मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा अखेर १७ वर्षांनी निकाल आला आहे. या खटल्यातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यात लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचाही समावेश आहे. मालेगावच्या भिखू चौकात झालेल्या स्फोटामुळे १०० हून अधिक निष्पाप जखमी झाले होते तर ६ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या आरोपात कर्नल पुरोहित ९ वर्ष जेलमध्ये होते. २०१७ साली सुप्रीम कोर्टाकडून त्यांना जामीन मिळाला होता. राजकारणामुळे पुरोहितांना अडकवण्यात आले, ज्यामुळे त्यांना ९ वर्ष जेलमध्ये राहावे लागले असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने तेव्हा नोंदवले होते.
कोण आहेत कर्नल पुरोहित?
कर्नल पुरोहित यांचे वडील एक बँक अधिकारी होते. पुण्यात जन्मलेले कर्नल पुरोहित यांचे शालेय शिक्षण अभिनव विद्यालयात झाले तर गरवारेमधून त्यांनी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केले. १९९४ साली मराठा लाइट इन्फ्रेंट्रीमध्ये त्यांना स्थान मिळाले. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना मिलिट्रीच्या इंटेलिजेंस विभागात शिफ्ट केले. २००२ ते २००५ या काळात दहशतवाद विरोधी ऑपरेशनसाठी त्यांना एमआय २५ इंटेलिजेंस फिल्ड सिक्युरिटी यूनिटमध्ये तैनात केले. नाशिकमधील निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्या ते संपर्कात आले. मालेगाव स्फोटातील आरोपी असलेले उपाध्याय यांनी अभिनव भारत ही संघटना बनवली होती. त्यात पुरोहित सहभागी झाले होते. मालेगाव स्फोटाचा आरोप याच हिंदुत्ववादी संघटना अभिनव भारतवर लावला होता. पुरोहित यांच्यावर सैन्याचे ६० किलो आरडिएक्स चोरणे, अभिनव भारतला फंडिंग करणे आणि संघटनेतील लोकांना ट्रेनिंग देण्याचा आरोप होता. चोरी झालेल्या आरडिएक्सचा काही भाग मालेगाव स्फोटात वापरला होता असं सांगण्यात येते.
कसं केले होते टॉर्चर?
मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेले लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी या प्रकरणात मला कसं अडकवण्यात आले, त्यानंतर कसे टॉर्चर केले हे कोर्टाला सांगितले होते. मुंबईतील एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांचा छळ केला, डावे गुडघे तोडले. त्याशिवाय एटीएस अधिकाऱ्यांनी माझ्यावर आरएसएस, विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांची आणि गोरखपूरचे तेव्हाचे खासदार योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यासाठी दबाव टाकला होता असं पुरोहित यांनी म्हटलं होते. २९ ऑक्टोबर २००८ साली पुरोहितांना अटक करण्यात आली परंतु एटीएसने त्यांना अटक केल्याचं दाखवले नाही. मुंबईत त्यांना अटक केल्यानंतर खंडाळा येथे बंगल्यात नेण्यात आले. तिथे अनेक बडे अधिकारी उपस्थित होते असं पुरोहित यांनी जबाब नोंदवला होता.
काय घडलं होते?
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावातील लोक रमजान महिना आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यात व्यस्त होते. रात्री ९.३५ वाजता मालेगावच्या भिखू चौकात बॉम्बस्फोट झाला. सर्वत्र धूर आणि लोकांचे किंकाळ्या ऐकू येत होत्या. स्फोटात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. १०० हून अधिक लोक जखमी झाले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतात. या ठिकाणीच हा स्फोट झाला होता.