मुंबई : मुंबईतील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय अहमदाबाद येथे नेण्याच्या भाजपा खासदाराच्या मागणीला सर्वच स्तरातून जोरदार विरोध झाल्यानंतर त्याबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाच समोर यावे लागले. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय अहमदाबाद येथे नेण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे रेल्वेमंत्र्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.भाजपाचे खा. किरीट सोळंकी यांनी अहमदाबाद हे पश्चिम रेल्वेसाठी मध्यभागी पडत असल्याने मुंबईतील मुख्यालय अहमदाबादमध्ये हलविण्यात यावे अशी मागणी केली; मात्र या मागणीला काँग्रेस, शिवसेनेसेह अन्य राजकीय पक्षांनीही तीव्र विरोध केला. सर्वच स्तरातून विरोध झाल्यानंतरही रेल्वेमंत्र्यांकडून मात्र कुठलेच स्पष्टीकरण देण्यात येत नव्हते. सध्या महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असून, सत्तेत सहभागी होण्यासाठी सेना व भाजपामध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेला कुठलाही धोका पोहोचू नये यासाठी खबरदारी म्हणून मुंबईतील भाजपा खासदारांनी रविवारी सावध पवित्रा घेतला होता. अखेर आज संध्याकाळी प्रभू यांनाच पत्रक काढावे लागले. (प्रतिनिधी)> रेल्वेची परवानगी हवीपश्चिम रेल्वेचे मुख्यालय अहमदाबाद येथे नेण्याचा प्रस्ताव नाही. तसेच अन्य ठिकाणीही स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव नाही. रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कुठलाही प्रस्ताव पुढे सरकू शकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईतच
By admin | Updated: December 1, 2014 03:04 IST