नवी मुंबई : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना स्वत:च्या मालकीचे धरण असणाऱ्या नवी मुंबईकरांना पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळेनासे झाले आहे. ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर व २४ तास पाणीपुरवठा करण्याचे धोरण पालिकेने यापूर्वीच मंजूर केले आहे. परंतु प्रत्यक्षात शहरवासीयांना गरजेपुरतेही पाणी मिळत नाही. पाणीपुरवठ्याच्या वेळाही वारंवार बदलल्या जात असल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. मुबलक पाणीसाठा असल्याने पुढील ५० वर्षे कधीच पाणीटंचाई भासणार नाही अशा घोषणा यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने केल्या होत्या. परंतु पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात अचानक पाणीकपात सुरू केली आहे. राष्ट्रीय मानांकनाप्रमाणे प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणी पुरविण्यात येणार असल्याची घोषणा आयुक्तांनी केली आहे. आयुक्तांच्या आदेशाचे पालन करता यावे यासाठी प्रत्येक सोसायटीमध्ये कमी दाबाने पाणी सोडले जात आहे. नागरिकांना दिवसभर पुरेल एवढेही पाणी उपलब्ध होत नाही. काही सोसायट्यांमध्ये दिवसामधून अर्धा ते एक तासच पाणी मिळत आहे. नेरूळ सेक्टर २०, नेरूळ गाव, सेक्टर १६, २४, ६ व इतर अनेक ठिकाणी वेळेत व पुरेसे पाणी मिळत नाही. सीवूडमध्येही पाणीपुरवठा वेळेत होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. पाणी येत नसल्याने नागरिक पालिका अधिकारी,नगरसेवक, साठवण टाकी येथे जावूनही विचारणा करत आहेत. परंतु सर्वच ठिकाणी आयुक्तांचे आदेश असल्याचे उत्तर दिले जात आहे. पूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू असताना शहरवासीयांना मात्र पिण्यासाठीही पाणी मिळत नाही ही शोकांतिका असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे धोरण मंजूर केले असताना रोज अर्धा ते एक तास पाणी देण्याचा निर्णय प्रशासनाने परस्पर कसा घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुष्काळाची स्थिती असल्यामुळे डिसेंबर ते मे दरम्यान नागरिकांनी पाणी पुरेसे मिळत नसतानाही कधीच नाराजी व्यक्त केली नाही. प्रशासनाला सहकार्य केले. परंतु धरणामध्ये मुबलक पाणी असतानाही पाणीकपात करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाची मनमानी सुरू झाली आहे. लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेल्या प्रस्तावांची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. नागरिकांना २४ तास नाहीच परंतु गरजेएवढेही पाणी मिळत नाही. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई केली आहे. अनेक भागात २४ तास पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून अशीच स्थिती राहिली तर आंदोलन करावे लागेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. >प्रशासनाची हुकूमशाही सुरू महापालिकेमध्ये प्रशासनाची हुकूमशाही सुरू झाली असल्याची टीका नागरिक व लोकप्रतिनिधी करू लागले आहेत. महासभेने ५० रुपयांमध्ये ४० हजार लिटर पाणी देण्याचा ठराव मंजूर केला आहे. यापूर्वी जवळपास ६० टक्के परिसरामध्ये चोवीस तास पाणीपुरवठा केला जात होता. उर्वरित परिसरामध्ये ५ ते ६ तास पाणी दिले जात होते. परंतु आता अर्धा तासही पाणी दिले जात नाही. नागरिकांनी तक्रारी केल्या तर त्यांनाच उपदेशाचे डोस दिले जात आहेत. प्रशासनाची हुकूमशाही सुरू असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होवू लागली आहे. नगरसेवकांची डोकेदुखी वाढली महापालिका प्रशासन पिण्यासाठीही पुरेसे पाणी देत नाही. तक्रार केल्यास आम्ही पाणी देत आहोत, तुम्ही त्याचे नीट नियोजन करा अशा सूचना दिल्या जात आहेत. यामुळे त्रस्त झालेले नागरिक रोज नगरसेवक व इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडे तक्रारी करत आहेत. पहाटेपासून रात्रीपर्यंत सर्वाधिक फोन पाण्यासाठीच येवू लागले असून प्रशासनाच्या मनमानीमुळे निर्माण झालेल्या रोषास लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे. >नेरूळवासीयांनी दिले निवेदनसेक्टर २०, नेरूळ गाव, सेक्टर १० परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. याविषयी नागरिकांनी स्थानिक नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्याकडे तक्रार केली आहे. म्हात्रे यांनी याविषयी आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाणीपुरवठा पत्र देवून नागरिकांच्या भावना कळविल्या आहेत. येथील अरुणोदय सोसायटीसह सर्वच ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा सुरू असून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली जात आहे.
पावसाळ्यातही मिळेना पिण्यासाठी पाणी
By admin | Updated: August 5, 2016 02:10 IST