शेळगाव : हनुमानवाडी (५४ फाटा, ता. इंदापूर) येथे श्री हनुमान जयंतीनिमित्ताने या वर्षी ही हनुमानवाडी येथे कुस्तीचे मैदान आयोजित केले होते. या मैदानासाठी १०० ते १५० मल्ल सहभागी झाले होते.हनुमानवाडी येथे सकाळी ११ वाजल्यापासून कुस्त्या नेमण्यासाठी पहिलवानांनी गर्दी केली होती. १०० रुपयांपासून २००० रुपयापर्यंत कुस्ती घेण्यात आल्या. या कुस्ती मैदानाचे उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील याच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या सत्कार बाळासाहेब वाघमोडे व हनुमानवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. या मैदानात रावसाहेब वाघमोडे यांनी जाकीर शेख याला चितपट केले. तसेच, सागर मारकड व प्रमोद नरुटे यांच्या मध्ये अतिशय रोमांचक लढत झाली. त्यात सागर मारकड यांनी विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी दादा मुलाणी दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यामुळे संदीप काळे याला विजयी घोषित करण्यात आले. दोन नंबरची कुस्ती शाहूपुरी तालीम कोल्हापूरचा राहुल सरक व पोपट घोडके यांच्यात बरोबरीत सोडण्यात आली. प्रथम क्रमांकाची कुस्ती शिवनेरी तालीम अकलूज नितीन केचे व विलास डोईफोडे यांच्यात झाली. अवघ्या ४ मिनिटांत विलास डोईफोडे यांनी नितीन केचेला आस्मान दाखवून विजय मिळविला.या वेळी पंच म्हणून सचिन बनकर, सचिन चांदणे, बाळासाहेब वाघमोडे, पिनू तोरसकर, सिंकदर मुलाणी, दादा काळे, रावसाहेब मगर, भारत जाधव, नितीन जगदाळे, गणेश जगदाळे, मारुती मारकड, तायप्पा शिंदे लाभले. या वेळी नीरा-भीमाचे चेअरमन लाला पवार, कर्मयोगचे संचालक अंबादास शिंगाडे, भागवत भुजबळ, यशवंत माने, प्रताप चवरे उपस्थित होते. शंकर पुजारी व भागवत यांनी कुस्तीचे समालोचन केले.
हनुमानवाडीत कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी
By admin | Updated: May 17, 2016 02:06 IST