टीम लोकमत, मुंबईमुंबईत ‘नाइटलाइफ’ असावे की नसावे, यावर राजकीय आखाडा रंगलेला आहे. याच विषयावरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावल्यानंतर भल्याभल्यांची तोंडेही बंद झाली आहेत. मात्र सर्वसामान्य मुंबईकर गाढ झोपेत असताना आजही मुंबईमध्ये ‘नाइटलाइफ’ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव ‘टीम लोकमत’च्या रिअॅलिटी चेकमधून समोर आले आहे. कायद्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरांत हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार रात्रभर सुरू ठेवता येत नाहीत. रात्री ११ वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवता येतात. रेस्टॉरंटमधील परमिट रूमसाठी १.३० वाजेपर्यंत परवानगी आहे. बारदेखील रात्री १.३० वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतात. मात्र ‘टीम लोकमत’च्या रिअॅलिटी चेकमध्ये वेगळेच चित्र समोर आले. दक्षिण मुंबईत जेथे पर्यटकांसह उच्चभ्रू कुटुंबांतील तरुण-तरुणींचा राबता असतो; तेथे रेस्टॉरंट आणि बारमध्ये वेळेच्या मर्यादा कधीच पाळल्या जात नाहीत. मध्य मुंबईमध्ये दादर असो वा सायनपर्यंतचा परिसर, येथील काही रेस्टॉरंट आणि बारदेखील वेळेच्या मर्यादा पाळत नाहीत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही सर्वसाधारण हीच स्थिती पाहण्यास मिळते.दक्षिण मुंबईतील ‘बडे मियाँ’ रोज सर्रास पहाटे ३ पर्यंत खुले असते. लगत असलेला गोकूळ बार तर तळीरामांसाठी पर्वणीच. या दोन्ही ठिकाणी दीडच्या सुमारास पोलिसांची व्हॅन आवर्जून उपस्थित असते. पण इथल्या उच्चभ्रू वर्गातील तरुण-तरुणाईला ‘फटके’ बसतील, अशी कारवाई येथे कधीही झालेली नाही. हॉटेल अथवा बारचे शटर बाहेरून बंद झालेले असले तरी आतल्या टेबलांवर ‘चिअर्स’ सुरूच असते, ते अगदी दोन-अडीच वाजेपर्यंत. पायधुनी येथील चहावाल्याकडे रात्रभरात कधीही ‘कटिंग’ चहा मिळतोच. महत्त्वाचे म्हणजे वर्षाचे १२ महिने येथे रात्री-अपरात्री निशाचरांना चहाची तलफ भागविता येते.दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला लागून असलेल्या ‘जीके’बारची तर ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली आहे. बारचे शटर बाहेरून वेळेवर बंद होत असले तरी रात्रभर ‘खुश्की’च्या मार्गाने येथे प्रवेश मिळतो. अनेकदा पोलीसही पहाटेपर्यंत येथे मद्याचा आस्वाद लुटतात.
मुंबईत नव्या ‘नाइटलाइफ’ची गरजच काय?
By admin | Updated: April 4, 2015 05:08 IST