विधान भवनाच्या पहिल्या मजल्यावर रेल्वेचे आरक्षण केंद्र आहे. अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदार, अधिकाऱ्यांना या सुविधेचा मोठा फायदा होतो. मात्र, याच आरक्षण केंद्राच्या खोलीत दोन मोठी लोखंडी कपाटे आरक्षणासाठी येणाऱ्या आमदारांचे पीए, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या कपाटांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचे लेबल लावली आहेत. विधिमंडळात विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यमंत्री यांच्यासाठी विशेष दालने आहेत. या दालनामध्ये त्यांना लागणारे आवश्यक साहित्य ठेवण्यासाठी भली मोठी कपाटेही आहेत. मात्र, अजित पवार यांची कपाटे आरक्षण केंद्रात ठेवल्यामुळे त्यात काय दडलंय? याचीच चर्चा सुरू आहे.
‘देसी गर्ल’ची विदेशी आवड! भारतीय चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत रसिकांमध्ये ‘देसी गर्ल’ नावाने लोकप्रिय असलेली प्रियांका चोप्रा मागील बऱ्याच वर्षांपासून हॉलीवूडपटांमध्ये बिझी आहे. त्याचा परिणाम जणू काही तिच्या आवडी-निवडींवरही झाल्याचे दिसते. नुकतीच भारतीय स्नॅक्स डावलून विदेशी स्नॅक्सची निवड केल्याने ती ट्रोल झाली आहे. एका मुलाखतीत तिने समोसा आणि चिकन तिक्का मसालासोबत विदेशी स्नॅक्सची निवड केली. तिने वडापाव डावलून हॉट डॉगला पसंती दर्शवली. त्यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली. ट्रोलिंगचा व्हिडिओ शेअर करत इन्स्टाग्राम स्टोरीत प्रियांका म्हणाली की, देशी असण्याचाही कोणता अभ्यासक्रम असल्याचे माहीत नव्हते. यावरूनही नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.