ‘आमदार दबंग असतो की अधिकारी?’, असा मार्मिक सवाल केला. त्यावर मंदाताई म्हणाल्या की, काम करताना आमदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात महिला आमदाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो, असे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
आम्हाला महिलांच्या क्षेत्रांपुरतेच मर्यादित का ठेवता?
By admin | Updated: August 5, 2016 05:08 IST