सुधीर मुनगंटीवार : अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची चिन्हेनागपूर : महाराष्ट्रावर तब्बल ३ लाख ४४० कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे. गेल्या ५ वर्षांत ९७ हजार कोटींचे कर्ज आघाडी शासनाने घेतले मात्र विकास कुठेच दिसत नाही. घेतलेल्या कर्जाचे काय झाले, हे तपासण्यासाठी नव्यानेच सत्तारूढ झालेले सरकार अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढणार असल्याचे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी नागपुरात दिले.ना.मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्रावर असलेल्या कर्जाचा विचार करता कर्ज कमी करण्यासाठी योग्य निजोजन, राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या कर चोरीवर पायबंद घालणे आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, या तीन बाबी प्रकर्षाने कराव्या लागतील. शासनाचा एक- एक रुपया हा जनतेचा असून तो खर्च करताना त्याचा योग्य विनियोग होणे गरजेचे आहे. हल्ली हा निधी खर्च करताना शासकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उदासीनता असल्याचे जाणवते. आपण स्वत:साठी एखादी वस्तू विकत घेताना १० वेळा विचार करतो मात्र शासनाचा निधी खर्च करताना कुठलाही विचार केला जात नाही, ही गंभीर बाब असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले. त्यामुळे प्रत्येक खात्यात केला जाणारा खर्च योग्य तऱ्हेने होत आही की नाही, याचा आढावा घेतला जाणार आहे.ना. मुनगंटीवार यांचे सोमवारी नागपूरमध्ये आगमन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आघाडी सरकारच्या काळात सिंचन खात्यात अनागोंदीची चौकशी करण्यासोबतच राज्य सरकारने घेतलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज कुठे खर्च झाले, हे पैसे नेमके कुठे गेले हे तपासण्यासाठी अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, यात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुनगंटीवार म्हणाले. आघाडी सरकारच्या काळात निधीचा योग्य उपयोग झाला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. भाजप सरकारने श्वेतपत्रिका काढल्यास आघाडी सरकारच्या काळातील अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे, हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)
अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढणार!
By admin | Updated: November 4, 2014 01:03 IST