लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच. पण कर्जमाफी हा तत्कालिक उपाय आहे. कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे, त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. त्याच्याच शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन समिती स्थापन केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.
जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी अवस्था सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी झाली आहे. संयुक्त चिकित्सा समितीत त्यांचाही समावेश होता. तेव्हा अंतिम मसुदा त्यांच्याच सहमतीने मंजूर केला गेला. मसुद्यात काहीच आक्षेपार्ह नसल्याने त्यांनी तेव्हा कोणताच विरोध केला नाही आता मात्र कोणाचा तरी दबाव आल्याने त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
विधिमंडळ सदस्यांकडून निश्चितच चांगल्या वर्तनाची अपेक्षा आहे. गोपीचंद पडळकर जेव्हा अजितदादांविरोधात बोलले तेव्हा मी त्यांना समज दिली. शरद पवार यांच्याबद्दल चुकीचे बोलले तेव्हा मी दिलगिरी व्यक्त केली होती. पण नेहमी पडळकरच का दिसतात? दुसरे का दिसत नाहीत? दुसरे जेव्हा असे वागतात तेव्हा त्यांचे आका कोण हे शोधून काढले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधक उदासीनच : अजित पवारअधिवेशनानिमित्त विरोधकांना छाप पाडण्याची संधी होती, ती त्यांना पाडता आली नाही. त्यातून विरोधकांची अधिवेशनाबबत उदासीनता पहायला मिळाली, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.आजपर्यंतच्या विधिमंडळाच्या इतिहासात एवढ्या लक्षवेधी कधी झाल्या नाहीत. एका दिवशी २५-२५ लक्षवेधी आणि ११-११ अर्धा तासाच्या चर्चा लागल्या होत्या. रात्री ३ वाजता आमच्याकडे ललक्षवेधी यायच्या, त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना माहितीसाठी फोन लावायचा म्हटले तर ते झोपलेले असायचे, त्यामुळे मंत्र्यांची पंचाईत व्हायची असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी टोचले मंत्र्यांचे कानलाडकी बहीण योजनेबाबत काही मंत्र्यांची वेगवेगळी विधाने येत असतात. मंत्र्यांच्या बोलण्याच्या अधिकारावर तर मी बंदी आणू शकत नाही, मात्र मंत्र्यांनी सदसदविवेकबुद्धीने बोलावे.आपण योजना मंजूर करताना सगळे सोबत असतो. अर्थसंकल्प मंजूर करताना देखील सगळे सोबत असतो. विधिमंडळात देखील अर्थसंकल्प मंजूर होताना सगळे असतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांचे कान टोचले.गमतीच्या गोष्टी सीरियसली का घेता?उद्धव ठाकरेंना तुम्ही तुमच्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे, त्याबाबत विचारले असता, अहो...उद्धवजी देखील याबाबत बोलले आहेत की अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात.आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात बोललो तरी हेडलाईन होते. मी बोललो तर ती ऑफर झाली का? अलीकडच्या काळात संवाद होत असेल किंवा गंमत - जंमत होते ती का सिरियसली घेता, असा उलट सवाल फडणवीस यांनी केला.
विरोधी पक्षात एकी दिसलीच नाहीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिवेशनात विरोधी पक्षांची एकी दिसलीच नाही, असे सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावात खोटे प्रश्न होते. चुकीच्या माहितीच्या आधारावर कामकाज करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला. विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केले. मात्र, त्यांच्याकडे ठोस मुद्देच नव्हते. विधिमंडळात मारामारीचा झालेला प्रकार अक्षम्य होता, असेही ते म्हणाले.